महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,580

केळवे माहीम | Kelve Mahim Fort

Views: 3758
4 Min Read

केळवे माहीम | Kelve Mahim Fort

पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे अथवा पालघर स्थानकात उतरुन १० कि.मी.अंतरावर असलेल्या माहीम गावात रिक्षाने अथवा एस.टी.ने जाता येते. माहीममध्ये शासकीय दवाखान्याच्या मागे माहिमचा किल्ला (Kelve Mahim Fort) आहे. या गावातच महिकावती देवीचे मंदिर असुन या देवीच्या नावावरूनच या गावाला माहीम हे नाव पडले आहे.

माहिम किल्ल्याच्या पश्चिमेस समुद्र व दक्षिणेस माहिमची खाडी आहे. प्राचीनकाळी समुद्राचे पाणी किल्ल्यास भिडत असे, त्यावेळी किल्ल्याचा आकार बराच मोठा होता. खाडीचे पाणी पश्चिमेकडून गडाचे संरक्षण करीत असे. सध्याचा किल्ला हा बालेकिल्ला असून इतकेच काय ते अवशेष सध्या उरले आहेत. किल्ल्याच्या बाहेरील बाजूस मुलांना खेळण्यासाठी छोटेसे उद्यान आणि भवानी देवीचे मंदिर आहे. बाहेरून पाहताना हा किल्ला एखाद्या जहाजासारखा दिसतो. संपुर्ण किल्ल्याचे क्षेत्रफळ जेमतेम १ एकर असावे. ह्याची तटबंदी दगड व चिकट माती वापरून बनवली आहे. पूर्वाभिमूख प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केल्यावर डाव्याबाजूस उध्वस्त वास्तूचे अवशेष असून, उजव्या बाजूस तटामध्ये एक खोली आहे. प्रवेशद्वारासमोर एक सुंदर जिना आहे. या जिन्याकडे जाताना उजव्या हाताला एक कोरडी विहिर होती पण किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गमित्र निखील सुरी याने येथील स्थानिकांची मदत घेऊन या विहिरीतील गाळ काढून आणि साफसफाई करून त्यातील पाणी पिण्याजोगे बनविले आहे.

किल्ले वसई मोहिमे अंतर्गत या किल्ल्याचे दुर्ग संवर्धनाचे काम चालू आहे. जिन्यावर चढून गेल्यावर आपण फांजीवर पोहोचतो. त्यावरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारता येते. जिन्याच्या टोकाला दूसरे प्रवेशद्वार आहे. ते ओलांडून गेल्यावर आपण किल्ल्याच्या मागच्या पचकोनी भागात प्रवेश करतो. या भागात तटबंदीत अनेक झरोके आहेत. त्यांचा उपयोग टेहाळणीसाठी व तोफा ठेवण्यासाठी केला जात असे.

किल्ल्याच्या इतिहास असा की केळवे माहिमचे मुळ नाव मत्स्यमत्‌ , त्याचे पुढे झाले महिकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने तेराव्या शतकात दमणपासून वाळकेश्वर पर्यंतच्या समुद्र किनार्यातवर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात माहिमचा मुळ किल्ला बांधण्यात आला. पुढील काळात सरदार भिमराव याने हा किल्ला ताब्यात घेतला. १४ व्या शतकात हा गड गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात गेला. इ.स १५३४ मध्ये पोर्तुगिजांनी हा गड जिंकून घेतला व त्याची डागडूजी करुन त्यास मजबूती आणली. सन १६१२ मध्ये मुघलांनी हा जिंकायचा असफल प्रयत्न केला. ह्या किल्ल्याचा पोर्तुगीज कागदपत्रात सन १६३२ मधला एक संदर्भ सापडतो. ह्या किल्ल्यात एक अधिकारी, दहा सैनिक, एक निरीक्षक, चार शिपाई, दहा काळे सैनिक व एक मदतनीस असल्याचे म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांनी इ.स १६८४ मध्ये माहिमवर हल्ला चढविला होता, पण वेढा देऊन बसण्या इतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे किल्ला ताब्यात आला नाही. इ.स १७३७ साली मराठ्यांनी माहिम किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी मराठे व पोर्तुगिज यांच्यात मोठी लढाई झाली. मराठ्यांची संख्या कमी होती, त्यातच रामचंद्रपंत यांच्या हाताला गोळी लागल्यामुळे मराठ्यांनी माघार घेतली त्यात अनेक मराठे ठार झाले. ९ जानेवारी १७३९ रोजी चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजीपंत व आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करुन त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि ह्या भागातून पोर्तुगीजांचे बस्तान कायमचे उठले. इंग्रजांनी जिंकून घेईपर्यंत हा किल्ला सन १८१८ पर्यंत मराठ्यांकडे होता. १८६२ पर्यंत येथे ठाण्याच्या जिल्हाधिकार्यायचा बंगला होता.

माहीम व केळवे परिसरातील व्यापारामुळे ह्या किल्ल्याला महत्व प्राप्त झाले होते. किल्ला पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment