खांदेरीचा रणसंग्राम भाग ६
रोजच्या रोज खांदेरीच्या बातम्या इंग्रजांना मिळत होत्या. बेट घेण्यासाठी इंग्रजांचा प्रयत्न चालूच होता.(खांदेरीचा रणसंग्राम भाग ६)
९ ऑक्टोबरला मुंबईकर लिहतात की सुरतेच्या पत्राप्रमाणे दोन गुराबा भाड्याने घेऊन तयार कराव्या आणि रिचर्ड कॅंग्विनला रिव्हेंज व सर्व गलबते यांचा मुख्य अधिकारी नेमावा. याचे मुख्य कारण म्हणजे रिचर्डला समुद्रावरील लढाईच सखोल ज्ञान होतं. कोणतीही परिस्थिती तो नीट हाताळू शकत होता. तो संथ वृत्तीचा तर होताच सोबतच धोरणी होता. कॅंग्विनच्या नेतृत्वाखाली २०० शिपाई खांदेरीला वेढा देण्यासाठी निघाले . इंग्रजांची कित्येक गलबते व्यापारासाठी बाहेर गेली होती त्यामुले काही जहाज त्यांना भाड्याने घ्यावी लागणार होती किंवा आहे त्याच परिस्थितीत युद्धाची आखणी करावी लागणार होती. या युद्धासाठी त्यांनी २ गुराब भाड्याने घेतली होती. हंटर हि युद्धनौका इंग्रजांना १० दिवसांनी येऊन मिळणार होती त्यामुळे मुंबईकर इंग्रज सुरतेला लिहतात हंटर येऊन मिळाली कि आम्ही ती २ गुराब परत पाठवून देऊ त्यामुळे होणार खर्च काहीप्रमाणात वाचेल.
इंग्रजांनी खांदेरीला पक्का वेढा देण्याची तयारी केली होती. त्यांचं असे मत होते जर बेटाला पक्का वेढा दिला तर पाण्याचा तुटवडा पडून तेथील लोक शरण येतील. युद्धावर इतके सैन्य पाठवल्यामुळे मुंबईत फक्त २० शिपाई राहिले होते. केजवीन च्या ताब्यात रिवेंज फ्रीगेट , २ गुराबा , ३ शिबाडे व ३ मचवे अशी ८ गलबते अशाप्रकारे केजवीन खांदेरीच्या युद्धासाठी तयार होता.
समुद्रावर आपले सगळे सैनिक पाठवल्यावर मुंबईत सैनिक तोडके पडले. ह्यात अजून एक खबर इंग्रजांना मिळाली की थेट मुंबईवरच हल्ला करण्यासाठी मुंबईच्या समोरच्या परिसरात मराठा सैन्य एकत्र येत आहे. ह्यावर शिक्कामोर्तब करणारी अजून एक गोष्ट मुंबईत घडली. ती म्हणजे सुंदरजी प्रभू नावाचा व्यक्तीला पकडण्यात आलं. हा व्यक्ती आधी शिवाजीच्या राजांच्या सैन्यात कामाला होता. आणि मराठ्यांच्या तर्फेने कामानिमित्त मुंबईलाही येऊन गेला होता हे इंग्रजांना माहीत होतं. त्याला मुंबईत येण्याचं कारण विचारण्यात आलं त्याच सुंदरजी उत्तर देऊ शकला नाही. हा मराठ्यांचा हेरच असणार अशी त्यांना खात्री होती. सुंदरजी ला तुरुंगात टाकण्याचे आदेश देण्यात आले.
” On the 11th instant was taken one sundergee purvoo just as he landed. Being a person well known to have served sevagee rajah many years and had negotiated for him in sereval affairs on this island. He could not esteemed otherwise then a spy ”
इकडे खांदेरीला इंग्रजांना माहिती मिळाले दौलतखानाचे २० गुराबांचे आरमार बेटाच्या मदतीकरता येणार आहे. दौलतखान दिसल्यावर एक लहान बोट पाठवून दौलतखानाला इंग्रजांच्या खांदेरी बेटावर असलेल्या अधिकाराची जाणीव करून बेट इंग्रजांच्या मालकीच्या आहे ह्याची जाणीव करून द्यावी. तसे नाहीच झाल्यास दौलतखानाशी युद्ध करण्याची तयारीही इंग्रज करून बसले होते. मुंबईकर इंग्रज खांदेरीच्या युद्धात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांना लिहितात. दौलतखान तुमच्याशी युद्ध न करता आखातात आडवा येऊन उभा राहील त्याचवेळी तुम्हीही नांगर उचलून त्याच्याबरोबर राहून त्याला मुंबई बेटावर उतरू देऊ नये.
इकडे मुंबईकरांची १३ ऑक्टोबर ला जी बैठक झाली त्यात काही निर्णय घेण्यात आले. ” नवीन डेप्युटी गव्हर्नर हेन्री ऑझीडंनने अधिकाऱ्यांची बैठक भरवून मुंबई बेटाच्या सुरक्षितेबद्दल विचार झाला. मराठा सैन्य मुंबईवर चालून येणार हे नक्की झालंच होत. पण इंग्रजांना त्यांच्या नशिबाने साथ दिली. पोर्तुगीजांनी आपल्या मुलुखातून मराठ्यांना येऊ देण्याचे नाकारल्यामुळे या बेटाचा धोका काही प्रमाणात टळला. परंतु खाडी मधील पुष्कळ लहान लहान बोटींचा शत्रूला उपयोग होऊ शकेल त्याने तो आतपर्यंत येईल म्हणून दोन शिबाड भाड्याने घेऊन बंदोबस्त करावा. समोरच्या किल्ल्यावर शिवाजीचे सैन्य आल्याची बातमी आल्यामुळे येथे लोक भेदरून गेले होते.
इकडे खांदेरीला नागावच्या खाडीतून बेटावर सामानासाठी योग्य ती मदत होत होतीच. रसद पुरवठा खंडित करण्यात इंग्रजांना हवं तसं यश आलं नव्हतं. मराठ्यांच्या बोटी जरी लहान असल्या तरी त्यातून होणारी मदत बेटावरील गरज भागवत होती. त्यांचाही बंदोबस्त करण्याचा विचार इंग्रज सतत करत होते पण कायम त्यांना निराशाच पदरी पडत होती. १८ ऑक्टोबरचा दिवस उजाडला. सकाळीच खांदेरी जवळ काहीतरी धुमाकूळ उडालीय ह्याची इंग्रजांना जाणीव झाली. त्यांना सारखे तोफांचे, बंदुकांचे आवाज ऐकायला येत होते. शिवाजीचं आरमार तर चालून आलं नसेल ना म्हणून विचार होत होते. लांबवरून उठलेले धुराचे लोट आकाशात विरून जात असलेले त्यांना दिसत होते. पण त्यांच्याकडेही बघत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.
क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग ६
संदर्भग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English Records
छत्रपती शिवाजी महाराज ( उत्तरार्ध )
माहिती साभार – स्वराज्याचे वैभव