केशवराव जेधे –
स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणारा व मातीशी इमान राखणारा वारसा –
केशवराव जेधे यांचा जन्म 21 एप्रिल, 1896 रोजी पुण्याच्या पूर्व भागातील गुरुवार पेठेत झाला. तत्कालीन भोर संस्थानातल्या रोहिडखोर्यातील कारी व आंबवडे हे जेधे घराण्याचे मूळ गाव. या घराण्यातील भानजी नाईक यांना बेदरच्या बादशाहने देशमुखी बहाल केली होती. भानजी नाईक यांचे सुपुत्र म्हणजे कान्होजी नाईक. स्वराज्यावर अफजलखान नावाचे संकट चालून आल्यावर कान्होजींनी आपल्या पाचही मुलांसोबत स्वत:च्या वतनावर पाणी सोडले व स्वराज्यनिष्ठा व्यक्त केली. त्यांनी शाहाजी राजांना बेलरोटीवर दिलेला शब्द पाळला.
कान्होजी नाईक यांची प्रतापगड युद्धावेळी शिवाजी महाराजांना दिलेली साथ ही जेधे कुळाचा वैभवशाली वारसा म्हणावा लागेल. कान्होजींचा पुत्र बाजी हा सुद्धा खूप शूर. खळद-बेलसर येथे झालेल्या स्वराज्याच्या पहिल्या लढाईत शिवाजीराजांचे ध्वज वाचवले ते बाजी जेधेंनी. इतकंच काय, लाल महाल छाप्यात शिवाजी महाराजांबरोबर होते, व जिंजीच्या वेढ्यात राजाराम महाराजांना बाजीने हिरीरिने साथ दिली होती. स्वराज्याच्या मार्गात उभे ठाकणार्यांना खड्यासारखे दूर सारण्याची परंपरा जेधे परिवारात आधीपासूनच चालत आली. ही परंपरा जपण्याची, जगण्याची आणि ती पुढे चालवण्याची जबाबदारी केशवरावांनी या महाराष्ट्रात स्वीकारली होती.
सतराव्या शतकात स्वराज्यासाठी सज्ज असलेल्या कान्होजी-बाजी या पिता-पुत्रांची वंशावळ कालांतराने इतरत्र पसरली. याच वंशवेलीच्या आंबवडे शाखेतील माणकोजी जेधे हे पुरंदर मधील सोनवरी येथे आले. माणकोजींचे पुत्र बाबाजी हे पुण्याला स्थायिक झाले. बाबाजींचे पुत्र मारुतीराव जेधे यांनी भागीदारीत भांड्यांचा कारखाना सुरू केला. जेधे मॅन्शन नावाची भव्य वास्तू घेतली. या जेधे मॅन्शन मध्ये मारूतीरावांचे चार पूत्र सखाराम, बाबुराव, बळवंतराव व केशवराव राहात. जेधे मॅन्शन या महाराष्ट्राच्या वैचारिक, सामाजिक, राजकीय घडामोडींची आणि चळवळींची साक्षीदार झाली.
~ देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन
Artwork by : Jitendra Sutar