श्री केदारेश्वर मंदिर, पुणे –
पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराकडून कसबापेठेकडे जाताना मंदिराशेजारच्या गल्लीत श्री केदारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. ९०० वर्षांपूर्वीच्या पुण्याच्या ऐतिहासिक साधनांत या मंदिराचा उल्लेख आहे. पुण्येश्वर, नारायणेश्वराबरोबर केदारेश्वराचे लिंगही मोगलांच्या आक्रमण काळात पुरंदरला नेण्यात आले होते. नंतर आदिलशाहीमध्ये या लिंगाची पुनर्स्थापना करण्यात आली.श्री केदारेश्वर मंदिर.
सध्याच्या मंदिराची उभारणी पेशवाई कालखंडात १७३०च्या सुमारास झाली असावी. मंदिरातील मोठा नंदी १३ व्या शतकातील आहे. १७२२ मध्ये शाहू छत्रपतींनी या देवळास काही इनाम दिले होते.
सध्या अस्तित्वात असलेले मंदिर तुलनेनं छोटं असून त्याचं बांधकाम दगड-विटा यांनी केलेलं आहे. याच्या शिखरावर उपशिखरांच्या चार आडव्या रांगा दिसतात; त्यामुळे इतर देवळांपेक्षा हे शिखर वेगळ्या धाटणीचे ठरते. सभामंडपातून गाभाऱ्याकडे पाहिलं की गाभाऱ्याच्या बाह्य भिंतीत डावीकडे गणेशमूर्ती व उजवीकडे शिवलिंग आहे. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपती कोरलेला असून खाली उंबऱ्यावर कीर्तिमुख कोरलेले दिसते. गाभाऱ्यातील मुख्य शिवलिंगामागे दत्ताच्या पादुका आहेत. त्यांतील एकीवर चंद्र तर दुसरीवर सूर्य अंकित केलेला दिसतो. गाभाऱ्यात शाळुंकेच्या खोलवटीत पंचमुखी शिवलिंग आहे. १८९६ मध्ये त्यावर पक्का बाण बसविला गेला. त्यावरची लाकडी छत्री सुबक आहे. शिवलिंगासमोरील नंदीवर स्वतंत्र घुमटीवजा छत्री आहे. नंदीच्या गळ्यात असणाऱ्या अनेक माळा, घंटा इत्यादी अलंकार चालुक्य शिल्पशैलीच्या प्रभावातील वाटतात. याशिवाय आणखी एक छोटा नंदीही येथे आहे. मंदिराबाहेर पिंपळाच्या झाडाखाली खंडोबाचे स्थान, मारुती व एक मुंजा आहे.
जुन्या काळात पुण्याभोवती तटबंदी होती. त्यामध्ये केदारवेस, कुंभारवेस आणि मावळवेस अशा तीन वेशी होत्या. कासार विहिरीलगतच्या श्री केदारेश्वराच्या मंदिरावरून केदारवेस हे नाव रूढ झाले होते.श्री केदारेश्वर मंदिर.
संदर्भ :
मुठेकाठाचे पुणे – प्र.के. घाणेकर
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले
पत्ता :
https://goo.gl/maps/hdUS2KzMCdU57Rv88
आठवणी इतिहासाच्या