महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,949

खांदेरीचा रणसंग्राम, पूर्वार्ध

By Discover Maharashtra Views: 3884 5 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम, पूर्वार्ध

खांदेरीचा रणसंग्राम – 22 April 1672, Surat to Mumbai.
There is report here that sevagee(शिवाजी) intends to build a castle on kaney(खांदेरी).

जैसा घरात उंदीर, तैसा स्वराज्यास सिद्दी.
हे शब्दच यथार्थ वर्णन करतात. त्या भूपतीचे हे शब्द किती खरे होते हे येणारा काळच सांगणार होता.

राजपुरीचा जंजिरा हा ह्या भारतभूमीवरचा सर्वात दुर्भागी असा दुर्ग ठरला. ज्याला शिवछत्रपतींचे पाय लागू शकले नाहीत. तिथली माती दशकातल्या ह्या महात्म्यापासून अलिप्तच राहिली. कोण हा सिद्दी. हा मूळचा आफ्रिकेतला. अँबसिनिया ह्या प्रांतातून आलेला. समुद्री मार्गे आला आणि इथे प्रस्थापित झाला. दंडा राजपुरीच्या कोळी राजाला फसवून त्याची जागा, त्याचा गड स्वतःच्या हातात घेतला. त्या दुर्गाला ह्याने अजून अभेद्य केलं. सिद्दी ह्या महाराष्ट्राला लाभलेला शाप खरा, पण नशिबाने त्याला नेहमीच साथ दिली. कित्येक वेळा तर आता हा किल्ला सिद्दी शिवाजी महाराजांना स्वाधीन करेल इतक्या टोकाच्या स्थिती निर्माण झाल्या होत्या पण त्यातून त्याने निभावले.

तसा हा सिद्दी आयुष्यभर कोणाचा ना कोणाचा मांडलिक बनून जगत आला. शिवराजांच्या उदय होण्यापूर्वी जेव्हा सभोवताली आदिलशाही अलंम होता तेव्हा तो आदिलशाहचा मांडलिक होता. पुठे स्वराज्याचा उदय झाला आणि किनारपट्टीचा भाग शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यात आला. समुद्रातला जंजिरा आणि समोरचा दंडा राजपुरी तेवढाच ह्या हशबी सिद्दीच्या ताब्यात होता. ह्या सिद्दीला कायमचा उखडून फेकायचा हे कायम महाराजांच्या मनी असे. त्याविरोधात वेळोवेळी ते लष्करी मोहिमा घेत. १६५८ ला सुरू केलेला लढा हा अनेक वर्षे चालत गेला. राजापुरीला अनेकदा वेढा घालण्यात आला पण काही तुटकता त्यात असायची. ह्यातून अनेकदा सिद्दीच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. आणि आता आदिलशाही मांडलिक बनून राहण्यात अर्थ नाही हे माहीत पडल्यावर त्याने पोर्तुगीजांचा आसरा घेतला. पोर्तुगालच्या राजाच त्याने मांडीलकत्व स्वीकारले. पण सिद्दीला कोणतीही मदत करणार नाही असा तह महाराजांनी पोर्तुगीज बरोबर करून घेतला. शेवटी त्याला मुघलांचे पाय पकडावे लागले.

सिद्दीला वेळोवेळी चिरडून टाकणं शक्य होतं पण कोणाचा ना कोणाचा मांडलिक बनून राहिल्याने बाहेरून त्याला मदत, रसद मिळत राही. त्याच अस्तित्व दंडा राजपुरी इतकं जरी असलं तरी त्याच उपद्रवमूल्य जास्त होतं. पावसात आपली जहाज जंजिऱ्याच्या जवळ ठेवणे शक्य नसल्याने तो दरवर्षी मुंबईला इंग्रजांच्या आश्रयाला जाई. बाकी अधूनमधून स्वराज्याच्या किनारपट्टीवरील गावात जाळपोळ, लुटालूट करणं ही काम करे. वेढा हा दंडा राजपुरीच्या मुख्य भूमीला असे. त्यामुळे समुद्रावरच्या संचाराला त्याला वाव भेटत असे. जिथे महाराजांचं सैन्य उभं असे तिथे तो उतरायची हिम्मत करत नसे. आणि एकदा फटका बसला की जंजिऱ्याच्या बिळात स्वतःला कोंढुन घेई.

इंग्रजांना वारंवार सांगूनहि ते सिद्दीला आपल्या बंदरात उभे करत. किंबहुना त्यांना ते सुरतच्या अधिकाऱ्याचा दबावाखाली करावंच लागे. सिद्दी अनेकदा मुंबईतही जाळपोळ करी म्हणून त्यांनाही तो नको असे. पण सुरतेच्या मुघल अधिकाऱ्याचा पत्र आलं की ते त्या विरोधात जात नसे. त्यामुळे इंग्रजांवर वचक राहावा आणि सिद्दीचीही नाकेबंदी करता यावी म्हणून एका जागेवर महाराजांची विशेष नजर होती. खांदेरीच बेटं. मुंबईपासून जवळ असलेलं हे बेटं. १६७२ ला इथे महाराजांनी किल्ला बांधायचा प्रयत्न केला होता. पण त्याला सिद्दी, इंग्रज विरोध करणार म्हणून तो लांबणीवर टाकला. त्यानंतर स्वराज्यात बरीच खटपट घडून आली. भव्य राजाभिषेक सोहळा राजधानी रायगडावर झाला. अनेक राजकीय घटना घडल्या, घडत होत्या. पण खांदेरी बेटं आजही महाराजांना खुणावत होतं. ह्या सगळ्यात १६७९ साल उजाडलं. ह्यावर्षी सिद्दी मुंबईत न थांबता सुरतेला निघून गेला. इंग्रज असो की पोर्तुगीज सगळे आपल्या बोटा पावसात बंदरात उभ्या करत. आणि १६७९ साली पावसातच आपल्या बेताला मूर्त रूप देण्याचं ठरवले गेले. परकीय सत्ताना इथल्या इतद्देशीय सत्तेची जाणीव करून देयची होती. कदाचित ही भविष्याची चाहूल होती की इथे ह्या सिंधूसागरातही आता पुठे भगवाच फडकणार.

येत्या काही दिवसात आपण जाणून घेणार आहोत की खांदेरीचा रणसंग्राम कसा घडला. समकालीन साधनं आणि त्यांचं काहीसं केलेलं नाट्यमय वर्णन अश्या स्वरूपात हे लेखन असेल. श्री गजानन मेहंदळे सरांनी ह्याआधीच त्यांच्या शिवछत्रपतीचे आरमार ह्या पुस्तकात ह्या घटनेचा पूर्ण उदापोह केला आहे. English record ही घटना पूर्णपणे उलगडवून सांगतात. History of maratha navy मध्ये आरमार ही रचना नीटपणे समजावून सांगितली आहे. तरी आम्ही हा छोटासा प्रयत्न करून बघितला आहे. तर लवकरच संपूर्ण लेखमालिका सादर करू. तूर्तास लेखनसीमा.

फोटो साभार : इंटरनेट

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

Leave a Comment