महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,10,326

केशवराज मंदिर, आसूद, दापोली

Views: 1423
3 Min Read

केशवराज मंदिर, आसूद, दापोली –

या ठिकाणी गेलो ही भावनाच माझ्यासाठी अत्यंत सुखद आहे. मागच्या वर्षी कोकणात जाऊन आल्यानंतर या मंदिराविषयी माहिती मिळाली. तेव्हापासून या ठिकाणाचा सारखा ध्यास घेतलेला. दापोली भागात कधी जाणं झालं तर आधी इथे जायचं असं मनाशी ठरवून टाकलं होतं. दापोली हर्णे रस्त्यावर दापोलीपासून साताठ किमीवर उजवीकडे खाली तळांत आसूद गाव आहे. तिथल्या तीव्र उतारावर वसलेल्या दाबकेवाडीपर्यंत गाडी जाते. या दाबकेवाडीतून पायऱ्या उतरून, छोट्याशा भातखंडी नदीवरचा पुल पार करून, आणि मग दीडदोनशे पायऱ्या चढून केशवराज मंदिरापर्यंत पोचायचें. जितकं सुंदर मंदिर तितकी सुंदर वाट. दुतर्फा माडा – पोफळीच्या गच्च बागा. आंबा, काजू, फणस, साग इत्यादींच्या गर्द झाडींतून जाणारी पायऱ्यांची रम्य वाट. खंड्या, भारद्वाज, सुतारपक्षी, कोकिळा इ. पक्ष्यांचे मधुर गुंजन. भातखंडी नदीवरच्या नवीन सिमेंटच्या पुलाशेजारी जुन्या लाकडी साकवाचे अवशेष. गर्द झाडीत लपलेली जुनी दगडी धर्मशाळा आणि केशवराजाचे प्राचीन देवालय. अतिशय सुंदर, अद्भुत, गूढरम्य परिसर.

केशवराजाचे मंदिर किती जुने आहे याची माहिती नाही. पांडवांनी एका रात्रीत बांधल्याची आख्यायिका या मंदिरालाही चिकटलेली आहे. कोणी म्हणतं हजार वर्षांपूर्वीचे आहे, कोणी म्हणतं पेशवेकाळातलं आहे. मात्र बांधकाम पाहून मंदिराचा निर्मितीकाळ ठाम सांगता येत नाही. पत्रे-फरश्या लावून, रंग देऊनही मंदिराचे सौंदर्य लुप्त झालेले नाही. मूळ बांधकाम आणि आजूबाजूचा परिसरच इतका अप्रतिम आहे की इथे येणाऱ्या प्रत्येकाला ते मोहवून टाकते. मंदिरासमोरच्या दगडी गोमुखातून बारा महिने अमृततुल्य पाणी वाहत असतं. वरच्या आंब्याच्या बुंध्यातून जिवंत झऱ्याने हे पाणी येत असतं. अमृततुल्य म्हणजे काय असतं ते हे पाणी प्यायल्यावर कळतं. येथे हातपाय तोंड धुवून मग मंदिरात जायचं. अंधाऱ्या गाभाऱ्यात दोन्ही बाजूला टांगलेल्या दोन समयांच्या प्रकाशात श्रीविष्णूची मोहक मूर्ती. सामान्यपणे विष्णू मंदिरे मानवी वस्तीत असतात व शंकराची मंदिरे ही वस्तीबाहेर, निर्जन ठिकाणी असतात. मात्र हे केशवराजाचे म्हणजेच श्रीविष्णूचे मंदिर याला अपवाद आहे. वस्तीपासून लांब, शांत, गूढ जागी असलेले. कार्तिक महिन्यात होणाऱ्या उत्सवाशिवाय या परिसरात कोणीच रात्री मुक्काम करत नाही. काही शहरी, शिक्षित लोकांना इथे रात्री विचित्र अनुभव आलेले आहेत. एक अनुभव मी स्वतः वाचलेला आहे. या परिसराविषयी मी इतका भारावून गेलेलो आहे की यथार्थ वर्णन करायला मला शब्द सुचत नाहीये.

‘गारंबीचा बापू’ ! श्री.ना.पेंडसेंची लोकप्रिय कादंबरी. ही कादंबरी याच परिसरात घडली. गारंबी म्हणजे आसूद गावचा आणि या मंदिराचा परिसर. गारंबी नावाचे गाव प्रत्यक्षात नाहीये. हा सगळा परिसर डोळ्यांसमोर ठेवून श्री.ना.पेंडसेंनी ही कादंबरी लिहिली. या परिसरात येताना विशेषतः पुलावर येताना आपल्या डोळ्यांसमोरही ‘गारंबीचा बापू’ येते. ज्यांनी ही कादंबरी वाचली नाही त्यांनी जरूर वाचा. काय स्टोरी आहे राव. ‘किक’ मिळते वाचून. हिरो असावा तर बापूसारखा. कादंबरीवर त्याच नावाचा चित्रपट येऊन गेला. काशिनाथ घाणेकरांची मुख्य भूमिका आहे त्यात. त्या चित्रपटाचे चित्रीकरणही याच भागात झाले. चित्रपटही लोकप्रिय आहे. युट्युबवर आहे. पण कादंबरी अधिक जबरदस्त आहे. आधी कादंबरी वाचा मग चित्रपट पहा. योगायोग म्हणजे मी केशवराज, आसूदला गेलो तेव्हा माझ्यापाशी मी घरून सोबत आणलेली ‘गारंबीचा बापू’ कादंबरी होती ! तिथे असताना अचानक हे लक्षात आले. मग काय, तिथल्या पार्श्वभूमीवर कादंबरीचे फोटो काढले. अविस्मरणीय अनुभव. मला इथे अनेकदा यायचेय, तिन्हीत्रिकाळ हा परिसर अनुभवायचा आहे.

प्रणव कुलकर्णी.

Leave a Comment