खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ११ | शिरोडा सत्याग्रह –
कोकणात झालेल्या शिरोडा येथील मीठाच्या सत्याग्रहात खानदेशातील सत्याग्रहींचे मोठे योगदान आहे. या सत्याग्रहात आचार्य शं.द.जावडेकर, त्र्यंबकराव देवगिरीकर , सी.गो.रानडे, डॉ.बाळकृष्ण लागू, डॉ.आठल्ये, विनायक भुस्कुटे, धर्मानंद कोसंबी, परचुरे, सहस्त्रबुद्धे, अ.भा.पंडीत,अप्पा नाबर,अप्पासाहेब नाबर,अप्पासाहेब पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले होते तर साने गुरुजी शिरोड्यास पोचले तेव्हा त्यांना कळले की पुर्व खानदेशातील मंडळी आधीच पोचली होती. गुरुजींना सत्याग्रहात सामील व्हायचे होते परंतु पिंपराळे आश्रमाचे गोखले हे शिरोडा येथे पोचल्यामुळे गोखले यांनी साने गुरुजी आणि वि.ग. कुलकर्णी यांना पैसे जमा करण्यासाठी परत खानदेशात पाठवले असा उल्लेख राजा मंगळवेढेकर,साने गुरूजींची जिवनगाथा , साधना प्रकाशन,पुणे १९७५ यात केला आहे.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ११ – शिरोडा सत्याग्रह)
संख्याबळाने मुंबईच्या पथकाबरोबर जळगावचे पथक होते. आणि त्यात १०३ सत्याग्रही असल्याचे आणि त्यातील प्रत्येक जण कणखर असल्याचे गुप्तचर अहवालात नमूद केले आहे.अतिशय शिस्तबध्द पध्दतीने गांधीजींच्या सुचनेनुसार मारहाण सहन करीत हा सत्याग्रह पार पडला. सर्व पथके जायबंदी झाल्यावर १५ मे रोजी जळगाव पथकाने नेत्रदीपक दर्शन घडवले की जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक हेलावून गेले. सीताराम भाऊ चौधरी,मल्हारी चिकाटे सहभागी झाले होते तर अहिंसा,सत्हेय, अस्तेय, अपरिग्रह ब्रम्हचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, भयवर्जन, सर्वधर्म समभाव, स्वदेशी, स्पर्शभावना या एकादश आचारसंहितेचे पालन केले. यातील बरेच जण विलेपार्ले येथील शिबिरात प्रशिक्षण घेतलेले होते आणि त्याचा प्रत्यय या सत्याग्रहात आला. हा सत्याग्रह १२ मे १९३१ ते १५ मे पर्यंत चालला.( रामभाऊ भोगे, जळगाव जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याच्या गत इतिहासाचे सिंहावलोकन, महात्मा गांधी राष्ट्रीय साहित्य भांडार, जळगाव १९८८)
सत्याग्रहासाठी आर्थिक मदतीची गरज होती ती सुद्धा सामान्य लोकांनी सढळ हाताने मदत केली आणि जवळपास जळगाव जिल्ह्यातील ५०० तर धुळे जिल्ह्यातील तेवढ्याच व्यक्तींनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला आणि कारावास पत्करला. यात महिला देखील होत्या.
पावसाळ्याचा प्रारंभ झाल्यानंतर मग मिठाचा सत्याग्रह बंद पडला आणि जंगल सत्याग्रहाने सविनय कायदेभंगाचे स्वरूप धारण केले आणि महाराष्ट्रात कळवण, अकोला, संगमनेर, बागलाण,चिरनेर या ठिकाणी सत्याग्रह झाले. अनेक गावातील पाटीलांनी राजीनामा दिला आणि सत्याग्रहात सामील झाले.
महाराष्ट्र काँग्रेस युध्दमंडळाने जंगल सत्याग्रहाला सुरुवात केल्यावर चोपडा, यावल, रावेर तालुक्यातील अकुलखेडे येथेही जंगल सत्याग्रह कार्यालय उघडून प्रचारकार्य सुरू झाले. अडावद येथे सभेत स्फुर्तीदायक भाषण केले म्हणून सुभान तोताराम पाटील या बालस्वयंसेवकास अटक करण्यात आली. या सत्याग्रहात बऱ्याच स्वयंसेवकांना सक्त मजुरीची शिक्षा झाली.
सुकाभाऊ चौधरी, सोनजी कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, चिटणीस तथा झिपरूबुवा यांनी सत्याग्रहास चालना दिली. जामनेर, एरंडोल, जळगाव, पाचोरा व चाळीसगाव तालुक्यातील सरकारी राखीव जंगलातील गवत आणि झाडे कापणे आणि वनोत्पादन हस्तगत करणे हे जंगल सत्याग्रहाचे स्वरूप होते. वाढ झालेली मोठी झाडे तोडू नये असे आवाहन केले होते. जळगाव येथील रामचंद्र धोंडो भोगे यांनी जळगाव पोलीस ठाण्याजवळचं सत्याग्रहाची घोषणा केली.
मोठी झाडे न तोडण्याचे आवाहन सत्याग्रहींनी केले असले तरी इंग्रज्यांनी त्या आधीच्या पन्नास वर्षात वखारींचा व्यवसाय करून खानदेशातील सातपुड्याच्या सागवानी लाकडाच्या जोरावर ब्रिटन मध्ये व्हिला आणि लाकडी फर्निचर व्यवसाय करून गबर झाले होते तर सातपुडा ओकाबोका झाला होता.
माहिती साभार –