महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,06,371

केळवे बुरूज | Kelve Buruj

Views: 3638
2 Min Read

केळवे बुरूज

पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. पश्चिम रेल्वेवरील केळवे स्थानकापासून ९ कि.मी व केळवे गावातून १ कि.मी. वर दांडा खाडी आहे. केळवे शितलादेवी मंदिरावरुन बाजाराकडून पुढे जाताना दांडाखाडी पूल ओलांडण्यापुर्वी डाव्या हातास स्मशान दिसते या स्मशानाच्या कुंपणाला लागुनच केळवे/दांडा फुटका बुरूज पहावयास मिळतो. हा बुरूज म्हणजे गोलाकार आकाराचा टेहळणीचा एकांडा शिलेदार. या बुरुजाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने व उध्वस्त अवस्थेत असल्याने हा केळवे अथवा दांडा खाडीच्या नावाने केळवे/दांडा फुटका बुरूज म्हणूनच ओळखला जातो.

दांडा खाडीच्या मध्यभागी असणारा हा बुरूज खाडीतील साचत जाणाऱ्या गाळामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत ८ ते १० फुट उंच दिसणाऱ्या या बुरुजाची मूळ उंची २० ते २५ फुट असावी. गोलाकार आकाराच्या या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड, चिखलमाती, शंखशिंपले यांचा वापर करण्यात आला आहे तर वरील भागातील बांधकामात घडीव दगडांचा वापर केला आहे. वर चढण्यासाठी पायऱ्या नसल्या तरी पायाबरोबर हातांची मदत घेऊन वर चढता येते. दांडा किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी केळवे/दांडा फुटका बुरूजनिर्मिती केली होती. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा.

साधारणतः १६व्या शतकात ह्या भागातील इतर गढीकोटाबरोबर हा बुरुजही पोर्तुगिजांनी बांधला. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. पोर्तुगीजानी उभारलेल्या या वखारी व टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक तेव्हा सरंक्षण व रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. बुरूज छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment