महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,35,411

चावीच्या आकाराची विहीर

By Discover Maharashtra Views: 2984 8 Min Read

चावीच्या आकाराची विहीर (बदलापूर-देवळोली)

उत्तर कोकणातील ठाणे जिल्याला प्राचीन काळापासून म्हणजे सातवाहन त्यानंतर शिलाहार राजवटीत ऐतिहासिक महत्व होते. ठाणे जिल्यातील बदलापूर शहराच्या नजीक असलेल्या गावखेड्यात मिळालेल्या गधेघळ व अनेक शिलाहारकालीन वीरगळी व अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर पाहताना आपण एक हजार वर्षे मागे जातो. त्यानंतर थेट बदलापूर चा उल्लेख हा शिवकाळात व पेशवाईत आढळतो. शिवरायांनी रायरीपासून कल्याण भिवंडी हा मुलुख १६५७ साली घेतला. त्या नंतरच्या पेशवेकाळात १७३९ सालच्या वसईच्या स्वारीत बदलापूरचा उल्लेख आढळतो. अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर उभारताना , शिलाहारांचे राज्य घडताना, शिवछत्रपतीच्या घोड्यांच्या टापांनी कल्याण विजयाने आसमंत दुमदुमून टाकणारे आवाज ऐकताना, वसई स्वारीत पेशवाईच्या सहवासाने पावन झालेल्या ,मराठे- इंग्रज यांच्यात श्रीमलंगगडाचे १७८० सालचे घनघोर युद्ध घडताना बदलापूर-अंबरनाथ शहर व परिसरातील किल्ले , मंदिरे व इतर वास्तू हे सर्व इथे घडलेल्या घटनांचे मूक साक्षीदार आहेत. ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे आज आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या ह्या शहरांना इतिहासात किती अनन्यसाधारण महत्व होते याचा प्रत्येय यावा यासाठीचा हा खटाटोप. अशाच एका ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तूची चावीच्या आकाराची विहीर सफर आपण आज करणार आहोत.

बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस अवघ्या साडे सहा किमी अंतरावर देवळोली ह्या साठ घरांची वस्ती असलेल्या गावात एक वैशिष्ट्य पूर्ण विहीर आहे. गावात प्रेवेश केल्यावरच येथे हनुमंताचे एक मंदिर लागते ह्या मंदिरातील नवसाला पावणाऱ्या हनुमंताची मिशी असलेले रूप पाहून काहीतरी नवीन आणि वेगळं पाहिल्याचा प्रत्येय येतो.  सतराव्या शतकात बांधलेली ही विहीर आपले वैभव जपत इतिहासाच्या पाऊलखुणाचे दर्शन घडवते. ह्या विहिरीची खासियत म्हणजे ह्या विहिरीला असलेला आकार. लांबून पाहिले असता एक भलेमोठे शिवलिंग पहिल्यासारखे वाटते तर आकाशातून पाहिले असता एखाद्या कुलुपाला चावी लावायची जशी खाच असते अगदी त्याप्रमाणे भासते.समोरून एखादी मोठी चावी असल्याचे दिसते. ही विहीर पूर्णपणे दगडी चिऱ्यात पद्धतशीर एकमेकांची सांगड घालून बांधिली आहे. ही विहिर दक्षिण-उत्तर अशी बांधली गेली आहे. दक्षिणेकडील भाग हा निमुळता तर उत्तरेकडे गोलाकार आकारात आहे. विहिरीची एकूण लांबी ही जवळजवळ ४० फूट इतकी आहे आणि निमुळत्या सरळ भागाची लांबी ही २६ फूट तर रुंदी ही ८ फूट इतकी आहे. गोलाकार भाग हा साधारण १४ x१४ फूट इतका आकाराचा आहे. संपूर्ण विहिरीची उंची जमिनीपासून एक फूट इतकी आहे व खोली ही अंदाजे ३०-३५ फूट इतकी आहे(स्थानिकांच्या माहितीनुसार).

