महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,74,360

खांदेरीचा रणसंग्राम भाग १

By Discover Maharashtra Views: 4081 5 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग १

आषाढात कोकणात महामुर पावसाला सुरुवात होते. दिवस रात्र श्रावणमेघ नुसता गळत असतो. त्यामुळे झालंच तर जेष्ठ महिन्याच्या आधीच सगळी काम उरकून घेण्याचा कोकणातला शिरस्ता. लाकूडफाटा गोळा करा. पुरेसा दाणागोटा पदरी ठेवा, अंगणात मंडप उभारा अशी सगळी तयारी कोकणातील घरात पाऊस सुरू होयच्या आधी झालेली असे. पावसात मासोळी भेटायची नाही म्ह्णून आधीच सुखे मासे मीठ लावून बांधून ठेवलेले. पावसात समुद्र खवळलेला त्यामुळे समुद्रातल्या बोटी बंदरात आणून बांधुन ठेवत. जिंजीऱ्याचा सिद्दी सुद्धा दरवर्षी पावसात आपली गलबत मुंबईला इंग्रजांच्या बंदरात माझगावात उभी करत. पण यंदा तो त्याच आरमार मुंबईला न ठेवता सुरतेला घेऊन गेला होता. आषाढ संपलं आणि श्रावणाची चाहूल लागू लागली. पावसात सगळ्याच लष्करी मोहिमा थंडावत. ह्या मोक्कार पावसात वेढे, मोहिमा सुरू ठेवणे दुष्कर होई. त्यामुळे ह्या तीन चार महिन्यात शेतीची काम करून घेण्याकडे कल असे. सोप्प्या भाषेत सांगायचे तर हे चार महिने शांतता असे. पण १६७९ साल त्याला उपवाद ठरलं. दिसून येणारी शांतता ही येणाऱ्या वादळाची नांदी देत होती. सिंधुसागर होऊ घातलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची साक्ष देणार होता.(खांदेरीचा रणसंग्राम भाग १)

श्रावण महिन्यात सुरवात झाली आणि चौलच्या नागावच्या खाडीत मोठी धामधूम उडाली होती. खूप साऱ्या गोष्टींची जमवाजमव मराठी सैन्याकडून करण्यात येत होती. ह्या प्रांतीचे गवंडी, सुतार, वढार ह्यांचा गोतावळा तिथे जमा झाला होता. मायनाक भंडारी धावत पळत सगळी तयारी करत होता. सर्वांना सूचना देत होता. चुना, घडीव दगड, लाकूडफाटा, अन्नधान्य ह्याचा मोठाच साठा सैन्याकडून करण्यात आला होता. शस्त्र, आरमार ह्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. लोकांकडून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्या. थोरल्या राजांचा काहीतरी बेत असणार ह्यावर सगळे शिक्कामोर्तब करत होते. पण हे बेत नक्की काय आहे ह्याबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.

अखेर शेवटच्या टप्प्यात सगळी साधनसामुग्री जहाजांवर लादली गेली. मराठी जहाज म्हणजे मधून दोन्ही बाजूला निमुळती होत गेलेली. पाणसापसारखी सपासप पाणी कापत जाणारी. वारा असला म्हणजे वाऱ्याला शिड्यात भरून घेणारी. आणि जरी वारा नसेल तरी वल्ह्यावर चालत जाणारी. प्रसंगी दोन्हीचा वापर मराठे करीत. एका जहाजावर माऱ्यासाठी ४ ते ६ तोफा ठेवलेल्या. सहा पाउंड वजनाच्या. एका जहाजावर १०० ते १५० कोळी खलाशी. समुद्राला आपला मायबाप मानणारे. वेळ पडलीच तर समुद्रासारखा तांडव घालणारे हे कोकणातले दर्यावर्दी. ऑगस्ट १६७९ चा शेवटचा आठवडा सुरू झाला. समुद्र बऱ्यापैकी शांत होता. पाऊस सुद्धा मधेच येऊन एखादी हलकी सर पाडत होता. निसर्ग आपल्या बाजूनी आहे बघून मायनाकाने आपला सगळा लवाजमा खाडी बाहेर काढला. शिड उभारण्यात आली. निशाण फडकवली गेली. भगवा वाऱ्याशी स्पर्धा करत होता. वेल्हे जोरात मारता मारता खलाशी पार ओलेचिंब झाले. थळ च्या किनाऱ्यासमोर दोन खडकाळ बेटं होती. एक खांदेरी तर दुसरा उंदेरी. निर्मनुष्य होती ती. शिवाजी राजांनी १६७२ ला तिथे किल्ला बांधायचा प्रयत्न चालवला होता. पण इंग्रज, पोर्तुगीज ह्यांनी त्याला प्रखर विरोध केलेला. इतर अनेक आव्हान स्वराज्यापुढे आ वासून असल्याने त्यांनी त्या वेळी पद्धतशीर माघार घेतली. पण आता ती स्तिथी नव्हती. आता तोच प्रयत्न पुन्हा करण्यात येत होता. मराठा आरमार आता जोर पकडत होतं. एका दिवसात तो सर्व संसार घेऊन मायनाक भंडारी खांदेरीपाशी पोचला सुद्धा. तेही कसलाच प्रतिकार न होता.

इथे ही बातमी इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी च्या हेरांना लागली. बातमी कानावर येताच त्याचा पायाखालची जमीन सरकली. तरी आपआपल्या धन्याच्या कानी ही गोष्ट त्यांनी पोचवली. २७ ऑगस्ट १६७९ रोजी मुंबईहून सुरतेला एक पत्र पाठवण्यात आल.
” शिवाजी खांदेरी बेटावर किल्ला बांधायची तयारी करतोय. चौल येथे त्याने पूर्ण तयारी केलीय.”

” These serve cheifly to informe you that wee have received centaine intelligence, that sevagy rajah intends to fortifie the island of kendry, lying at the mouth of this bay, and always belongs to us. For both men and materials are come to chaule for said design ”

ऑगस्ट अखेर मायनाक भंडारी बेटावर पोचून बांधकामाला सुरवात झाली सुद्धा. आणि ह्या कामासोबतच सुरवात झाली एका नवीन प्रसंगाला ज्याने अजून एक मोरपीस मराठ्यांच्या पगडीत कायमचं खोचलं.

क्रमशः

संदर्भ ग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records

 

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment