काशी विश्वेश्वर मंदिर –
काशीतील भगवान शंकरांचे मंदिर हे समस्त हिंदुधार्मियांचे श्रद्धास्थान . सातव्या शतकात या मंदिराचे शिखर हे १०० फुट उंच असल्याची नोंद चीनी प्रवासी युआन्चांग करतो. मुस्लीम आक्रमकांनी वेळोवेळी या मंदिरास पाडून नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा जीर्णोधार वेळोवेळी करण्यात आला व हिंदू धर्मियांचे काशी विश्वेश्वर मंदिर हे श्रद्धास्थान आबाधीत राखण्यात आले.
इ.स. १५८० च्या सुमारास राजा तोरडमल याने काशी विश्वेश्वराचा जीर्णोधार महाराष्टातील ब्राम्हण नारायणभट्ट याच्या विनंतीवरून केला.
इ.स. १६७० साली औरंगजेबाच्या आदेशाने हे मंदिर पाडण्यात आले व त्या जागेवर मशिदीचे निर्माण करण्यात आले.
“ शके १५९१ सौम्य संवछरे भाद्रपदमासी औरंगजेब कासीस उपद्रव केला देवालय पडिले.“
संदर्भ :- जेधे शकावली
“बादशहाच्या आदेशानुसार त्याच्या अधिकाऱ्यांनी काशी विश्वनाथाचे मंदिर पाडले.”
संदर्भ :- मासिरे आलमगिरी
मराठ्यांच्या मनात काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोधार करावा अशी इच्छा होती . मल्हारराव होळकर यांची छावणी इ.स. १७४२ च्या जून महिन्यात काशीत होती त्यावेळी सदर मशीद पडून काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोधार करावा अशी त्यांची इच्छा होती परंतु त्यावेळी काशीत यवन सत्ता प्रबळ होती मल्हारराव होळकर तेथून निघून जाताच तेथील ब्राम्हणाची हत्या होईल या भीतीने स्थानिक ब्राम्हणांनी यास विरोध केला व मल्हारराव होळकर यांची काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोधार करण्याची इच्छा पूर्णत्वास जाऊ शकली नाही.
थोरले माधवराव पेशवे यांनी त्यांच्या मृत्युपूर्वी राज्यातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून शपथ घेवविल्या . त्यातील ९ कलमी यादीतील २ रे कलम हे काशीक्षेत्रासंबंधी होते. “ श्री काशी प्रयाग हि दोन्ही स्थळे सरकारात यावी., असा तीर्थरूपांचा ( नानासाहेबांचा पेशवे ) हेतू होता. त्यास प्रस्तुत करावयाजोगे दिवस आहेत. दहावीस लक्षांची जहागीर मोबदला पडली तरी देवून दोन्ही स्थळे हस्तगत करावी प्रयत्न करावा
संदर्भ :- पेशवे दफ्तरातील सनदापत्रातील माहिती
**पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर **
अहिल्याबाई होळकर यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोधार केला व ज्ञानव्यापी मशिदीच्या शेजारी मंदिराची निर्माती केली . छत्रपती शिवाजी महाराज , सुभेदार मल्हारराव होळकर , नानासाहेबांचा पेशवे , थोरले माधवराव पेशवे यांची काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या निर्मितीची इच्छा पूर्ण केली.
परंतु काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या मूळ जागेवर या मंदिराची उभारणी होऊ शकली नाही. .
आज्ञापत्रात शिवछत्रपतींचे काशी विश्वेश्वर सोडवण्याचे ध्येय स्पष्ट नमूद केले आहे. रामचंद्र पंत अमात्य लिहितात,
“श्रीकृपे अचिरकालेच मुख्य शत्रूचा पराभव करून दिल्ली, आगरा, लाहोर, ढाका, बंगाल आदिकरून संपुर्ण तत्संबंधी देशदुर्ग हस्तवश्य करून श्रीवाराणसीस जाऊन स्वामी विश्वेश्वर स्थापना करीत, तावत्काळपर्यत दक्षिण प्रांत संरक्षणार्थ श्री मत्सकलतिर्थीकतीर्थ श्रीन्मातुश्री राहिली आहेत.”
संदर्भ :- रामचंद्रपंत अमात्य कृत आज्ञापत्र
काशी की कला जाती , मथुरामे मस्जिद बसती
अगर शिवाजी ना होते , तो सुन्नत, होती सबकी।।
नागेश सावंत – इतिहास अभ्यासक मंडळ