महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,48,669

सरसेनापती खंडेराव दाभाडे

By Discover Maharashtra Views: 5027 6 Min Read

सरसेनापती खंडेराव दाभाडे…

दाभाडे घराण्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजां पासून आला होता. दाभाडे घराणे अत्यंत प्रामाणिक छत्रपतींचे निष्ठावंत सेवक म्हणून प्रसिद्ध होते. छत्रपतींच्या मर्जीनुसार हे घराणे सेनापती पदापर्यंत पोहोचले होते.याचे कारण म्हणजे छत्रपती शिवरायांच्यावरती असणारे प्रेम व निष्ठा. शिवरायांची विशेष मर्जी असल्यामुळे तळेगावचे दाभाडे सेनापती पदापर्यंत पोहोचले होते. मराठा स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात (१६८९ ते १७०७ ) मराठा सरदार स्वपराक्रमाने पुढे आले. त्यापैकी तळेगाव येथील दाभाडे घराण्यातील सरसेनापती खंडेराव दाभाडे हे एक महापराक्रमी शूर मराठा सरदार

होते. खंडेराव दाबाडे यांच्यामुळे तळेगाव येथील दाभाडे घराण्याचा नावलौकिक महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर पसरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याने ज्या अनेक मराठी व्यक्ती आपल्या शौर्याने, स्वामी भक्तीने इतिहासात अजरामर झाल्या त्यामध्ये दाभाडे घराण्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

छ.राजाराम महाराजांना महाराष्ट्रातून जिंजीला पोहोचविण्यात खंडेराव दाभाडे यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांनी मोगलांच्या पाठलागा पासून स्वतःचे प्राण पणाला लावून महाराजांचे संरक्षण केले. छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीहून महाराष्ट्रात पन्हाळ्या पर्यंत सुरक्षित पोहोचवण्याच्या कामात खंडेराव दाभाडे यांनी विशेष मेहनत घेतली होती. जिंजीला असताना राजाराम महाराजांचे अंगरक्षक म्हणून त्यांनी एकनिष्ठपणे सेवा केली.

खंडेराव दाभाडे यांनी स्वराज्यात बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. छत्रपतींनी दाभाडे कुटुंबाला पाटीलकी, सरदेशमुखी आणि इनाम गावे देऊन फार मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली .दाभाडे यांनीसुद्धा आपल्या स्वामीवरील निष्ठा कुठेच ढळू दिली नाही. छत्रपती राजाराम महाराजांच्या लष्करात प्रमुख सेनापती म्हणून खंडेराव दाभाडे यांचे नाव होते. ताराराणीच्या काळात इस.१७०४ ते १७०७ पर्यंत मराठे जास्तच आक्रमक बनले होते. त्यांनी पूर्वीचे बचावाचे धोरण बदलून महाराष्ट्राबाहेर मोगल प्रदेशावर आक्रमणे केली. या काळात खंडेराव दाभाडे यांनी मोगलांविरूद्ध विरुद्ध लढा दिला.

येसूबाई राणीसाहेब मोगलांच्या कैदेत असताना अनेक मराठी सरदार प्रत्यक्ष शाहू महाराजांना भेटत .शाहू महाराज आणि त्यांच्या मातोश्री येेसूबाई राणीसाहेब यांना मोगलांच्या कैदेतून सोडवून आणण्यासाठी खंडेराव दाभाडे यांनी जिवाचे रान केले होते.

हिंदुराव घोरपडे ,नेमाजी शिंदे, परसोजी भोसले ,रावजी थोरात, कृष्णाजी दाभाडे ,संभाजी निंबाळकर, रायभानजी माने आणि खंडेराव दाभाडे यांनी मोगल कैदेतून शाहू महाराजांना सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला .मराठा स्वातंत्र्य युद्धातील खंडेराव दाभाडे यांचे योगदान अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे होते.

छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत खंडेराव दाभाडे यांना आपल्या अंगातील गुण आणि शौर्य प्रदर्शीत करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून जिवापाड मेहनत केली. छत्रपती राजाराम महाराजांचे मोगलांच्या आक्रमणापासून संरक्षण केले.छ. राजाराम महाराजांच्या कृपाछत्राखाली दाभाडे घराण्याचा उत्कर्ष घडून आला. छत्रपतींची एकनिष्ठपणे सेवा करून दाभाडे यांनी फार मोठा लौकिक प्राप्त केला. खंडेराव दाभाडे यांनी ताराराणीच्या कारकिर्दीत मोगला विरुद्धच्या लढाईत शौर्य गाजवून एक उत्तम सेनानी म्हणून पुढे आले. ताराराणी व शाहू महाराज यांच्या आपसातील संघर्ष मिटवण्यासाठी खंडेराव दाभाडे यांनी अत्यंत प्रयत्न केले .

ताराराणी व शाहू महाराज यांच्यात स्वराज्यासाठी लागलेल्या वादात खंडेराव दाभाडे यांनी हा वाद मिळवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली . शाहू महाराजांना ताराराणीने आदराने घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा शाहू महाराज म्हणाले ” मातोश्री किंवा तुम्हा सरदारांच्या मनात काही विकल्प उत्पन्न होणार नाही कशावरून? तुम्ही मला आईसाहेबांची आज्ञा निवेदन केली ती ठीकच आहे. पण त्यांच्या आज्ञेनुसार मी आज तुमच्या बरोबर विश्वासाने आलो आणि तिथे गेल्यावर जर दगाफटका झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार ? महाराजांचे बोलणे ऐकून खंडेराव दाभाडे पुढे सरसावले आणि शपथपूर्वक सांगितले की ,”सरकार हा देह आज पर्यंत आपल्याच आन्नाने वाढला आहे . आमच्या वाडवडीलांनीही गादीची सेवा एकनिष्ठपणे केलेली आहे.आज मितीपर्यंत आपल्या सेवेचे व्रत अखंडपणे चालू ठेवले आहे .मी प्रतिज्ञा पूर्वक आपणास सांगतो की आपल्याला पन्हाळ्यावर घेऊन येण्याची खुद्द आई साहेबांची आज्ञा झाली आहे. तुम्ही आमचे धनी आहात .आम्ही कदापीही आपल्यावर शस्त्र धरणार नाही. कदाचित आई साहेबांच्या मनात विकल्प आलाच तर तुम्हास या ठिकाणी सुरक्षित आणून पोहोचवू आणि मग आम्ही वाट फुटेल तिकडे निघून जाऊ .असे निवेदन खंडेराव दामाडे यांनी शाहू महाराजांना करून आपली निष्ठा व्यक्त केली होती.

खंडेराव दाभाडे यांचा ओढा ताराराणी कडे होता. त्यामुळे ताराराणीविषयी खंडेराव यांच्या मनात आपुलकीची भावना वसत होती ,हे जरी खरे असले तरी खंडेराव दाभाडे हे शाहू पक्षाला एकनिष्ठ होते. राजघराण्यातील गृह संघर्ष तडजोडीने मिटला पाहिजे अशी भूमिका खंडेराव दाभाडे यांची होती. खंडेराव दाभाडे यांनी शाहू महाराजांच्या विरुद्ध मोगलांच्या आणि विरोधकाच्या बंडाळ्या मोडून काढण्यात पराक्रमाची शर्थ केली. त्यामुळे खंडेराव दाभाडे शाहू महाराजांचे विश्वासू सेवक म्हणून नेहमीच अग्रभागी राहीले .

मराठा सरदारांमध्ये कार्यक्षेत्राची वाटणी झाली त्यात खानदेशात बागलाण आणि गुजरातचा सुभा सेनापती दाभाडे यांच्याकडे सोपविण्यात आला होता .खंडेराव दाभाडे यांनी भिल्ल , कोळी या नव्या वन्य जातीची दोस्ती संपादन करून सैन्याचे संघटन केले.१७१९ मध्ये सुरतेवर स्वारी करून मोगली फौजांचा पराभव केला. सोनगड येथे कायमचे ठाणे स्थापन केले .तेथून पुढे हळूहळू दाभाडे यांनी गुजरात वर चौथाई आणि खंडणी लागू केली. खंडेराव दाभाडे यांनी गुजरात वर अनेक वेळा स्वाऱ्या करून एवढ्या खंडण्या वसूल केल्या की गुजरातमधील मोगलांची सत्ता खिळखिळी होऊन मोडकळीस आली.खंडेराव दाभाडे यांनी गुजरात ची केलेली दुरावस्था पाहून बादशहाला हैदर कुलीखान म्हणून नवीन शूर आणि एका धाडसी सुभेदाराला गुजरातवर पाठवावे लागले. त्यानंतरही गुजरातमध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर राहिली .राजकीय स्थिरता गुजरातला कधीच प्राप्त होऊ शकली नाही. राजकीय अस्थिरता हा गुजरातचा जणू स्थायीभावच होऊन बसला .

खंडेराव दाभाडे एकनिष्ठपणे स्वामी सेवा करत असत. खंडेराव हे स्वामीनिष्ठ तर होतेच पण कायम छत्रपतीच्या आज्ञेचे पालन करीत.

वाढत्या स्वार्या आणि दगदगीने खंडेराव दाभाडे आजारी पडले. दिनांक २७ सप्टेंबर १७२९ रोजी सरसेनापती खंडेराव दाभाडे यांचा मृत्यू झाला.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a Comment