महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,27,265

केळेश्वर मंदिर, भोर्डी

By Discover Maharashtra Views: 1397 5 Min Read

केळेश्वर मंदिर, भोर्डी, ता.वेल्हे –

भारतीय संस्कृतीत दैवतांच्या मूर्तीच्या पूजा केली जाते. सृष्टीची निर्मिती,संवर्धन व संहार ही वेगवेगळ्या देवांकडुन केले जाते अशी समाज मनाची ठाम धारणा आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरूवातीला देखील निर्माण  देवता म्हणून पूजन केले जायचे. मानवी जीवनात येणारी सुख दुःख ही परमेश्वर रचना असल्याचे हिंदू समाजाची धारणा असले कारणांमुळे सुखी जीवनासाठी आराधना करून त्यांस प्रसन्न करण्याचे प्रकार पूर्वंपार चालू असल्याचे दिसून येते. सृष्टीचा निर्माता ब्रम्हदेव असला तरी संहार मात्र शंभू महादेव या दैवताकडे आहे.(केळेश्वर मंदिर, भोर्डी)

भारतात शंभू महादेवांची बारा स्थळे म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग ही भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. याच प्रमाणे प्रत्येक गावात ग्रामदेवताच्या मंदिरा प्रमाणेच महादेव मंदिर देखील असते. विशेषतः महाराष्ट्रातील बहुतांश गावात महादेवाचे मंदिर आढळून येते, त्याच प्रमाणे गिरी शिखरावर देखील प्राचीन अशी शिव मंदिरे आहेत. काही ठिकाणी महाकाल, अर्धनारी नटेश्वर आणि विविध रुपात महादेवाची पूजा व आराधना केली जाते. ग्रामीण लोक जीवनात शंभू महादेवाच्या उपासनेचे अन्यय साधारण महत्त्व प्राचीन काळापासून आहे. वेद, शास्त्र व पुराण इत्यादी ग्रंथात महादेवांच्या महतीचे सखोल विश्लेषण आढळून येते.

असे माहत्म्य असलेल्या महादेवाचे प्राचीन, सुरेख व अपरिचित असलेले पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील भोर्डी या गावी देखील एक मंदिर आहे. वेल्हे तालुक्यातील नवीनच प्रसिद्धीस आलेले निसर्गरम्य मढे घाट हे वेल्हे या तालुक्याच्या गावापासून सुमारे सोळा कि. मी. अंतरावर आहे.वेल्हे गावाच्या उजव्या बाजूलाच असलेला शिवप्रभूंच्या स्वराज्यातील पहिला तोरणा किल्ला आपला गौरवशाली गतकाळ मूकपणे व्यक्त होताना दिसतो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांनी वेढलेल्या या तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले असल्याचे पदोपदी जाणवते.

वेल्ह्यापासून नागमोडी वळणे व लहान लहान तीन घाट चढ उतार उतरून आपल्याला केळद या गावी यावे लागते. घनदाट वृक्षराईंने आच्छादलेले डोंगर पाहून नक्कीच डोळ्यां बरोबरच शरीरास देखील गारवा, शितलता जाणवते.रस्त्याच्या दुतर्फा कारवी व रंगीबेरंगी रानफुलांचे सौदंर्य पहाताना सृष्टीवर स्वर्ग उतरल्याचा याची देही याची डोळा पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळते. दर सात वर्षांनी कारवीस निळी फुले येत असतात. संपूर्ण द-या खोरे निळ्या रंगाची शाल पांघरूण बसल्याचा भास झाल्या शिवाय राहत नाही. केळद गावात प्रवेश करण्या पूर्वी उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता जातो.येथून सुमारे दोन कि. मी. अंतरावर २०/२५ घरांचे निसर्ग संपन्न ग्रामीण जीवनाचे अस्सल भोर्डी हे गाव आहे.

