श्री कसबा गणपती मंदिर, पुणे –
शहाजीराजांकडे पुणे-सुपे जहागिरी असताना मुरार जगदेवाने पुणे उद्ध्वस्त केले. त्याने पुणे बेचिराख करून त्यावर गाढवाचा नांगर फिरवला. इ. स. १६३६ मध्ये शहाजीराजांनी कसबे पुणे ह्याच्या दक्षिणेस गावाच्या बाहेर एक मोठा वाडा बांधला, त्याचे नाव लाल महाल असे ठेवलें. ह्या लाल महालांत बाल शिवाजी महाराज व मातोश्री जिजाबाईसाहेब येऊन राहिले. या महालाशेजारी गणपतीचे एक लहान मंदिर होते. जिजाबाईंनी कसबा गणपती मंदिर, पुणे या मंदिराचा जीर्णोद्धार करून गर्भगृह बांधले.
ठकार, वैद्य, कानडे, ढेरे, शाळीग्राम, कवलंगे, निलंगे आणि भाराईत हे ८ जण या प्राचीन कसबा पेठेचे मूळ रहिवासी होते. ही ८ घराणी विजापूरच्या इंडी तालुक्यातून राज्यकर्त्यांच्या जाचास कंटाळून पुण्यात आली होती. त्यापैकी ठकार घराण्यात विनायकभट्ट नावाचे एक गणेशभक्त झाले. त्यांनी चतु:श्रृंगी जवळच्या गणेश खिंडीत असलेल्या देवळात अनुष्ठान केले तेव्हा त्यांना दृष्टान्त झाला की, कसबा पेठेत ओढ्याच्या काठी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणपतीचा वास आहे. ठकारांनी दृष्टान्ताप्रमाणे त्या ठिकाणी खोदल्यावर त्यांना तांदळा रूपातील गणेश मूर्ती सापडली.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथात, “जिजाऊसाहेब व बाल शिवबा यांना ठकार नावाच्या ब्राह्मणाच्या घराजवळ भेड्याच्या विटांच्या आवारात एक गणपती अंग चोरून बसलेला दिसला, देऊळ देव्हारा त्याला काहीहि नव्हते (त्याचा शोध लागला) त्यांनी तेथील भगदाडातील (तळघरातील?) गणपतीचे भक्तिभावाने दर्शन घेतले आणि पंतांना त्या गणपतीचे देवालय बांधण्यास सांगितले. ” असा उल्लेख आहे.
या मंदिराबाबत सगळ्यात जुना उल्लेख निजामशाहीतील एका द्वैभाषिक फर्मानात आहे. त्या द्वैभाषिक फर्मानात पहिल्या २० ओळी फारसीमध्ये तर नंतरच्या २८ ओळी मोडी लिपीत लिहिलेल्या आहेत. या फर्मानाची तारीख १ जानेवारी १६१९ ही आहे. विष्णूभट महादेवभट पुराणिक (ठकार) हे या गणपतीचे खिजमतगार (सेवेकरी) ब्राह्मण असून देवासाठी इनाम दिल्याची नोंद मिळते. या पत्रात इ.स.१६१३-१४ सालचा उल्लेख आहे. त्यावरून इ.स. १६१४ पासून हा गणपती अस्तित्वात होता असे म्हणता येईल. त्यानुसार हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीपासून अस्तित्वात होते हे कळते. या फार्मानाचे वाचन कै. निनाद बेडेकर यांनी श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या मदतीने पूर्ण केले. शिवकाळापासून ठकार घराण्याकडे या मंदिराची व्यवस्था वंशपरंपरेने आहे. त्यांची १८ वी पिढी गजानन चरणी आपली सेवा अर्पण करत आहे. कसबा गणपतीचा ‘जयती गजानन’’ असाही उल्लेख सापडतो. गजाननराव सदाशिव दीक्षित यांनी या मंदिराचा लाकडी सभामंडप बांधला. तसेच लकडे कुटुंबीयांनी फरसबंदी बांधकाम व ओवऱ्या बांधल्या. इ.स. १८७७ मध्ये मंदिराच्या आवारात पाण्याचा हौद बांधला होता, नंतर तो बुजविण्यात आला.