ह्या निमुळत्या भागातून आपण प्रवेश करून सरळ विहिरीमध्ये उतरू शकतो. ह्या विहिरीला एकूण सुबक अशा २२ पायऱ्या आहेत. पायऱ्यांची लांबी साडे तीन फूट रुंदी एक फूट व उंची ही आठ इंच इतकी आहे. पायऱ्या उतरून विहिरीच्या मधोमध आल्यावर अकराव्या पायरीला पूर्व-पश्चिम अशा दोन्ही बाजूस १.५ x १.२५ फूट आकाराचे व १ फूट खोलीचे सुबक कमान असलेले दोन कोनाडे आहेत. त्यावर तीन पाने असलेलं नक्षीकाम केलं आहे. ह्या कोनाड्यांचा उपयोग हा पूर्वी रात्रीच्या वेळी दिवे लावण्यासाठी केला जाई. काही बारव असतात त्यांनाही ह्या प्रकारचे कोनाडे पहायला मिळतात. हे पाहिल्यावर ह्या विहिरीचा सर्वात सुंदर भाग नजरेस येतो. अजून काही पायऱ्या उतरल्यावर समोरच एक नक्षीदार कलाकुसर केलेली अर्धकमान दिसते. कमानीवर दोन विरुद्ध दिशेला आठ पाकळ्यांची कमळफुले कोरलेली आहेत ती अवश्य पहावी. कमानीच्या पूर्व-पश्चिमेस अजून एक कोरीव काम केलं आहे व त्यावर देखील दोन छोटे फुलं कोरली आहे.

कमानीच्या वरच्या भागात ह्या विहिरीचा मुख्य आकर्षण असलेलं तीन शिल्पे कोरलेली आहे. ३.५ x २ फूट इतक्या आकाराच्या थोडं पुढे आलेल्या भागात १.५x१ फूट आकाराची तीन वेगवेगळे शिल्पे कोरलेली आहे. नीट निरीक्षण केल्यावर हे तिन्ही शिल्पे एकाच दगडात न करता वेगवेगळ्या कोरलेल्या आहेत आणि नंतर त्या एकमेकांना चिटकून ठेवल्या आहेत असे दिसते. तिन्ही शिल्पे अतिशय सुंदर आहेत. त्यांच्यावरील कोरीव काम हे वाखाणण्याजोगे आहे. मध्यभागी श्री गणेशाची बसलेल्या मुद्रेत सुबक मूर्ती कोरलेली आहे. श्री गणेशाच्या डाव्या बाजूचे शिल्प हे डावा पाय दुमडून उजवा पाय जमिनीला टेकून बसलेल्या स्थितीत आहे.त्या शिल्पाच्या उजव्या हातात एक धारदार शस्त्र पकडलेलं दिसत डावा हात मात्र तुटलेल्या अवस्थेत आहे.

तर श्री गणेशाच्या उजव्या बाजूस असलेलं हे शिल्प मांडी घालून डोळे बंद करून ध्यानस्थ मुद्रेत बसलेलं आहे.पण ह्या शिल्पाचे दोन्ही हात मात्र तुटलेल्या अवस्थेत आहे. ह्या दोन्हीही शिल्पांचे मुख हे जवळ जवळ सारखेच वाटतात. ह्या दोन्ही मूर्ती नक्की कोणाच्या आहेत हे कळतं नाही (कोणाकडे प्रमाण माहिती असल्यास नक्की सांगावी.ती नंतर ह्या लेखात जोडली जाईल). ह्या तिन्ही शिल्पांच्या समोर पूर्व-पश्चिम अशा दिशेला पुराणातील एक काल्पनिक प्राणी जो सिंहाप्रमाणे दिसतो तो म्हणजे “शरभ शिल्प” कोरले आहे. परंतू दुर्दैवाने ह्या दोन्ही शरभ शिल्पाचे मुख तुटलेल्या अवस्थेत आहे. तरीही हे शिल्प शरभाचे असावे असेच वाटते. हे शरभ शिल्प खूप साऱ्या किल्यांच्या दरवाजावर कोरलेले असते. ह्या विहिरीला बारमाही पाणी असते.पावसाळ्यात तर ही विहीर जमिनीच्या पातळी एवढी भरते. कमानीवर असलेलं सर्व शिल्प पावसाळ्यात बुडतात तर वरून  दुसऱ्या पायरीला पाणी स्पर्श करते. उन्हाळ्यात मात्र विसाव्या पायरी पर्यंत पाणी असते. म्हणून ही विहीर जर का व्यवस्थित पहायची असेल तर एप्रिल व मे महिन्यात यावे.

आता ह्या विहिरीची निर्मिती व इतिहास पाहूया. आजवर मिळालेल्या माहितीनुसार पेशवेकाळात थोरले बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा यांच्या १७३९ च्या वसई मोहिमेत कल्याण प्रांताच्या परिसरात पेशवे सैनिकांचे तळ पडले होते. ह्या ठिकाणी सैनिकांना व घोड्याना पाण्याची व्यवस्था व्हावी ह्या उद्देशाने आधी असलेल्या विहिरीचें नव्याने बांधकाम करण्यात आले. अशा भरपूर विहिरी खोदल्या गेल्या त्यातील ही एक विहीर असावी. विहिरीचे बांधकाम हे पेशवेकालीन शैलीतील वाटते. परंतू ही विहिर नक्की कोणी बांधली याचा उल्लेख असलेला कोणताही शिलालेख किंवा पुरावा मिळाला नाही. (ह्या विहिरीबद्दल अधिक प्रमाण माहिती कोणाकडे असल्यास माझ्या पर्यंत जरूर पोहचावावी ती नंतर ह्या लेखात जोडली जाईल)

आता ह्या विहिरीच्या आजच्या स्थितीबद्दल बोलूया. चार -पाच वर्षे आधी ही विहीर पडक्या वास्तू सारखी गावाच्या कोपऱ्यात पडलेल्या अवस्थेत होती. बांधकामाचे चिरे हे एकमेकांपासून विलग झाले होते.व आजूबाजूला खूप गवत माजले होते. पण आता येथील स्थानिकांच्या विशेष प्रयत्नाने विहिरीला तिचे हरवलेलं वैभव पुन्हा मिळाले आहे. विहिरीचे विलग झालेल्या दगडी चिरे सिमेंट मध्ये व्यवस्थित बांधले गेले. तसेच आजूबाजूला जे गवत माजले होते ते साफ करून आता तिथे गुलाबी , राखाडी, व पिवळ्या रंगाचे प्लेव्हर्स ब्लॉक्स बसविण्यात आले आहे. त्यामुळे विहिरीला आणखीनच सुंदर रूप मिळाले. विहिरीची अधूनमधून साफ सफाई केली जाते. फक्त विहीरीतील गाळ काढला गेला नाही. पूर्ण गाळ काढला तर विहिर स्वच्छ होईल तसेच विहिरीची एकूण खोली किती आहे हे ही कळेल. आणि आता ह्या ठिकाणी बसण्यासाठी बाकांची देखील व्यवस्था लवकरच येणार आहे. असे मला येथील ग्रामस्थांकडून कळाले. तेव्हा चावीच्या आकाराची विहीर ह्या वास्तूचे ग्रामस्थांकडून केले गेलेल्या संवर्धन कार्याचे कौतूक करावे तितके थोडकेच.

आपणही ह्या ऐतिहासिक घटनांचे मूक साक्षीदार असलेल्या ह्या विहिरीस जरूर भेट द्यावी. समर्थ रामदास स्वामींच्या ” जे जे आपणासी ठावे । ते ते दुसर्यासी सांगावे । शहाणे करून सोडावे सकळजन । ” ह्या उक्ती प्रमाणे माझ्या भटकंतीचा फायदा हा आपणांस व्हावा यासाठीचा हा लेखप्रपंच.

Vikas Zanje
Leave a Comment