महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,943

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ५ | समाजातील बदल

By Discover Maharashtra Views: 2507 4 Min Read

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ५ | समाजातील बदल –

१९२३ च्या मुळशी सत्याग्रहात दास्ताने यांनी बरीच कामगिरी केली आणि ३० मे पासून कारावास पत्करला. सेनापती बापट यांच्या बरोबर ते मुळशी सत्याग्रह मंडळाचे सभासद होते. याच काळात अतिशय लहान वाटणारी पण महत्वाची घटना म्हणजे राष्ट्रीय गीतांची परंपरा जळगावला ऑक्टोबर १९२० पासून रूजली होती. जळगाव नगरपालिकेने आपल्या अधिकार क्षेत्राच्या शाळांमध्ये देशभक्तीपर वाचन पाठ व राष्ट्रीय गीते म्हणायचा उपक्रम सुरू केला. सरकारला हे आवडणे शक्यच नव्हते. त्यावर सरकारने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केला. नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने शांताराम सोनाळकरांच्या प्रेरणेने सरकारचा जाहिररित्या निषेध देखील केला. तसेच नगरपालिकेने आपल्या क्षेत्रातील मद्यपान विक्रीची दुकाने बाहेर हाकलण्याचे धाडस दाखवले. या बाबी फार लहान नव्हत्या.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ५)

फक्त स्वातंत्र्य चळवळ नसून त्याला सामाजिक सुधारणेची जोड होती, हे लक्षात येते तर  समाज सुधारणेची  महत्त्वाची बाब तत्कालीन राजकीय पुढाऱ्यांमध्यील प्रेरणा आणि उद्दीष्ट  होती. पुढील काळात  ती का आणि कशी नष्ट झाली हाच खरा संशोधनाचा विषय आहे. असो.

जळगाव येथे १९२४ मध्ये महाराष्ट्र प्रांतिक परिषदेचे अधिवेशन शंकरराव देव यांच्या आग्रहाखातर तर गंगाधरराव देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली भरवतांना दास्ताने आणि इतर सहकाऱ्यांना बरेच प्रयत्न करावे लागले कारण महाराष्ट्र प्रांतिक काॅंग्रेस समितीचे अध्यक्ष नरसिंह चिंतामण केळकर हे गांधीवादी विचारांच्या विरोधात असल्याने उपाध्यक्ष पद भुषवणाऱ्या दास्तानेंना केळकरांच्या विरोधी भुमिकेला तोंड द्यावे लागत असे. तरी हा वादाचा मुद्दा होऊ न देता देशभक्ती ने भारलेले ते वातावरण होते.     अधिवेशानासाठी त्यांनी महाराष्ट्रभर फिरून वर्गणी मिळवली. खादीचे प्रदर्शन भरवले. जळगाव, धुळे, नंदुरबार आणि भुसावळ येथे तसेच तालुका पातळीवर खादीची भांडारे सुरू झाली. जिल्ह्यात खादी निर्मितीला चालना मिळाली आणि गावागावात लोक खादी वापरू लागले. देवकीनंदन आणि ना.मा.गोखले यांच्या सहकार्याने जळगाव नगरपालिकेच्या कार्यालयासमोरच खादीशाळा उघडली आणि पिंपराळे येथे राष्ट्रीय आश्रमाला प्रारंभ झाला. या आश्रमशाळेत काम करणाऱ्या शिक्षकांनी देवकीनंदन, गोपाळराव वाळुंजकर, वि.ग. कुलकर्णी यांनी खादीबरोबरच १९३० च्या सविनय कायदेभंग आंदोलनात मोठी कामगिरी बजावली.

अमळनेर येथील शाळेत ठकार आणि नंदुरबार येथील बाळुभाई मेहता यांनी पश्र्चिम खानदेशात खादी प्रसार केला, जामनेर येथेही प्रसार झाला.

ही केंद्रे एकप्रकारे सामाजिक सुधारणा आणि देशप्रेमी लोकांना एकत्र आणण्याचा केंद्र झाली. बा.र. देशपांडे यांच्या देखरेखीखाली प्रतापशेट, अमळनेरच्या यांनी दिलेल्या रकमेतून चोपडा तालुक्यात एक खादी केंद्र तर कडगाव उद्योग मंदिर कार्यान्वित केली. या उदाहरणावरून दिसून येते की अगदी खेडोपाडी ही चळवळ जाऊन पोचली होती.

महात्मा गांधी यांनी १९२७ मधील खानदेश दौऱ्यात चाळीसगाव, जळगाव व भुसावळ येथे भेट दिली. यामुळे गुजरात प्रमाणेच बार्डोली सत्याग्रह महाराष्ट्रात कास्तकारांमध्ये आपल्या हक्कासाठी जागृती निर्माण झाली आणि स्वयंसेवक तयार झाले. सत्याग्रहरूपी शस्राचे महत्व शेतकरी आणि महाराष्ट्रातील ब्राम्हणेतर पक्षियांना पटले आणि जनजागृती झाली. तेव्हा पासून ब्राम्हणेतर पुढारी कॉंग्रेस कडे आकर्षित झाले.

अमळनेर येथील प्रतापशेट यांनी सावळाराम बाळाजी नाईक यांच्या प्रेरणेने १९१६ मध्ये तत्वज्ञान मंदिर स्थापन केले. पाश्र्चात्य तत्वज्ञानाच्या परिभाषेत भारतीय तत्त्वज्ञानाची योग्यता पटवून पाश्र्चात्य आणि पौर्वात्य तत्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यासास उत्तेजन देणे हेच या संस्थेचे ध्येय आहे. बंगाल सारख्या प्रांतातून विद्यार्थी शिकायला यायचे. साने गुरुजी त्यामुळे आकृष्ट झाले आणि १९२३ ला अमळनेर येथे माध्यमिक शाळेत ते रूजू झाले. या परिसरातील बुध्दीवंतांचे आणि शिक्षणाचे अमळनेर हे केंद्र बनले. जळगाव आधी पुण्यामुंबईला ज्यांना शिकणे शक्य नसे ती लोक अमळनेर येथील शाळा कॉलेजात शिकत असत.

संदर्भ: महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४.

माहिती साभार –

Leave a Comment