झाडे झुडपे, हिरव्यागार वेलींच्या छायेत लपलेली तीव्र उताराची, कुडाच्या बांधणीने बंदिस्त केलेली घरे लवकर दृष्टिक्षेपात येत नाहीत. गावातील तरूण वर्ग नोकरी धंद्यासाठी शहरात गेलेला. गावात फारशी हालचाल जाणवणार नाही कारण, जे गावात राहतात ते सर्वजन गाय गुरांना शेतात घेऊन गेलेले किंवा शेतीच्या उद्योगात गुंतलेले. स्वच्छ गायीच्या शेणाने सारवलेली घरातील जमीन पाहुण्यांचे स्वागत मनापासून करीत असल्याचे जाणवते. भोर्डी गावातील वस्ती पासून पश्चिमेस काही अंतरावर मोठमोठ्या गर्द वृक्षराजींने वेढलेले केळेश्वराचे मंदिर अगदी जवळ पोहोचलो तरी दृष्टीपथात येत नाही. भोर्डी गावातच काही हालचाल जाणवत नाही तर या मंदिरात वर्दळ आढळणार कोठून ? एक मात्र नक्की, झाडांच्या फांद्या वरून फिरणा-या इवल्याशा खारूताई, आपल्या अस्तित्वाची वेगवेगळ्या आवाजात जाणीव करून देणारे विविध पक्षी यांची मांदियाळी केळेश्वराच्या परिसरात प्रामुख्याने आढळून येत.

साधू संतांना तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात जाण्याची गरज येथे आल्यावर संपते. पूर्वाभिमुखी मंदिराचा जिर्णोद्धार सुरू असल्याचे दिसून येते. इतक्या दुर्गम भागात देखील विकास नावाचा काॕक्रिटचा भस्मासूर घुसला आहे. भोर्डीचे पोलिस पाटील व मंदिराचे पुजारी श्री.जंगम सांगतात की, केळेश्वराचे छोटेखाणी दगड / सागवानी लाकडातील मंदिर प्रशस्त नसल्याने हे नवीन बांधकाम सुरू केले आहे. सुधारणेच्या नावाने प्राचीन वारसा स्थळे नष्ट होत असल्याचा हा ढळढळीत पुरावाच म्हणावा लागेल.

सभामंडप व गर्भगृह अशी ह्या मंदिराची रचना आहे. गर्भगृहात भगवान शंभू महादेवाची पिंडींचे दर्शन घेताना भाविकाला एक वेगळी अनुभूती येते. नैराश्याचे मळभ एका क्षणार्धात दूर करून चैतन्यमय उर्जेचा संचार करणारे हे ठिकाण आहे. अनेक प्रसिद्ध शिवालये ही भाविकांच्या / व्यावसायिकांच्या कोलहालात हरवलेली आहेत. भोर्डीतील नागरिकांची नवसाला पावणारा केळेश्वर हा श्रदास्थान आहे. वर्षभरात अनेक उत्सव ग्रामस्थ साजरे करतात. मंदिराच्या उजव्या बाजूस एक चौकोनी लहान बारवे सारखे बांधकाम असून तेथे देखील सुबक शिवपिंडी आहे. केळेश्वरचे पुजारी सांगतात की, ते केळेश्वराचे स्नानगृह आहे.

केळेश्वर मंदिर, भोर्डी मंदिराच्या आजूबाजूला अनेक भल्या मोठ्या वीरगळी आहेत. बहुतेक वीरगळी ह्या गोरक्षण करणाऱ्या अज्ञात वीरांच्या असून इतरांच्या बाबत तज्ज्ञांनी विश्लेषण करून प्राचीन इतिहासाची माहिती सर्वसामान्य घटकांपर्यत पोहोचविणे जरूरीचे आहे. दगडी रांजणाच्या आकाराचे मातीत अर्धवट गाडलेले दोन दगड आहेत. आजूबाजूच्या झाडांच्या परिसरात दगडी चौथरे व वेगवेगळ्या आकारातील कोरीव दगडी चिरे काही तरी सांगत असल्याचा भास होतो. दगडी शिल्प शास्त्रातील तज्ज्ञांनी यावर आपले विचार व्यक्त केले तर आपला भूतकाळ समाजण्यास मदत होईल. भाविकांना आत्मिक सुख देणाऱ्या केळेश्वराच्या परिसरात नक्कीच ऐतिहासिक घटना झालेल्या असतील याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. याबाबत कोणाकडेही काही सबल साधने /पुरावे असतील त्यांनी ती सार्वजनिक करणे गरजेचे आहे.

© सुरेश नारायण शिंदे,भोर

Leave a Comment