महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,09,219

कावनई किल्ला | Kawanai Fort

Views: 5601
8 Min Read

कावनई किल्ला | Kawanai Fort

कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मुळ ठिकाण म्हणुन आजही प्रसिध्द आहे पण या ठिकाणापासुन काही अंतरावर असलेला कावनई किल्ला (Kawanai Fort) आजही पर्यटकांना माहित नाही. मुंबई-पुणे –नशिक या ठिकाणाहुन केवळ एक दिवसात या किल्ल्याला भेट देता येते. मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईहुन जाताना घोटीच्या पुढे ४ कि.मी. अंतरावर खंबाळे गावाजवळ डाव्या बाजुला कावनई फाटा फुटतो. या फाट्यावरून ३ कि.मी.आत आल्यावर वाकी येथुन उजव्या बाजुला एक रस्ता जातो. रस्त्याच्या सुरवातीलाच किल्ले कावनई असे लिहिलेली एक कमान असुन या कमानीपासून कावनई हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव ४ कि.मी. अंतरावर आहे. नाशिक शहरापासून हे अंतर ४५ कि.मी. तर इगतपुरीहून हे अंतर १७ कि.मी.आहे. सिंहस्थामुळे येथील कपिलधारा तीर्थाचा विकास झाला असुन वाकी ते कावनई रस्ता सिमेंटचा करण्यात आला आहे. कावनई गावाअगोदर कपिलधारा आश्रम असुन त्यापुढे १ कि.मी वर कावनई गाव आहे.

कावनई गाव उंचावर असल्याने आपली काही चढाई गाडीने पार होते. गावात शिरल्यावर समोरच उजव्या हातालाच (Kawanai Fort)  किल्ला दिसतो. गावात महादेवाचे व हनुमान मंदिर असुन हनुमान मंदिरात बजरंगबलीची भव्य मूर्ती आहे. गावात दोन लहान वाडे व मंदिरांच्या आजूबाजूला काही मुर्ती व कोरीव दगडी अवशेष पहायला मिळतात. गावाच्या उजव्या बाजुला कावनाई किल्ल्याची एक सोंड गावात उतरताना दिसते. या सोंडेवरुनच गडावर जाणारी रुळलेली वाट आहे. या वाटेवरील लक्षात ठेवण्याची खुण म्हणजे या वाटेच्या सुरवातीलाच एक उंच सिमेंटची पाण्याची टाकी आहे. हनुमान मंदिरा समोरून एक वाट या टाकीच्या दिशेने जाते. वाटेच्या सुरवातीलाच आपल्याला एक कबरवजा समाधी दिसुन येते. या समाधीवर दिवा लावण्याची सोय केलेली आहे. या सोंडेवरून वळणे घेत गेल्यावर सोंडेच्या शेवटी एक छोटे टेकाड लागते. या टेकाडाच्या वरील बाजूस गडाचा कातळ व त्यावरील बुरुजावर फडकणारा भगवा दिसुन येतो. येथुन वाट डावीकडे वळुन परत उजवीकडे फिरते व गडाच्या कड्याखालुन एका घळीतुन थेट गडाचा दरवाजापर्यंत घेऊन जाते. घळीत आल्यावर घळीच्या वरच्या बाजुला कड्यात असलेला दरवाजा दिसुन येतो. या घळीत असलेल्या कातळातील कोरीव पायऱ्या तसेच बांधीव पायऱ्या व तेथे पडलेले दगडी अवशेष घळीच्या खालील बाजूस पुर्वी अजुन एक दरवाजा असल्याच्या खुणा दर्शवतात.

घळीच्या खालील बाजुस असणाऱ्या पायऱ्या आजही शिल्लक असुन वरील बाजुच्या पायऱ्या झिजुन गेल्याने त्या ठिकाणी लोखंडी शिडी लावलेली आहे. या शिडीच्या टोकावरूनच आपला गडाच्या उत्तरभिमुख दरवाजाने गडावर प्रवेश होतो. कड्यात असला तरी आजही हा दरवाजा तग धरून उभा आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजुस काही अंतरावर दोन बुरुज असुन दरवाजाच्या आत उजव्या बाजूला एक लहानशी गुहा आहे. या गुहेत एक दगडांनी भरलेले लहानसे खोदीव टाके असुन प्रसंगी ४-५ जण या गुहेत सहज राहु शकतात. दरवाजाच्या वरील बाजुस तीव्र चढाच्या २५-३० पायऱ्या असुन या पायऱ्यांच्या डाव्या बाजूस असलेल्या बुरुजावर एक मातीने बुजलेले लहान टाके आहे. दरवाजातुन पायऱ्या चढुन आल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. पायथ्यापासुन येथवर येण्यास दिड तास लागतो. समुद्रसपाटी पासून २३७० फुट उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्याचा माथा साधारण त्रिकोणी असुन ६ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. गडमाथ्यावर आल्यावर डावीकडील वाटेने गड पहाण्यास सुरवात करावी. वाटेच्या सुरवातीला सर्वप्रथम काही उध्वस्त घरांची जोती व भिंतीचे अवशेष दिसुन येतात. येथील टोकाच्या बुरुजावरून आपल्याला समोरच कोथळीगडाच्या आकाराचा डोंगर दिसुन येतो. या वाटेच्या उजव्या बाजुस पाण्याने भरलेला मोठा तलाव असुन या तलावाची एक बाजु विटांनी बांधुन काढलेली आहे. तलावाच्या डाव्या बाजुस एक छप्पर नसलेली वास्तु असुन या वास्तुच्या पुढ्यात एका चौथऱ्यावर उघड्यावरच शिवलिंग व नंदी ठेवलेला आहे.

तलावाच्या काठावर एक लहानसे कावनई (कामाक्षी) देवीचे मंदिर आहे. या मंदिरात एक जुनी व एक नवीन संगमरवरी मुर्ती अशा देवीच्या दोन मुर्ती आहेत. मंदिराच्या मागील बाजुस दोन बुरुज आहेत. यात कपिलधारा तीर्थाच्या दिशेने एक बुरुज असुन या बुरूजावरून कपिलधारा तीर्थक्षेत्राचा संपुर्ण परीसर दिसतो. बुरुजाच्या अलीकडे एक खडकात अर्धवट कोरलेले टाके व एक साचपाण्याचे टाके दिसुन येते. या भागातील बुरुजाची तटबंदी आजही शिल्लक आहे. बुरुजाकडून एक पायवाट थोडी खाली उतरताना दिसते. येथे कातळात कोरलेल्या काही पायऱ्या दिसुन येतात. येथुन तटबंदीच्या कडेने पुढे जाताना वाटेच्या उजव्या बाजुला व मंदिराच्या मागील बाजुस साचपाण्याचा एक कोरडा पडलेला तलाव असुन या तलावाच्या एका बाजुस खडकात कोरलेले एक टाके आहे. यातील पाणी गडावर पिण्यासाठी वापरले जाते. याच ठिकाणी वाटेच्या डाव्या बाजुस दरीच्या काठी डोंगरउतारावर खडकात कोरलेले एक भलेमोठे टाके दिसुन येते. येथुन पुढे आल्यावर आपण ज्या सोंडेवरून वर आलो त्या सोंडेच्या वरील बाजुस असलेल्या बुरुजावर पोहोचतो. हा बुरुज पाहुन आपण मंदिराशेजारी असलेल्या उंचवट्यावर आलो असता एका वाड्याचे अवशेष दिसतात. त्याच वाटेने थोडे पुढे उजवीकडे अजुन एका वाड्याचे अवशेष दिसतात. या उंचवट्यावर एक ध्वजस्तंभ दिसुन येतो. या उंचवट्यावरून दक्षिणेकडे कळसुबाई डोंगराची रांग दिसते तर उत्तरेकडे डाव्या बाजूला भास्करगड, हरिहर,त्रिंबककगड,त्रिंगलवाडी आणि अप्पर वैतरणाचा जलाशय दिसतो. समोर उत्तरेला अंजनेरी दिसतो. हि वाट पुढे आपण प्रवेश केला त्या मुख्य दरवाजा जवळ जाते व आपली गडफेरी पुर्ण होते.

