खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ९ | खानदेशातील इतर चळवळी –
१९३७ मध्ये प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या आणि यात पुर्व खानदेशात धनाजी नाना चौधरी आणि द.बा. वाडेकर यांनी राजमल लखीचंद यांनी काँग्रेस तर्फे तर विरोधी पक्षांनी नथू मनोहर पाटील,वामन संपत आणि काका राणे यांना उभे केले होते. पश्र्चिम खानदेशात नवल आनंदा पाटील आणि मंगेश भबुता, नथूभाऊ पारोळेकर हे काँग्रेसचे तर विरोधी पक्षातर्फे नामदेवराव बुधाजी हे उमेदवार होते. धनाजी नाना आणि राजमल लखीचंद तर पश्र्चिम भागात नवलभाऊ आणि मंगेश भबुता आणि नामदेवराव बुधाजी निवडून आले.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ९)
खानदेश हा शेतीप्रधान समाज असल्याने सत्यशोधक समाजाच्या विशेष आस्था शेतकऱ्यांविषयी असणे साहजिक आहे. जे उद्योगधंदे आहे ते सुद्धा शेतीवरच अवलंबून आहे.
खानदेशातील शेतकरी चळवळ –
सावदा येथील जमीन मोजणीसाठी त्यावेळी केलेला उठाव मागच्या लेखात बघितला. त्यावेळी अपूर्ण राहिलेले जमिन मोजणी १८७६ मध्ये सुरू झालेली १९०४ मध्ये संपली. या नंतरच्या काळात इंग्रज्यांनी कापूस उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आणि १९०४ मध्ये धुळे येथे “कापूस संशोधन केंद्र” सुरू केले. सरकार तर्फे कर्ज आणि मदतीचे वाटप करण्यात आले.
१९०६ मध्ये बोदवड तालुका भुसावळ येथे तर पश्चिम खानदेशात होळनाथे, तालुका शिरपूर येथे सहकारी सोसायट्या स्थापन झाल्या, अशी नोंद खानदेश गॅझेटियर मध्ये आहे. या सोसायट्या स्थापन करण्यामागे शेतकऱ्यांना पतपुरवठा करणे हाच एक उद्देश होता. अल्प आणि दिर्घ मुदतीचा पुरवठा केला जात असे. यांची वाढ मात्र ग्रामिण भागातच झाली हे साहजिकच आहे. १९०९-१९३५ पर्यत शेतकरी चळवळ झाली नाही. या काळात शेतमाल बाजार समितीच्या स्थापना झाली.
अमळनेर येथील टोल टॅक्स प्रकरण –
अमळनेर येथे गिरणी कामगारांचा संप चालू असतांना म्युनसिपल हद्दीत येणाऱ्या बैलगाड्यांवर टोल टॅक्स लागू केले. शेतसारा आधीच कमी होत नव्हता अजून सावकारांचे देणे आणि शेतीमालाला भाव नव्हता यामुळे हा टॅक्स झेपणारा नव्हता. १९-४-१९३८ च्या काँग्रेस नामक वृत्तपत्रात साने गुरुजी यांनी लिहीले की, “अमळनेर येथे येणारी सगळी संपत्ती खेड्यातील आहे.
व्यापारी, वकिल, डॉक्टर, सावकार, कारखानदार सगळ्यांची संपत्ती ही खेड्यातूनच येते. त्यांच्या पैदासीवर तुम्ही श्रीमंत झालात आणि शेतकरी मात्र भिकारी झाला. तुमचे रस्ते झिजतात म्हणून खेड्यातील गाड्यावर कर”. टोल टॅक्स निवारण समिती स्थापन करण्यात आली आणि साने गुरुजी आणि उत्तमराव पाटील कार्यकर्ते झाले. अमळनेर येथील शेतकऱ्यांनी १३-५-१९३८ ला मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली आणि सभेत रूपांतर झाले. तीस जूनला निषेध दिन पाळण्यात आला. अमळनेर काँग्रेस कमिटीच्या मदतीने तोडगा काढला गेला पण रिकाम्या आणि ओझे असलेल्या गाडीवर अर्धा आणा आणि भरलेल्या गाडीवर दीड आणा कर असे म्युनसिपाल्टीच्या सभेत ठराव करण्यात आला पण शेतकरी असंतोष कायम धुमसत राहिला. हा शेतकऱ्यांवर बसवलेल्या टॅक्स अन्याय आहे आणि कोणत्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही असा विचार करून साने गुरुजी अस्वस्थ झाले आणि उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. मार्च १९३९ मध्ये हा टॅक्स रद्द करण्यात येईल असे आश्वासन दिले.
