काशी केदारेश्वर मंदिर, नागलवाडी –
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून ४० किमी अंतरावर नागलवाडी गावाजवळ असलेलं काशी केदारेश्वर हे महादेव डोंगर रांगेतील पुरातन शिवालय आहे. पाताळगंगा नदीचा उगमस्थान असलेला हा परिसर, वाल्मिकी ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. रामायण काळातले साक्षीदार असलेले हे ठिकाण निसर्ग सौंदर्याने नटलेले असून या ठिकाणी महादेवाची स्वयंभू पिंड आहे. रामायण काळात प्रभू श्रीरामचंद्र व सीता या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते, अशी आख्यायिका आहे.(काशी केदारेश्वर मंदिर, नागलवाडी)
रामायण काळात सप्तऋषींपैकी वाल्मिकी ऋषींचा असणारा हा आश्रम होता. वाल्मिकी ऋषींना तपश्चर्येकरिता एकांतवास मिळावा म्हणून असे निसर्ग रमणीय स्थान महर्षी वाल्मिकींनी शोधले. ज्यावेळी श्रीरामांनी सीता मातेला लक्ष्मणाकरवी अरण्यवास घडवला. त्यावेळी सीतामाता याच ठिकाणी वाल्मिकी ऋषींच्या सानिध्यात राहू लागल्या. ज्या वेळेस सीतामाईला दंडकारण्यात सोडण्यासाठी लक्ष्मणजी आले होते त्यावेळी सीतामाता तहानेने व्याकुळ झाल्या त्यावेळी लक्ष्मणजीने खडकात बाण मारून निर्माण केलेला जिवंत पाण्याचा झरा आज देखील त्या घटनेची साक्ष देतो. त्या झऱ्याची खोली केवळ ७ फूट असून दुष्काळात देखील या कुंडातील पाणी कधीही आटत नाही असे ग्रामस्थ सांगतात.
आजमितीस उभे असलेले मंदिर हे नव्याने बांधण्यात आलेले असून पुरातन मंदिराच्या आजमितीस केवळ खाणाखुणा शिल्लक आहेत. मंदिर परिसरात या खाणाखुणा अवशेष रूपात विखुरलेल्या आपल्याला दिसून येतात. मंदिराच्या मागील बाजूस पुरातन मंदिरातील अनेक मूर्ती, वीरगळ, सतीशीळा, दुर्मिळ अश्या गद्धेगळ, सर्पशिळा, शरभ शिल्पं तसेच अनेक भग्नावशेष मांडून ठेवलेले आहेत. हे सर्व अवशेष पाहताना पुरातन मंदिराचे वैभव आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि आपण हा वारसा गमावून बसलोय या विचाराने मन मात्र खिन्न होते.
शेवगाव तालुक्यातील नागलवाडी गावचे ग्रामदैवत तसेच परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून हे देवस्थान ओळखले जाते. मंदिराचा परिसर झाडाझुडुपांनी वेढलेला असून पावसाळ्यात तर येथील निसर्ग सौंदर्य मनाला भुरळ घालते. प्रत्येक सोमवारी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येथे येत असतात, तर श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते.
©️ रोहन गाडेकर