सुखासनातील केवल शिव –
औंढा येथील नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर अभ्यासक भक्त शिल्पशास्त्राचे विद्यार्थी सर्वांसाठीच आकर्षणाचे ठिकाण आहे. या मंदिरावर विविध मूर्ती आहेत. त्यांचे आव्हान अभ्यासकांना नेहमीच राहिलेले आहे. सुखासनात बसलेली ही सुखासनातील केवल शिव मूर्ती. वरच्या हातात त्रिशुळ आणि सर्प आहे. या सर्पाचा फणा उगारलेला नसून खाली झुकलेला शांत असा दाखवला आहे. खालचे दोन्ही हात वरद मुद्रेत आहे. डाव्या खालच्या हातात काय आहे लक्षात येत नाही पण अगदी याच मूद्रेतील इतर एका ठिकाणी याचे वर्णन शक्ती असे देगलुरकरांनी केले आहे. अभ्यासकांनी यावर प्रकाश टाकावा. तसेच त्रिशुळाच्या जागी खट्वांग आहे अशाही सुखासनातील मूर्ती आहेत.
खाली बसलेला नंदीही मान खाली घालून शांत बसलेला आहे. शिवाच्या चेहर्यावरील भाव शांत आहेत. उजव्या पायाचा दूमडलेल्या पंजा शिल्पकाराने मोठा कलात्मक असा कोरलेला दिसून येतो. लांब कर्णभुषणे लक्ष वेधून घेतात. गळ्यात कमरेला पायात अगदी मोजकेच पण रेखीव अलंकार आहेत. एरवी शिवाचे अलंकार नागबंधादी किंवा उग्र असे दर्शवलेले असतात. हे बारकावे पाहिल्यावर हे शिल्पकार कुणी साधे पाथरवट नसून अभ्यासु साधना करणारे प्रतिभावंत असल्याची खुण पटते.
पुरूष देहाचे सौंदर्य वर्णन करताना कमरेचे वर्णन “सिंहकटी” असे केलेले असते. या वर्णनात वरील मूर्ती बरोबर बसते. शिवाची कटी तशीच दाखवली आहे. औंढा नागनाथाला भेट देणार्यांना विनंती आहे कृपया घाईघाईने दर्शन आटोपून निघून जावू नका. अप्रतिम असा शिल्प खजिना मंदिरावर आहे. कोरणार्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. तूम्ही डोळे भरून किमान पहा तरी.
छायाचित्र सौजन्य – Travel Baba Voyage.
-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद