महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,12,769

वकील काझी हैदर

By Discover Maharashtra Views: 6099 4 Min Read

वकील काझी हैदर –

काझी हैदर हा पारसनिवीस होता म्हणजे फारसी भाषेतील पत्रे वाचन व पत्र लिहिणारा एक कारकून . थोडक्यात तो एक दुभाषी म्हणून काम पाहत होता . शिवाजी महाराजांनी फक्त एकदाच इ.स. १६७२ साली साल्हेरच्या लढाईनंतर काझी हैदर याला बहादूरखान व दिलेरखान यांच्याकडे आपला वकील म्हणून पाठवल्याचा उल्लेख जयराम पिंड्ये यांच्या “ पर्णालपर्वतग्रहणाख्यान “ या ग्रंथात येतो.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यकाळात हा काझी हैदर मुगलाना जाऊन मिळाला . मआसीर –ए –आलमगिरी यातील नोंदीनुसार गुरुवार २६ जुलै १६८३ साली “ सीवाचा मुनशी काझी हैदर बादशाहाकडे सेवेच्या इच्छेने आला . त्याला एक अंगरखा , दहा हजार रुपये व दोन हजारी अशी मनसब दिली गेली.

काझी हैदरने स्वराज्याशी फितुरी तर केलीच परंतु मुगलांना मिळताच त्याने स्वराज्यातील असंतुष्ट लोकांना मोगल दरबारी आणण्याचे नेटाने प्रयत्न चालू केले. २३ ऑक्टोम्बर १६८४ साली काझी हैदरने औरंगजेबास अर्ज केला. “ एक हजार तिरंदाज व बर्कदाज स्वार हे संभाचा नोकर मालीकबेग वलद लालबेग याच्याजवळ आहेत. त्याला व त्याच्याबरोबर असलेला शेख हुसेन यास १००० होन सालीना नेमले होते . परंतु त्यांना पांचशे होन सालीना मिळत आहेत व म्हणून ते दोघेजण चाकरीच्या आशेने हुजूर येत आहेत. त्यांनी खातीरजमा ठेवुन आपल्या लोकांसह यावें असे हुकुम सादर व्हावे. हुकुम झाला की अश्रफ खानाने लिहून पाठवावे.” म्हणजे काझी हैदरने स्वराज्यातील १००० लढाऊ सैन्य व इतर सरदार यांनादेखील स्वराज्याविरुद्ध मोगल सैन्यात भरती केले.

काझी हैदर स्वराज्यातील असंतुष्ट लोकांना अधिक पगाराची लालच दाखवत स्वराज्यातून फोडण्याचे प्रयत्न करीत असतानाच त्याने कोकणातील “ कोथाळगड “ धोक्याने जिंकून मुगल साम्राज्यात दाखल केला. काझी हैदरचा भाऊ गुलाम अली याचा मुलगा “ काझी मुहम्मद “ व मुखील्स्खानाचा नातेवाईक “ अब्दुल कादिर “ यांची स्वराज्यील किल्ले जिंकण्यासाठी नेमणूक झाली होती. ते आपल्या ५०० मोगल सैन्यासह करूस येथे होते. त्यांनी कोथळ गडाच्या परिसरात राहणारे जमीनदार रामाजी यांच्याशी संगनमत केले व हेरगीरीने माहिती मिळवली कि “ किल्यातील लोक जवळच्या खेड्यात धान्य गोळा करण्यासाठी येत असतात . हि खबर मिळताच काझी हैदर ९ नोव्हेंबर १६८४ ला कोथाळगडाकडे रवाना झाला . व १० तारखेस गडाच्या पायथ्याशी पोहचला. ३०० मोगली सैन्य बंदुक व तलवारी घेऊन त्याने कोथाळगडाकडे पाठवली .

अब्दुल कादिरने याने या सैन्यास त्याच्या इतर सैन्यासह गडाच्या पायथ्याशी लपवून ठेवले. किल्याच्या कमरकोट दरवाज्याजवळ येऊन ओरडा केला की “ दरवाजा उघडा लोकांनी धान्य आणले आहे. “ आपली माणसे धान्य घेऊन आली आहेत असे समजून आतील लोकांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच काझी हैदरचे सैन्य आत घुसले त्यावेळी तेथे युद्ध झाले . काझी हैदर देखील किल्यात घुसला . या युद्धात काझी हैदरला मोठा विजय मिळाला व कोथाळगड मुगलांच्या ताब्यात आला. मोगलांचा करुसचा ठाणेदार अब्दुल कादिर व शिकारपुरचा ठाणेदार माणकोजी पांढरे यांनी काझी हैदर याला या कामी मदत केली . ११ तारखेस मराठा सैन्याने या किल्यास वेढा दिला यात मोगल सैन्य व मराठा सैन्य यात युद्ध झाले परंतु काझी हैदरचा या युद्धात विजय झाला. औरंगजेबास “ कोथाळगड “ जिंकल्याची आनंद वार्ता कळताच त्याला आनंद झाला व त्याने काझी हैदरला एक हत्ती खिल्लत देवून त्याचा सत्कार केला. औरंगजेबाने कोथाळगडाचे नवीन नामकरण “ मिफ्ताहूलफुतूह “ असे केले.

काझी हैदर यास ७००० रुपये बक्षीस व इतर मोगली सैन्यास ज्यांनी शौर्य गाजवून किल्यात प्रवेश मिळवला त्यांना सोन्याची व चांदीची कडी देण्यात आली. कोथाळगड मुगलांच्या ताब्यात आल्याने संपूर्ण तळकोकण बादशाही अमलाखाली आला होता त्यामुळे असा महत्वपूर्ण किल्यावर काझी हैदरने विजय मिळवल्याने औरंगजेबाने खुश होऊन त्यास “ खान “ हि पदवी दिली तसेच १०००० रुपयांची बक्षीसी दिली तसेच तो आधी दोन हजार जात व पाचशे स्वरांचा मनसबदार होता त्यात पाचशे जातींची वाढ केली.

१७०६ साली औरंगजेबाने काझी हैदर याची नियुक्ती मोगल साम्राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी केली. काझी हैदरने स्वराज्याशी फितुरी करून स्वराज्यास खूप मोठ्या प्रमाणात नुसकान पोहचवले .

संदर्भ :- ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ६ औरंगजेबाच्या दरबाराचे अखबार.
छायाचित्र साभार झी टीव्ही :- स्वराज्य रक्षक संभाजी महाराज.

नागेश सावंत

Leave a Comment