कष्टभंजन मारुती | Kashtabhanjan Maruti –
रास्ता पेठेत असलेल्या ज्यू आळीमध्ये स्वामीनारायण मंदिर आहे. ह्या मंदिरात मारुतीची एक दुर्मिळ मूर्ती आहे. पुण्यातील अशाप्रकारची ही एकमेव मूर्ती असावी.
गुजरातच्या सालंगपूर इथल्या कष्टभंजन हनुमानाची ही छोटी प्रतिकृती आहे. तिथे मारुतीला महाराजाधिराज म्हणलं जातं, म्हणूनच या मारुतीच्या डोक्यावर मुकुट आहे. हे गुजरातमधील एक प्रसिद्ध मंदिर असून, मारुतीच्या नुसत्या दर्शनानेच आपले सगळे कष्ट, दु:ख भंगतात किंवा दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
मुख्य मंदिरात समोरच्या बाजूला उजव्या कोनाड्यात हि मूर्ती आहे. खास गुजराती पेहराव घातलेला, आपली दंतपंगती दाखवत, पायाखाली राक्षसीण आहे. या राक्षसिणीबद्दल अशी आख्यायिका सांगितली जाते की, ती लंकेची ग्रामदेवता आहे. तिला मारून मारुतीने लंकेवर स्वारी केली. काही ठिकाणी या राक्षसीणीला पनवती म्हणतात. या मारुतीच्या एका हातात गदा तर दुसऱ्या हातात राक्षसिणीचे केस पकडले आहेत. या शिल्पाची खास गोष्ट म्हणजे मारुतीच्या चारही बाजूंनी वानरसेना कोरलेली आहे. या १३ वानरांनी आपल्या हातात कुठलंतरी फळ धरल्याचं दिसतं. हे मंदिर गुजराती समाजाचे असल्याने इथला सगळा व्यवहार गुजराती भाषेतच होतो.
संदर्भ: वारसा प्रसारक मंडळी – साकेत देव
पत्ता : https://maps.app.goo.gl/h4qJsnHPX2c8fhT38
आठवणी इतिहासाच्या