महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,36,352

केळकर स्मारक, पुणे | Kelkar Memorial

By Discover Maharashtra Views: 1343 2 Min Read

केळकर स्मारक | Kelkar Memorial –

श्री अष्टभुजा दुर्गा मंदिराशेजारच्या मुठेकाठच्या रस्त्याने आपण ओंकारेश्वराच्या पुढे असलेल्या दशक्रिया विधी करायच्या घाटाजवळ आलो की,रस्त्याच्या पातळीवर थोडं पुढे उजवीकडे एका खोलगट हौदासारख्या भागात गंगाधर केळकर यांचे अतिशय देखणे स्मारक आहे. पुण्यातील प्रख्यात नेत्रशल्यतज्ज्ञ डॉ. केळकर आणि कवी अज्ञातवासी म्हणजे राजा केळकर संग्रहालयाचे संस्थापक दि.गं. केळकर यांचे श्री. गंगाधर केळकर हे पूर्वज आहेत.

मध्यभागी असणाऱ्या चौकोनी चौथऱ्यावार दोन टप्प्यांत असलेला अष्टकोनी चौथरा आणि त्यावर एक शिवपिंडी आणि या मध्यवर्ती स्मारक स्तंभाच्या बाजूंवर ओंकार चिन्हे व संगमरवरी माहिती फलक आहेत. या मुख्य स्तंभाच्या चारही बाजूंना कमी उंचीचे चार चौकोनी स्तंभ आहेत. त्यांवर काही देवदेवतांची शिल्पे कोरलेली आहेत. या स्मारकातील मध्यवर्ती स्तंभाच्या चारही दिशांना खालच्या टप्प्यात आणि चारही उपदिशांना वरच्या टप्प्यात संगमरवरी पाट्यांवर मजकूर लिहिलेला आहे.

उत्तरेकडे,’॥श्री ॥ तीर्थस्वरूप गंगाधर रघुनाथ केळकर यांचे पुण्यस्मरणार्थ’असा मजकूर आहे.
पश्चिमेकडे,’जन्मतिथि शनिवार फाल्गुन शु. ५ शके १७७६ ता. ४ मार्च १८५४’असा मजकूर आहे.
पूर्वेकडे,’देहावसान स्वगृही पुणे सोमवार नागपंचमी निजश्रावण शु. ५ शके १८५० ता. २० ऑगस्ट १९४८’असा मजकूर आहे.
दक्षिणेस,’वास्तव्य शांतिकुंज जाईचे गेटाजवळ सदाशिव पेठ पुणे शहर’असा मजकूर आहे.

स्मारक स्तंभाच्या वरच्या अष्टकोनात उपदिशांना असलेले मजकूर पुढीलप्रमाणे आहेत.

आग्नेयेस,’ॐ हा स्तूप भास्कर व दिनकर यांनी आपल्या वडिलांचे दहनभूमीवर डिसेंबर १९२८ मध्ये बनविला’ असा मजकूर आहे.
नैऋत्येस,’॥श्री ॥ तीर्थरूप गंगाधर रघुनाथ केळकर यांचे पुण्यस्मरणार्थ’असा मजकूर आहे.
वायव्येस,’ॐ परं ब्रह्म परं धाम,पवित्रं परमं भवान ॥,गीता अ. १०.१२’असा मजकूर आहे.
ईशान्येस,’ॐ नमो नमस्तेऽस्तु सहस्र कृत्वः,पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥, गीता अ. ११-३९’असा मजकूर आहे.

आग्नेयेकडील स्तंभावर उत्तरेस धनुर्धारी,पूर्वेस केशवविष्णू,दक्षिणेस गरुड व पश्चिमेस रुक्मिणी अशा मूर्ती आहेत.
नैऋत्येकडील स्तंभावर उत्तरेस विठोबा,पूर्वेस मारुती,दक्षिणेस माधवविष्णू,पश्चिमेस धनुर्धारी अशी शिल्पे आहेत.
वायव्येकडील स्तंभावर उत्तरेस मुरलीधर,पूर्वेस गणपती,दक्षिणेस धनुर्धारी,पश्चिमेस विष्णू असे शिल्पांकन दिसते.
ईशान्येकडील स्तंभावर उत्तरेस मुरलीधर,पूर्वेस माधवविष्णू,दक्षिणेस २ हात कमरेवर व २ हात वर केलेली मूर्ती,
पश्चिमेस मोर व सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.

परंतु या स्मारकाच्या हौदासारख्या भागात पाणी साचून खूप दुर्गंधी पसरलेली आहे . हे स्मारक अतिशय डौलदार आहे, पण त्याची स्वच्छता व्यवस्थित न ठेवल्यामुळे लोकांचे दुर्लक्ष होत आहे.

संदर्भ:
मुठेकाठचे पुणे – श्री. प्र. के. घाणेकर

पत्ता :
https://goo.gl/maps/NvLaQLCTEVNPSRsC6

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment