खांदेरीचा रणसंग्राम भाग १५
खांदेरीचा रणसंग्राम भाग १५ – मायनाक व दौलतखानाबरोबर झालेल्या युद्धाने आलेलं नुकसान सुरतकरांना धोक्याचे वाटत होते. कारण आता शिवाजी महाराज चिडून जाऊन खांदेरीवरील तटबंदी त्वरित करून मुंबईवर हल्ला करण्याची घाई करतील अशी भीती सुरतकरांना होती. शिवाजी महाराजांसारख्या समर्थ शत्रुशी युद्ध करणे किती धोक्याचे आहे याबद्दल सुरतकर इंग्रज चांगलेच जाणुन होते. या देशातील लोकांशी शत्रुत्व पत्करणे हे खर्च वाढविण्यासारखे आहेच सोबतच कंपनीची तशी अजिबात इच्छा नाही असे ते आपल्या पत्रात लिहितात. चालू असलेले हे भांडण शक्य तितक्या लवकर मिटवावे असं मत सुरतकर लिहितात खरं पण खांदेरीवर मालकी दाखवणारे इंग्रज तो हक्क सोडायला मात्र तयार नाहीत. एकीकडे या देशातील लोकांशी युद्ध करू नका सांगणारे इंग्रज या देशातील जमिनीवर मात्र अधिकार प्रस्तापित करण्याचा प्रयत्न करतच होते.
खांदेरी वरच्या नाकेबंदीचा खर्च मूळ उत्पन्नापेक्षाही अधिक होत होता. तो न परवडून सरते शेवटी तहाचे बोलणे करण्याचा निर्णय सुरतकर आपल्या पत्रात करतात पण ते करत असताना बेटावरील मराठ्यांचा हक्क आणि तटबंदीचा अधिकार मान्य केला आहे असे मात्र लिहू नका असे कटाक्षाने ते मुंबईकरांना कळवतात. इंग्रजांच्या प्रत्येक शब्दात राजकारण दढलेल होत हे इंग्रजांची पत्र वाचताना जाणवते. दुसरीकडे मुंबईतून इंग्रज नागाव आणि आजूबाजूच्या किनारी भागात जाळपोळ करण्याची परवानगी मागत होते. त्याने मुंबईतल्या इंग्रजांना मराठे खांदेरी पासून दूर राहतील व हा विषय लवकर संपेल असे वाटत होतं. पण ह्यांने मराठी सत्ता इंग्रजांविरुद्ध पेटून उठेल हा विचार सुरतेत केला गेला असावा. म्हणून शिवाजी महाराजांच्या मुलुखात हल्ला किंवा आरमाराची जाळपोळ करण्याची संमती ते मुंबईकरांना नाही असे कळवतात एकीकडे तर दुसरीकडे बेटावर अधिकारपद सोडू नका असेही लिहिताना दिसतात. कोणी कधी इंग्रजांनावर हल्ला केलाच तरच त्यांनी प्रतिकार केला अस मत जगापुढे उभे राहावे अशी इच्छा ते प्रकट करतात.
इकडे पौतुगीज इंग्रजांना मदत करण्याचे आश्वासन देत होते पण प्रत्यक्षात खांदेरीच्या लढाईसाठी मात्र त्यांनी कसलीही मदत इंग्रजांना केलेली नव्हती. त्यामुळे इंग्रजांच्या मनात हे पक्के झाले होते पौर्तुगिज हि सिद्धी प्रमाणे एकट्यालाच लढावयास लावून स्वतःचा फायदा करून घेण्याचे मनात ठेवून आहेत या सगळ्याचा विचार करता शिवाजी महाराजांशी सलोखा करून त्या दोघांना फायदा न करून देता आपले हित साधनेच योग्य आहे. म्हणून तह करून ह्याचा सुवर्णमध्य काढावा हे जेमतेम नक्की होतच होते.
खांदेरीच्या मोहिमेवर असणाऱ्या केजवीन ला मुंबईकर लिहतात, तुमच्याकडील वर्तमान समाधानकारक नाहीच पण त्याचा खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्यक्ष बघायला गेलं तर एक नवीन आशा तुम्ही प्रत्येक पत्रात देता पण त्याची कायम निराशा होत असते . नॉग्रेव्ह आणि ह्युजेस सोबत हंटर फ्रिगेट पाठवीत आहोत. त्यांना लहान जहाजांचे नेतृत्व देऊन अधिक यश मिळून दाखवावे.
ठाण्याला ३ जखमी लोक घेऊन जाणारी बोट अचानक आढळली. इंग्रजांच्या नावा व मराठ्यांच्या गुराबांमध्ये अचानक चकमक झाली पण नुकसान मात्र कोणाचे झाले नाही. तर इकडे खांदेरी परिसरात वारा जोराचा होता. त्यामुळे इंग्रज काही लढू शकत नव्हते पण ते वारा त्यांच्या बाजूने झाला तर आम्ही लढायला तयार आहोत असे मुंबईकरांना कळवितात. मराठ्यांच्या बोटी काही केलं तरी इंग्रजांच्या टप्प्यात येत नव्हत्या. मराठ्यांची गलबते आणि गुराबा ४ तारखेच्या रात्री बाहेर पडली त्यातली गलबते उत्तरेकडे तर गुराबा दक्षिणेकडे गेली. इंग्रजांच्या होडीने त्यांचा पाठलाग केला पण त्यांना एकही पकडता आले नाही. वारा पडल्यामुळे रिव्हेंज आणि फॉर्च्युन दोघांच्याही पाठलागातुन मराठी गुराबा वाचल्या.
५ तारखेला मराठ्यांच्या गलबतांना घेऊन जाण्याकरता गुराबा उत्तरेकडे किनाऱ्यानेच आल्या पण इंग्रजांची शिबाड आणि मचवे समोर आल्या आणि युद्धाला तोंड फुटले. पण काही काळातच मराठे मात्र जास्त प्रतिकार न करता नागावमध्ये शिरले. या अशा परिस्थितीत इंग्रज मात्र काहीच करू शकत नव्हते. हंटर खांदेरी परिसरात आल्यामुळे खाडीच्या भागाचा ठाव घेऊन मराठ्यांच्या आरमाराला कोंडून ठेवण्याची तयारी इंग्रज करत होते.
थळचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांना अजून काही बोटी हव्या होत्या. इंग्रज चौलजवळ मराठ्यांना बेटापासून लांब ठेवण्यासाठी नांगर टाकून उभे होते. आता केजवीन आणि खांदेरीची नियुक्त केलेले इतर अधिकारी सिद्धी यायची वाट बघत होते. कारण कितीही प्रयत्न केले तरी मराठ्यांना खांदेरीवरील बांधकामाची रसद पोहचवण्यासाठी ते रोखू शकत नव्हते त्यामुळे सिद्दीच्या मदतीने काहीतरी करता येईल अशी अपेक्षा इंग्रज अधिकाऱ्यांना वाटत होती. सिद्धी आल्यावर त्याचे जंगी स्वागत करावे असे केजवीन च्या मनात होते. तसे तो मुंबईकरांना लिहीत हि होता.
मराठ्यांनी किनार्याच्या रक्षणासाठी गुराबातील काही तोफा काढून किनाऱ्यावर चढवल्या होत्या. ८ तारखेला मराठ्यांनी इंग्रजांवर गोळीबार केला. मराठ्यांच्या २ होड्या इंग्रजांनी पकडल्या होत्या त्या सोडून देण्याची विनंती चौलच्या सुभेदारांनी केली होती ती इंग्रजांनी मान्य केली. पण सिद्दीच्या आगमनाने मराठ्यांना अजून तिखट संघर्ष करावा लागणार होता हे नक्की.
क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग १५
संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records
छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्ध )
माहिती साभार – स्वराज्याचे वैभव