केसरी वाडा, पुणे –
केळकर रस्त्यावर प्रभा विश्रांती गृहाच्या समोर आहे केसरी वाडा. पुर्वी गायकवाड वाडा म्हणून ओळखली जाणारी हि वास्तू पुढे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या वास्तव्याने केसरी वाडा म्हणून ओळखली जाऊ लागली.
इ.स. १९०५ मध्ये बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्याकडून नारायण पेठेतील हा वाडा केसरीच्या कचेरीसाठी आणि निवासासाठी लोकमान्य टिळकांनी विकत घेतला. पश्चिमेच्या भागात केसरीचे ऑफिस आणि छापखाना व पुर्वेकडील भागात निवास अशी त्याची व्यवस्था होती. निवासासाठीचा भाग त्यांनी स्वतः आराखडा तयार करून आपल्या सोईप्रमाणे बांधून घेतला. इमारतीच्या डाव्या बाजूच्या खोलीत त्यांची अभ्यासिका आहे. याच अभ्यासिकेतून त्यांनी केसरीचे अग्रलेख संपादीत केले. अनेक महत्वाच्या व्यक्तींच्या भेटी गाठी, स्वातंत्र्यलढ्याची दिशा ठरविण्याचे काम याच अभ्यासिकेत झाले.
लोकमान्यांच्या हयातीत त्यांच्या समोर बसून तयार केलेला पुर्णाकृती पुतळा या अभ्यासिकेत स्थापित केला आहे. कै. केशव बाबुराव लेले या १८ वर्षांच्या तरुणाने जुलै १९१९ मध्ये म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या निधनापुर्वी १ वर्ष मुंबईत लोकमान्यांच्या समोर बसून घडवलेला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा इतर पुतळ्यांप्रमाणे उभ्या राहिलेल्या रुपात नसून खऱ्याखुऱ्या आरामखुर्चीत वर्तमानपत्र वाचत असलेल्या रुपात घडविला आहे. लेले कुटुंबियांनी १०० वर्ष अत्यंत आत्मियतेने जपलेल्या या पुतळ्याची स्थापना जिर्णोद्धार केलेल्या लोकमान्यांच्या निवासस्थानी दि. २३ जुलै २०२१ रोजी करण्यात आली.
मधल्या मोकळ्या पटांगणात गणेशोत्सवातील कार्यक्रम आणि विविध सभा, समारंभ आजही होतात. समोर संग्राहलय आहे. संग्रहालयात प्रवेश करण्यापूर्वी बाहेरचा टिळकांचा तेजस्वी पूर्णाकृती पुतळा नजरेस पडतो. त्यापुढे गणपतीची धातुमूर्ती आहे. जिन्याजवळ ‘केसरी’चे जुने छपाईयंत्र ठेवलेले दिसते. हाताने फिरवून केसरीचे पहिले अंक त्या यंत्रावर छापले गेले होते.
वरच्या मजल्यावरील संग्रहालयात लोकमान्यांच्या वापरातील वस्तू, फोटोज्, त्यांना मिळालेली मानपत्र, त्यांचे हस्ताक्षर, त्यांच्या रक्षा, अस्थिंचा अंश अशा अनेक गोष्टी जपून ठेवल्या आहेत. श्री. सुहास बहुलकर यांनी काढलेलं टिळकांचे पूर्णाकृती तैलचित्र आणि शिसवीच्या लाकडात कोरीवकाम असलेले टेबल ज्याच्यावर काचेच्या पेटीत चंदनाच्या डबीत लोकमान्यांच्या रक्षा अस्थींचा अल्पांश ठेवलेला आहे. भारतीय ध्वज परंपरेतील महत्वाचा असा ध्वज जो मादाम कामा यांनी २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीतील स्टुटगार्ड येथे आपल्या भाषणापुर्वी फडकवला होता, तो इथे जपून ठेवलेला आहे.
रत्नागिरीमधील लोकमान्य टिळकांच्या जन्मघराचा फोटो, त्यांच्या राजकीय-सांस्कृतिक व कौटुंबिक जीवनांतील काही फोटो, त्यांना मिळालेली अनेक मानपत्रे व ते ठेवण्याचे चांदीचे करंडक, टिळकांची अनेक चित्रकारांनी काढलेली चित्रे, लोकमान्यांचे सुविचार व विचारधन स्पष्ट करणाऱ्या ओळी, इतरही काही नेत्यांची पत्रे, लोकमान्यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारतीय पोस्ट खात्याने काढलेले दुर्मीळ टपाल तिकिट, नाणे, लोकमान्यांच्या मुंबईतील अंत्ययात्रेचे दर्शन घडवणारी क्षणचित्रे, मुंबईच्या चौपाटीवरील टिळक पुतळा व पुण्याच्या मंडईतील टिळक पुतळा यांची चित्रे येथे पाहायला मिळतात. ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मंजूर होताच, त्याच्या प्रतीवर केसरीचे लंडनमधील तत्कालीन प्रतिनिधी श्री.द.वि.ताम्हनकर यांनी इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांची स्वाक्षरी घेतलेली प्रतही इथे पाहायला मिळते.
संदर्भ:
मुठेकाठचे पुणे – प्र. के. घाणेकर
पत्ता :
https://goo.gl/maps/JrbDJh7SCFZZ6SAY8
आठवणी इतिहासाच्या