फेब्रुवारी २००७ मध्ये सध्याच्या श्री कसबा गणपतीच्या मंदिरातील गाभाऱ्यापासून काही मीटर अंतरावर एका वाड्याच्या जागेत नवीन इमारत बांधण्यासाठी खोदकाम करताना घराच्या पायाकडील भागात तळघरासारखा एक भाग आढळला. त्याच्या भिंतीतील कोनाडा वरून मातीने लिंपून बंद केलेला आढळला. तेथे उकरले असता जुनी-झिजलेली, बऱ्या स्थितीतील गणेशमूर्ती आढळली. ही तांबूस करड्या ठिसूळ बसाल्ट दगडाची आहे. प्रसिद्ध इतिहाससंशोधक श्री. पांडुरंग बलकवडे यांनी त्या मूर्तीचा अभ्यास केला. पाऊण मीटर उंचीची अन् अर्धा मीटर रुंदीची ही चतुर्भुज गणेशाची मूर्ती आहे. मूर्तीचा खालचा उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवलेला आहे. वरच्या उजव्या हातात त्रिशूळ धरलेला आहे. वरच्या डाव्या हातात पाश असून खालच्या डावा हात डाव्या मांडीवर ठेवलेला आहे. मूर्तीची सोंड थोडी भग्न झालेली असली तरी ती डावीकडे आहे. मूर्तीच्या डोक्यावर अंगचाच कोरलेला मुकुट नसून त्याचे उघडे गंडस्थळाचे रूप आहे. मूतीच्या हाता-पायांत अलंकार घातलेले आहेत. त्यांचीही झीज झालेली आहे. अभ्यासकांच्या मते ह्या मूर्तीचा काळ साडेचारशे पाचशे वर्षापूर्वीचा असावा आणि कदाचित हि मूर्ती पूर्वी मंदिरात पुजली जात असावी आणि शाहिस्तेखानाने लाल महालात तळ ठोकण्याआधी ती मूर्ती सदर ठिकाणी लपवली असावी.
सध्याच्या श्री कसबा गणपती मंदिराचे प्रवेशदार पूर्वाभिमुख असून गणपतीची मूर्ती उत्तराभिमुख आहे. मंदिरास लाकडी सभामंडप आहे. त्या मागे दीपमाळ, छोटे मारुती मंदिर व समाधी आहे. सभामंडपात कमानीदार महिरपींसह खांबांवर अष्टविनायकांच्या तसबिरी लावल्या आहेत. मंदिराचा दर्शनी भाग दुमजली आहे. त्यातील दुसऱ्या मजल्यावर नगारखाना आहे. लाकडी सभामंडपाच्या उजव्या बाजूस ओवऱ्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर चांदीची महिरप आहे. शेजारी शिवलिंग, दत्त, विठ्ठल – रुक्मिणी, गणपती आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्यामध्ये कसबा गणपती हा तांदळा रूपात आहे. गाभाऱ्यातही चांदीची महिरप आहे. गणेशमूर्तीच्या डोळ्यांच्या जागी हिरे आणि बेंबीच्या जागी माणिक बसविलेले आहे. मूळची तांदळाएवढ्या आकाराची मूर्ती शेंदूर लावल्यामुळे आता सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे.
श्री कसबा गणपती पुण्याचं ग्रामदैवत आहे. त्यामुळे पुणेकरांच्या प्रत्येक शुभ कार्याचे पहिले निमंत्रण या देवतेस देण्याची प्रथा आहे. मंदिरात वर्षातून ३ वेळा ज्येष्ठ, भाद्रपद आणि माघ महिन्यात शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी असा गणेशजन्म साजरा केला जातो. उत्सवात गणपतीपुढे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेष प्रसंगी गजाननास सालंकृत पोशाख पूजा केली जाते. मंदिरात रोज रात्री मोरया गोसावी यांची पदे गायली जातात.
संदर्भ:
मुठेकाठचे पुणे – प्र. के. घाणेकर
पुणे शहरातील मंदिरे – डॉ. शां. ग. महाजन
पुणे वर्णन – ना. वि. जोशी
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
असे होते पुणे – म. श्री. दीक्षित
पुण्याचे सुखकर्ता – स्वप्निल नहार, सुप्रसाद पुराणिक
पत्ता : https://goo.gl/maps/buJxnDghXD5ANq7r8
आठवणी इतिहासाच्या