महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,15,013

काशीविश्वनाथ देवस्थान, ढोरजा

By Discover Maharashtra Views: 1364 2 Min Read

श्री काशीविश्वनाथ देवस्थान, ढोरजा –

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात श्रीगोंदा शहरापासून १८ किलोमीटरवर ढोरजा हे छोटसं गाव वसले आहे. गावापासून काही अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात काशीविश्वनाथ देवस्थान असून देव व भक्ताचा अनोखा मिलाप या ठिकाणी आपणास पहावयास मिळतो. काशिनाथ हे भक्ताचे व विश्वनाथ हे देवाचे अशी ही मंदिरे ओळखली जात असली तरी दोन्ही मंदिरे महादेवाचीच आहेत.

मंदिराविषयी आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, ढोरजा गावाजवळ असणाऱ्या शिरुडी गावातील एक भक्त काशी विश्वनाथाची मनोभावे सेवा करीत असे. पुढे वृद्धत्वामुळे सेवा करणे कठीण होऊ लागले तेव्हा भक्ताने देवाला माझ्या गावी चलावे अशी विनंती केली. देवाने भक्ताची ही विनंती मान्य केली परंतु सोबत येत असताना तू ज्या ठिकाणी मागे वळून पाहशील मी त्याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करेल अशी अट घातली. भक्ताने ही अट मान्य केली. ढोरजा गावात आल्यानंतर भक्ताने नकळत मागे वळून पाहिले तेव्हा देव याच ठिकाणी कायमचे वास्तव्यास राहिले.

विश्वनाथाचे मंदिर पश्चिमाभिमुख असून यादवकालीन आहे. मंदिराच्या मुखमंडपाजवळ दोन्ही बाजूला भिंतीत काही वीरगळ व शिल्पं बांधलेले दिसतात. समोर काही अंतरावर काशिनाथाचे मंदिर असून हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिर परिसरात काही वीरगळ व इतर भग्नावशेष आपल्याला इतरत्र विखुरलेले दिसून येतात. मंदिराच्या जवळच एक बारव असून महाराष्ट्र बारव मोहिमेच्या माध्यमातून या बारवेचे संवर्धन करण्यात आले आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी इथे मोठी यात्रा भरते. हिरवाईने नटलेला परिसर व परिसरात आढळणाऱ्या आपल्या सांस्कृतिक इतिहासाच्या खाणाखुणा मनाला एक वेगळेच समाधान देतात एवढं मात्र नक्की!!

– रोहन गाडेकर

Leave a Comment