जळगाव कलेक्टर कचेरीवर १९३८ मध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा –
या वर्षी खानदेशात अतिवृष्टीमुळे पिके बुडाली आणि ओल्या दुष्काळामुळे हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतसारा माफ करावा म्हणून विनंती केली तर प्रत्येकाने वैयक्तिक अर्ज करावे आसे फर्मान काढण्यात आले. आणेवारी ही सहा आणे लागली गरीब व अडाणी शेतकऱ्यांना हे अडचणीचे होते. म्हणून या गाऱ्हाण्यांना वाचा फोडण्यासाठी जागोजागी परिषदा झाल्या आणि २८ डिसेंबर रोजी पारोळा तालुक्यातील देवगाव येथे मोठी सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी का. डांगे होते. सरदेसाई, साने गुरुजी आणि लालजी पेंडसे यांनी भाषणे केली. २६ जानेवारी १९३९ रोजी कलेक्टर कचेरीवर मोर्चा न्यायचे ठरले.
येथून तेथून सारा पेटू दे देश, पेटू दे देश हे किसान गीत साने गुरूजींनी लिहिले.
आता उडवू सारे रान
आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
ही गाणी खेडोपाडी गुणगुणली जाऊ लागली.
या मोर्चात गावोगावचे शेतकरी यायला सुरुवात झाली पण काँग्रेसचे नेते मंडळी नाराज झाले त्यांच्या मते सरकार आपलेच आहे आणि साने गुरुजी आपल्या लोकांना विरोध करत आहेत. काँग्रेसच्या वृत्तपत्रात साने गुरुजींच्या या वागण्याचा नाराजी व्यक्त करण्यात आली आणि कलेक्टर निवेदन घेण्यासाठी उपलब्ध नाहीत ते चाळीसगाव येथे गेले आहेत अशी सारवासारव करण्यात आली आणि मोर्चा रद्द करावा अशी मागणी केली पण तोपर्यंत लोक जमत होते. खेड्यातील लोक दुरून दुरुन भाकरी बांधून आले होते. शेवटी मोर्चा रद्द झाला तर लोक निराश होतील आणि त्यांचा संघटनेवरील विश्वासच उडेल असा विचार करून मोर्चाच्या जागी शेतकरी परिषद झाली.
शेवटी सहा फेब्रुवारी रोजी कलेक्टर यांनी दोन आणे पीकवारी कमी केल्याचे घोषित केले पण यावर शेतकरी समाधानी झाले नाही तर मंत्री मंडळाने दखल घेतली नाही.महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी पण खानदेश शिष्टमंडळास नकारात्मक उत्तर दिले.
१९३७ मध्ये धुळे येथे पश्चिम खानदेश जिल्हा शेतकरी परिषद झाली. यात प्रामुख्याने शेतकरी प्रश्नांवर चर्चा व्हायला सुरुवात झाली ही जमेची बाजू होती. पुर्व खानदेशात अशा परिषदा झाल्या. पारोळा तालुका शेतकरी परिषद येथे १९३७ मध्ये आमदार गंभीरराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली तर एरंडोल तालुका शेतकरी परिषद आडगाव येथे धनाजी नाना चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झाली. जळगाव तालुका शेतकरी परिषद असोदा येथे जमालऊद्दीन हसन बुखारी, जी. डी. साने, एस. जी. सरदेसाई, बी. टी. रणदिवे हे उपस्थित होते.
माहिती साभार –