गडावर बघण्यासाठी एवढेंच अवशेष असल्याने साधारण एक तासात आपला संपुर्ण गड (Kawanai Fort)  फिरून होतो. कावनई किल्ल्याची बांधणी नेमकी कोणत्या काळात झाली हे माहित नसले तरी कावनई गावाशी असलेली त्याची जवळीक पहाता हा किल्ला पुरातन काळापासून अस्तित्वात असावा असे वाटते. कावनई किल्ल्याजवळ कपिलधारा हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे मूळ असून पेशव्यांनी या कुंभमेळ्याचे विभाजन केल्यापासुन शिवउपासकांचा मेळा त्रिंबकेश्वर येथे तर राम उपासकांचा मेळा नाशीक येथे भरू लागला. आजही कपिलधारा येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. राम-रावण युद्धादरम्यान लक्ष्मणावर शक्तीप्रहार झाला असता तो शुद्धीवर यावा यासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान ह्या तीर्थावरुन जात असता त्याने कालनेमी राक्षसाचा वध केला व त्यामुळे या गावाला कावनई नाव पडले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

कपिलधारा येथील राम मंदिरात ह्यु-एन-त्संग या चिनी प्रवाशाने भेट दिलेली एक थाळीसारखी चिनी घंटा आहे. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. ६२९ ते ६४५ या काळात त्याने भारताला भेट दिली होती. इ.स. ६४०मध्ये दुसरा पुलकेशी चालुक्य व ह्युएनत्संगची नाशिकमध्ये भेट झाली होती. ह्युएनत्संगने या कावनई येथील विद्यापीठाला दोन घंटा भेट दिल्या होत्या. त्यातील एक घंटा दिल्लीतील पुरातत्व संग्रहालयात आहे. ह्युएनत्संग नाशिकमध्ये आला तेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा भरला असावा कारण ह्युएनत्संगला बरेच साधू दिसल्याचे त्याने नमूद केले आहे. कावनईच्या पायथ्याशी कपिलधारा तीर्थाजवळच श्री कामाक्षी माता मंदिर आहे. या मंदिरालाही पौराणिक माहात्म्य आहे. रामाची कामेच्छा पाहण्यासाठी आलेली पार्वती कामाक्षी देवी रूपात येथेच राहिली असे रामायणात म्हटले आहे. निजामशाहीत असणारा हा किल्ला इ.स.१६३५-३६ च्या सुमारास मोगलांनी जिंकुन घेतला. यानंतर इ.स.१६७०-७२ च्या सुमारास शिवकाळात हा किल्ला मराठयांनी जिंकुन घेतला. पुढे इ.स. १६८८ च्या सुमारास हा किल्ला परत मोगलांच्या ताब्यात गेला. यानंतर हा किल्ला मराठ्यांकडे केव्हा आला याची नोंद सापडत नाही पण चिमाजी अप्पांच्या एका पत्रात याचा उल्लेख येतो. कामाक्षी पुरातन मंदिराचा जिर्णोद्धार पेशव्यांनी १७५० ते १७६५ या कालखंडात केला असुन पेशव्यांनी कामाक्षी देवीला सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण केल्याचा उल्लेख पेशवे बखरमध्ये आहे. मंदिराकडे आजही हे दागिने उपलब्ध असुन नवरात्रोत्सवात व चैत्र पोर्णिमेला देवीला चढवले जातात. कावनई हे पुर्वी तालुक्याचे ठिकाण होते पण १८६१ मध्ये इंग्रजांनी हे ठिकाण इगतपुरीला हलवले.

माहिती साभार:- सुरेश निंबाळकर
Leave a Comment