महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,775

खंबीर ते हंबीरराव

Views: 5492
17 Min Read

खंबीर ते हंबीरराव…

हंसाजीराव मोहिते एक अस व्यक्तिमत्त्व ज्यांच्यावर इतिहासाने खूपच अन्याय केला. अत्यंत पराक्रमी, सुरमा, कर्तबगार अन निष्ठावंत व्यक्तिमत्त्व असूनही ज्याचं नाव शाळेतील पाठ्यपुस्तकात क्वचितच वाचायला मिळावं हे नक्कीच आपलं दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या शाळेच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात आपल्याला स्वराज्य निर्माण कसे झाले हे सांगितले गेले, त्याच ज्वलंत इतिहासामध्ये हंबीरराव मोहिते यांचे नाव जवळपास कवचितच आढळते ही खूपच दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल.

चला, आपण आज त्यांच्याबद्दल थोडस जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.

इतिहासात काही मोजकीच नावे अशी आहेत ज्यांनी दोन्ही छत्रपतींच्या कारकिर्दीत खूप मोठे पराक्रम गाजवले, हंबीरराव मोहिते हे त्यातीलच एक.

शहाजीराजे यांचे भोसले घराणे हे अत्यंत पराक्रमी अन कर्तबगार. दस्तुरखुद्द शहाजीराजे भोसले हे प्रथम निजामशाही मध्ये अन नंतर आदिलशाही मध्ये अत्यंत पराक्रमी सरदार होते. तसेच तळबीड च्या मोहिते घराण्यातील तुकोजी मोहिते हे तळबीड चे पाटील होते. त्यांना संभाजी मोहिते अन धारोजी मोहिते हे दोन पुत्र होते. दोघेही खूप कर्तबगार होते. संभाजी मोहिते हे आधीपासूनच शहाजीराजांच्या सैन्यात होते आणि धारोजी मोहिते यांनी शहाजीराजांच्या सैन्यात प्रवेश केला होता व तेव्हापासूनच भोसले घराण्याचे अन मोहिते घराण्याचे संबंध जवळचे झाले.

हेच हितसंबंध वाढवत शहाजीराजांनी शिवरायांचा दुसरा विवाह संभाजी मोहिते यांच्या कन्येशी म्हणजेच हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या अभिषिक्त महाराणी सोयराबाई यांच्याशी लावून दिला आणि भोसले व मोहिते घराण्यातील नाते अधिक दृढ केले.

तत्पूर्वी संभाजी मोहिते यांना हरिफराव, हंसाजी आणि शंकराजी ही तीन मुले होती. हंसाजीराव यांचा जन्म तळबीड येथे १६४० साली मोहिते घराण्यात झाला असा बऱ्याच साधनांत उल्लेख आढळतो. परंतु त्यांचा जन्म हा हंसाजीराव हे व्यंकोजी राजांच्या समकालीन असल्याने १६३१ साली झाला असावा.आता घराण्यात सगळेच लढाऊ अन सैन्यात असल्यामुळे हंसाजीरावांना पहिल्यापासून युद्धकलेचे शिक्षण होते आणि त्यांना मुळात ती आवड देखील होती. हंसजीरावांचे बालपण सुप्याच्या गढीत गेले. लढाऊ वारसा असल्याने त्यांना अतिशय उत्तम प्रकारचे लष्करी शिक्षण मिळाले असावे आणि त्यांच्या अंगी प्रामाणिकपणा, स्वामिनिष्ठा, निडरता असे गुण असल्यामुळे ते सरसेनापती पदापर्यंत गेले.

हंसाजींचे वडील संभाजी हे शहाजी राजांसोबत कायम एकनिष्ठ राहिले. त्यांनी सालप्याच्या लढाईत शहाजीराजांना अनमोल साथ देऊन त्यांचं मन जिंकलं.

सण १६४६ मध्ये जेव्हा शिवरायांनी पुणे, चाकण इंदापूर हा प्रदेश स्वतःच्या अधिपत्याखाली आणला. अन सुपे या प्रदेशाची मागणी त्यांनी संभाजी मोहिते यांच्याकडे केली पण त्यास मोहितेंनी ठाम नकार दिला कारण त्या परगण्याचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी त्यांना शहाजीराजांनी दिलेली.

शिवचरित्र साहित्य खंड तिसरे “सुपे परगणा शुहुर सण १०५० म्हणजे मे १६५० मध्ये तो शहाजीराजांना मिळाला अन त्यानंतर त्याची जबाबदारी त्यांनी मोहित्यांकडे दिलेली. म्हणजेच पूर्वीपासूनच शहाजीराजे अन मोहित्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते.

संभाजी मोहिते यांनी आपल्या कन्येचा विवाह म्हणजेच सोयराबाई यांचा विवाह शिवरायांशी सण १६५० साली लावून दिला अन हे संबंध नात्यात बांधले गेले.

सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात स्वराज्याच्या इतिहासात एका ध्रुव ताऱ्याप्रमाणे चमकणारे हंसाजीराव यांनी स्वकर्तुत्वाने मोहिते घराण्याचे नाव इतिहासात अजरामर केले. शिवरायांसोबत राहून अन मोहिमा करून त्यांनी शिवरायांचे अत्यंत बारीकसारीक डावपेच अन अनेक गुण आत्मसात केले होते आणि पुढे स्वराज्याचे सरसेनापती म्हणून ते १६७४ साली रुजू झाले.

हंसाजीराव यांचा सैन्यात प्रवेश कधी झाला याचा निश्चित पुरावा आढळत नाही पण नेताजी पालकर यांच्या काळात ते सैन्यात होते अशा काही नोंदी आढळतात.

शिवरायांनी सरसेनापती हे पद १६४९ ला तयार लेले होते. स्वराज्याचे पहिले सेनापती बाजी पासलकर होते की माणकोजी दहातोंडे याबद्दल ठामपणे मी तरी सांगू शकत नाही, परंतु ज्या अर्थी स्वराज्य वृद्धी सुरू झाली अन १६४९ साली सरसेनापती हे पद निर्माण केले, त्यावरून तरी माणकोजी दहातोंडे हे पहिले सरसेनापती असावेत. दुर्दैवाने मराठा इतिहासात पहिल्या सेनापतीबद्दल समकालीन पुरावे उपलब्ध नसल्याने त्यांच्याविषयी जास्त माहिती उपलब्ध नाही. नेताजी पालकर हे स्वराज्याचे दुसरे सेनापती होते. १६५९ साली माणकोजी यांच्या मृत्यूनंतर नेताजी पालकर यांची सरसेनापती पदी नियुक्ती केली गेली.

त्यानंतर १६६० ला सिद्धीने पन्हाळ्याला वेढा दिला अन कुमक घेऊन येण्यास नेताजींना विलंब झाला व “समयास कैसे पावला नाहीत” अशा शब्दात राजे थोडेसे बोलले अन त्यांच्यात मतभेद झाले असे अनेक इतिहासकार म्हणतात. पण ते मतभेद झाले की ही एक शिवरायांची चाल होती यात बऱ्याच जणांची मतांतरे आहेत. त्यानंतर नेताजी पालकर हे आधी आदिलशाहीत अन नंतर मोगलाईत गेले. अन सरसेनापती हे पद रिक्त झाले.

त्यानंतर महाराजांनी महापराक्रमी अशा कुडतोजी गुजर म्हणजेच प्रतापराव गुजर यांची सरसेनापती या पदी नेमणूक केली. त्याविषयी आपण यापूर्वी सविस्तर अभ्यासले आहेच. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरीच्या लढाईत प्रतापराव अन त्यांच्यासोबत ६ मावळे कामी आले अन सरसेनापती हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले.

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेतृत्वाखाली हंसाजीरावांनी केलेल्या सेवेची तितकीशी नोंद ही समकालीन कागदपत्रांत आढळत नाही परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या “अग्निदिव्य” कादंबरीत प्रतापराव गुजर अन हंसाजीराव यांनी अनेक मोहिमा सोबत केल्याची नोंद आहे. उंबराणीच्या लढाईत हंसाजीरावांनी प्रतापरावांसोबत मोठा पराक्रम गाजवला होता.

प्रतापरावांचे निधन अन त्यानंतर हंसाजीरावांनी बहलोलखानाला लोळवले.

प्रतापराव नेसरीच्या युद्धात कामी आले त्यावेळी हंसाजीराव जवळच्या प्रदेशातच मोहिमेवर होते. प्रतापराव पडल्याची खबर कळताच हंसाजीरावांना खूपच दुःख झाले पण हे दुःख बाजूला सारत त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ते बहलोल खानावर चालून गेले त्याविषयी वर्णन ग्रँड डफ याने मराठ्यांची बखर यात पान क्रमांक ७७ वर “हंसाजी मोहितेच्या सैन्याने अतुलनीय पराक्रम केला अन त्यामुळे बहलोलखानाच्या सैन्याला पळ काढावा लागला. हंसजीरावांनी विजापूर पर्यंत आदिलशाही सैन्य ताणले कित्येक जण ठार केले, स्वराज्याला बरीचशी लूट मिळवून दिली. त्यावेळी एवढा मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शिवरायांनी वस्त्रे अन भूषणे देऊन फारच नावाजीस करून हंबीरी केली म्हणजेच हंबीरराव असा खिताब दिला आणि सरनोबती त्याजला करार करून वस्त्रे दिली. अन तेव्हापासून हंसाजी हे हंबीरराव म्हणून ओळखले जाऊ लागले.

सरनोबत होताच हंबीरराव यांनी एप्रिल १६७४ रोजी केंजळगड स्वराज्यात आणला.

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक ही महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. कारण संपूर्ण हिंदुस्थानात मोगली सत्तेचे वर्चस्व होते. अनेक यवनी सत्ता देशात होत्या. काही हिंदू राजे सुद्धा होते पण ते मुघलांचे मांडलिक होते. परंतु “एवढ्या म्लेंछ पातशाहीत एक मऱ्हाटा पातशहा झाला हे साधे नव्हे” असे वर्णन कृष्णाजी सभासद यांच्या समकालीन बखरीत आढळते.

राज्यभिषेकाची जोरदार तयारी सुरू होती पण राजांचे संपूर्ण लक्ष आपल्या लष्कराकडे होते. त्यावेळी मराठा सैन्याचा तळ चिपळूण ला होता. ९ मे १६७४ रोजी शिवरायांनी हंबीररावांच्या जुमलेदार, हवालदार अन कारकुनांना प्रशासकीय कारभाराबाबत पत्र लिहले होते अन त्या पत्रात सैन्याला कसे वागावे, रयतेसोबत कसा व्यवहार असावा याचे वर्णन केले होते. त्या पत्राची प्रत आजही उपलब्ध आहे.

आणि रायगडी ६ जून १६७४ रोजी पहाटे पाच वाजता शिवरायांच्या मस्तकावर सप्त नद्या अन सागरातून आणलेल्या जलाच्या धारा पडल्या. त्यावेळी हंबीरराव मोहिते हे दक्षिणेस हातात रौप्यकलश दुग्धापूर्ण घेऊन उभे होते. राज्यभिषेक सोहळ्यावेळी हंबीररावांना सरसेनापती म्हणून लष्करातील सर्व अधिकार दिले होते. यात सैन्याचे नेतृत्व, संरक्षण, वेतन, सैन्याच्या समस्या राजांच्या कानी घालणे, नवीन सैन्य भरती करणे या गोष्टी समाविष्ट होत्या अन सेनापतींचा आदेश सर्व सैन्याला, सरदारांना बंधनकारक राहील हे ठरवून दिले.

राज्यभिषेक सोहळ्यानंतर रायगडावर शिवरायांची भव्य अशी हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी हंबीरराव याना माहुतांचा मान मिळाला होता.

राज्यभिषेक सोहळ्यावेळी राजांनी हंबीरराव यांचा एक शिक्का अन मुद्रा तयार करवून घेतली होती ती मुद्रा अशी होती: “पहिली वाटोळी व श्रीमछीवमहानुभाव सेनाधीश हंबीरराव. आणि दुसरी “श्री शिवचरणी दृढभाव, सरलष्कर मोहिते हंबीरराव” अशी होती. या दोन्हीही मुद्रा वापरात होत्या.

हंबीररावांच्या मोहिमा

शिवरायांच्या राज्यभिषेक सोहळ्यानंतर सगळ्यात पहिली मोहीम म्हणजे पेडगावच्या शहण्याला येडा बनवले आणि एक कोटी होन व २०० अरबी घोडी लुटून रायगडी नेली अन राज्यभिषेक सोहळ्याला झालेला खर्च भरून काढला.

मोगलांवर स्वारी

शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला, बहादूरखानाला फसवून शिवरायांनी सुरतेकडे मोर्चा वळवला किंवा तशी अफवा पसरवली. १ जानेवारी १६७५ ला हंबीररावांनी वाटेतील धरणगाव हे ब्रिटिश व्यापारी ठाणे लुटले. त्यावेळी ३० ते ४० ठाणे कापड अन १०००० रोख अशी लूट मिळाली. नंतर आसपासच्या परिसरात हंबीररावांनी प्रचंड खंडणी अन लूट जमा केली.

यानंतर सण १६७६ ला कर्नाटक मधील कोप्पल येथे आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान चा मोठा पाडाव केला व रयतेची जुलमातून मुक्तता केली.

हंबीररांवांच्या तलवारीची कमाल या विषयी बखरीत वर्णन आहे. एका लढाईत त्यांनी ६ तासात ६०० जण मारले असे म्हटले जाते. त्या तलवारीवर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात. म्हणजेच कोणी मावळ्यांने एका वेळी १०० जण मारले तर तलवारीवर एक शिक्का उमटवला जायचा. तसे ६०० जणांवर ६ शिक्के. असा पराक्रम दुसऱ्या कोणी केल्याचा कुठे उल्लेख आढळत नाही. ती तलवार आजही प्रतापडगावर भवानी मातेच्या समोर विराजमान आहे.

हंबीरराव आणि शंभूराजे

शंभूराजे लहान असल्यापासूनच हंबीररावांचा त्यांच्यावर खूप जीव होता. सख्खा अन सावत्र असा भेदभाव त्यांना कधी जमलाच नाही. कोणतेही संकट असो, हंबीरराव शंभूराजांच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभे राहिले. गोदावरीचा निवाडा असो किंवा शंभूराजे शिवरायांच्या सांगण्यावरून दिलेरखानाकडे गेले तो काळ असो, किंवा भूपाळगड पडला ती नामुष्की असो, हंबीररावांनी कधीही शंभुराजांची साथ सोडली नाही, ते नेहमी त्यांच्यासोबत राहिले. त्यासाठी त्यांना काही वेळा स्वराज्याच्या महाराणी म्हणजेच त्यांच्या धाकल्या बहीण सोयराबाई यांची नाराजी ओढवून घ्यावी लागली, परंतु त्यांनी कधीही त्याचा विचार केला नाही.

३ एप्रिल १६८० रोजी हनुमान जयंती दिवशी ज्यावेळी शिवरायांनी रायगडावर आपला देह सोडला, अवघा रायगड पोरका झाला, स्वराज्याचा धनी हरपला, मराठी भूमी रंडकी झाली त्यावेळी संभाजीराजे हे पन्हाळ्यावर होते. त्यांना जाणूनबुजून ही खबर समजूचं दिली नाही. शिवरायांचे सर्व अंत्यविधी गुपचूप उरकले गेले, गडाचे दरवाजे बंद करण्यात आले, रयतेला काही समजू दिले नाही.

कारण…

संभाजीराजे हुशार होते, धाडसी होते, चाणाक्ष होते, कर्तबगार होते, आणि त्यांना स्वराज्यातील काही मंत्र्याची चुकीची कामे आधीपासूनच ठाऊक होती, ते त्यामुळेच त्या मंत्र्यांना कधीही जुमानत नव्हते.

हेच कारण असावे की अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, राहुजी सोमनाथ, जनार्दन पंत, हिरोजी फर्जंद या मंडळींनी रायगडी एक कुटील डाव आखला. त्यासाठी सोयराबाईंना हाताशी धरलं, त्यांना जणू ब्लॅकमेल केलं गेलं अन या डावात सामील करून घेतलं.

डाव असा की लहानग्या राजाराम राजांना गादीवर बसवून आपण राज्यकारभार चालवायचा म्हणजे सगळं आपल्याच हातात राहील आणि शंभुराजांना पन्हाळ्यावर कैद करायचं. तशा प्रकारचा आदेशच जणू सगळ्या सरदारांना दिला गेला की सर्वांनी राजाराम राजेंच्या पाठीशी उभे राहावे नाहीतर स्वराज्यद्रोही म्हणून अटक केले जाईल.

आता या सर्व मंत्र्यांना वाटलं की हंबीररावांना काय विचारायचं, ते सख्खा भाचा गादीवर बसणार म्हटल्यावर विरोध थोडेच करणार, सख्खी बहीण राजमाता झाल्यावर त्यांचा विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही.

हाच विचार करून त्यांनी राजाराम राजांचे घाईघाईने मंचकारोहण करवून घेतले अन सोयराबाई यांच्या शिक्क्याचे कागद घेऊन काही मंत्री पन्हाळ्याकडे निघाले. वाटेत हंबीररावांना सोबत घेऊन शंभुराजांना पन्हाळ्यावर कैद करायचे असे त्यांनी ठरवले.

ते मंत्री हंबीररावांकडे तळबीडला आले, त्यांना हा मनसुबा सांगितला आणि राजाराम महाराज हे राजे झाल्याचं सांगितले. हे सगळं ऐकून हंबीरराव खुश झाले, त्यांनी याला सहमती दर्शवली अथवा तस दाखवलं अन भली मोठी फौज घेऊन हंबीरराव या मंत्र्यांसह पन्हाळ्याकडे निघाले. पन्हाळ्यावर पोहचताच त्यांनी शंभुराजांना पाहिले अन त्यांना मुजरा केला हे पाहून सगळे मंत्री अवाक झाले. त्यांना समजलं हंबीरराव कोणत्या बाजूला आहेत. मंत्र्यांचा कुटील डाव हंबीररावांनी त्यांच्यावरच उलटवला अन ते अत्यंत महत्वाच्या वेळी शंभूराजांच्या पाठीशी उभे राहिले आणि सर्व मंत्र्यांना अटक केले. कारण त्यांना ठाऊक होते औरंगजेब नावाच्या जहरी सर्पाला जर ठेचायच असेल तर त्याला संभाजी नावाचा सिंहाचा छावाच पाहिजे, ते येड्यागबाळ्याचं काम नाही. म्हणून त्यांनी शंभुराजांचा अधिकार अन स्वराज्यहित याला प्राधान्य देऊन शंभूराजांच्या पाठिशी उभे राहण्याची निर्णय घेतला.

त्यावेळी जर यदा कदाचित हंबीरराव मंत्र्यांसोबत गेले असते आणि शंभूराजे कैद झाले असते तर स्वराज्याचा इतिहास नक्कीच खूपच वेगळा घडला असता.

त्यानंतर १६ जानेवारी १६८१ रोजी शंभुराजांचा रायगडावर राज्यभिषेक सोहळा संपन्न झाला, स्वराज्याला दुसरा छत्रपती मिळाला, त्या पदास अत्यंत योग्य अन पात्र असलेला वारस छत्रपती झाला हे पाहून रयत सुखावली. खर तर हे सर्व फक्त हंबीररावांच्या स्वामिनिष्ठेमुळे शक्य झाले होते.

राजेंचा राज्यभिषेक झाला अन राजांनी आपण सुरत लुटणार अस मंत्र्यांना सांगितलं, अशी आवई उठवली गेली अन शत्रूला गाफील ठेवलं गेलं. अन राज्यभिषेकानंतर १४ दिवसातच राजे बुऱ्हाणपूर वर चालून गेले. या मोहीमचे नेतृत्व राजांनी हंबीररावांकडे  सोपवले. ३० जानेवारी १६८१ रोजी सरनौबत हंबीरराव मोहित्यांनी अचानक बुऱ्हाणपूर  शहरावर हल्ला केला. खानजहान बहादूरखान हा बुऱ्हाणपूरचा सुभेदार होता. पण तो कोण्या नातेवाईकांच्या लग्नासाठी ३००० फौज घेऊन औरंगाबाद ला आलेला. बुऱ्हाणपूर ला त्याचा साहाय्यक होता काकरखान एकटाच राहिला. तो जिझिया कर  अधिकारी म्हणून  तेथे राहिला  होता. काकर खानाकडे फक्त २०० माणसे होती. तर हंबीररावांची  सेना २०,००० होती. त्या स्वारानिशी ७० मैलाची मजल मारून मराठे एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. बुऱ्हाणपुरापासून ३ मैलावर बहाद्दूरपुरा नावाचा पुरा आहे. तो अतिशय सधनसंपन्न होता. लक्षाधीश असे सराफ, सावकार तेथे राहत होते. देशोदेशीचे जडजवाहीर, सोने -नाणे, रत्ने  असा लक्षावधी  रुपयांचा माल तेथील  दुकानांतून  साठविला  होता तो सर्व मराठ्यांनी लुटला. शहराच्या तटबंदीच्या बाहेर बहाद्दुरपुरा आणि इतर १७ पुरे होते त्यांना मराठ्यांनी घेरले. विशेषतः बहाद्दुरपुरावर  इतक्या अनपेक्षितपणे मराठे तुटून पडले कि, त्या पुऱ्यातून  एक माणूस किंवा एक पैसाही लोकांना हलविता आला नाही. पुऱ्यात आगी  लाऊन तिचा  धूर आकाशापर्यंत  पोहचला तेंव्हा कुठे बुऱ्हाणपूरच्या रक्षक व शहरातील इतर लोकांना मराठे आल्याची  खबर समजली. काकरखानाने शरणागती पत्करली कारण त्याच्याकडे मराठ्यांशी प्रतिकार करण्याएवढी शक्ती नव्हती. त्याने  शहराचे  सर्व दरवाजे बंद करून तट, बुरुज इ. बंदोबस्त करू लागला. तीन दिवसापर्यंत मराठे सतरा चे सतरा पुरे धुतले. त्यांना मुबलक लुट मिळाली. त्यांनी जडजवाहीर, सोने-नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. या लुटीत सुरतेच्या लुटीच्या तिप्पट लूट स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाली. आणि मोगलांची खूपच नाचक्की झाली. हंबीररावांची दहशत मुघलांना बसली.

रामशेज किल्ला अवघ्या काही मराठ्यांनी जवळपास ६ वर्षे लढवला. ही लढाई मराठा इतिहासात सुवरणाक्षरांनी लिहली गेली. या लढाईत सुद्धा हंबीररावांनी मोलाचे योगदान दिले. हंबीररावांनी वेळोवेळी यवनी सैन्याला गनिमी काव्याने चकवून रामशेजवर रसद पोहोचवण्याचं काम यशस्वीरीत्या केलं. रामशेज किल्ल्याला जेव्हा मुघल सरदारांनी वेढा दिला त्यावेळी शहाबुद्दीन खानवर अचानक हल्ला करून त्याचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम सरलष्कर यांनी यशस्वीपणे पार पाडले. या लढाईत हंबीरराव जखमी झाले होते.

यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान (ऑक्टोबर १६८२) व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्‍न केला अन त्याला पळवून लावले(डिसेंबर १६८२ ते जानेवारी १६८३). त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बहाद्दुररखानाचा पराभव केला (२७ फेब्रुवारी १६८३). तसेच पुन्हा एकदा शहाबुद्दीन खानाला रायगडाच्या परिसरात १६८५ साली बेकार तडाखा दिला.

मोगली सैन्यात हंबीररावांची दहशत इतकी पसरली होती की त्यांचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी मुघल सैन्य “भागो भागो हंबीर आया” असे ओरडत सैरावैरा पळत सुटायचे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई ती सातारा जिल्ह्यातील वाई जवळ. या युद्धात सर्जाखान याचा त्यांनी दारुण पराभव केला होता, परंतु हंबीरराव मोहिते यांना त्या लढाईत तोफेचा गोळा लागला व रणधुंदर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे धारातिर्थी पडले. १६ डिसेंबर १६८७ साली हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. आणि स्वराज्याने एक महापराक्रमी स्वामिनिष्ठ सेवक गमावला. स्वराज्याचे कधीही भरून न येणारे नुकसान त्यावेळी झाले. संभाजीराजांना लहानपणापासून वडीलधारी म्हणून असलेला आधार मावळला.

स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली. तो चित्रपट नक्कीच सर्वांनी पाहायला हवा. त्यात अजून बऱ्याच गोष्टींचा नक्कीच उलगडा होईल.

अशा या शूर वीर स्वामिनिष्ठ रक्ताला माझा मानाचा मुजरा🙏🙏🚩.

संदर्भ –
१. एस एस पाटील यांचे हंबीरराव मोहिते(प्रकरण दुसरे)
२.सेनापती हंबीरराव मोहिते – सदाशिव शिवदे
३.सभासद बखर
४. ताराबाईकालीन कागदपत्रे – आप्पासाहेब पवार
५.मराठ्यांची बखर.

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment