महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 89,11,549

खानदेश

Views: 2438
7 Min Read

खानदेश –

तापीच्या खोऱ्यात १६० किलोमीटर अंतरावर पसरलेला भुभाग, तेवढीच लांबी रूंदी असलेला प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तर भाग, उत्तरेला सातपुडा पर्वतरांगा, आशिरगड आणि तोरणमाळ हे विस्तृत पठारी किल्ले दोन सीमा तर ईशान्येला सैदवापास जो आग्रा रोड प्राचीन काळापासून प्रचलित असलेला, या घाटाचे भिल्ल समाज रक्षक म्हणून ओळखले जातात. आदिम समाज पुढे शहादा येथील डोंगररांगा खोलगट बारीक धार जी नर्मदा नदी सातपुड्याच्या रांगांमधून वहाते. हीच सीमा ओळखली जाते आणि उत्तर भारत दक्षिण भारत वेगळा करते, जो उत्तरपथ आणि दक्षिणपथ या नावाने जवळपास इसवीसन पुर्व पाचव्या शतकापासून प्रचलित असलेला आहे. दक्षिणेकडे भागात अजिंठा आणि सातमाळा पर्वतरांगा नाशिकजवळच्या चांदोर या नैसर्गिक सीमा मानायला हरकत नाही. वायव्येस आर्वा किंवा लळींग आणि गाळणा डोंगररांग, आणि पुढे सह्याद्री जो वायव्येस, नंदुरबारच्या पुढे, पंचपांडव पुर्वेकडील उंच डोंगर आणि मोन्धीममाळ यावलजवळ, ताजदीनवली नर्मदा खोरे आणि तापी खोरे जोडणारे, पश्चिमेला बाबाकुंवर, आणि अक्राणी महल , तोरणमाळ ही पर्वतशृंखला आहे.या टोकाला प्राचीन नगर प्रकाशे तर दुसरीकडे आशिरगड- बऱ्हाणपूर या सीमा, पुर्णा खोऱ्यात हत्ती डोंगररांग.

या सर्व रांगात उगमपावणाऱ्या छोट्या मोठ्या नद्या प्रमुख नद्या तापी, पुर्णा, गिरणा, बोरी, वाघुर, पांजरा, नर्मदा यांच्या विस्तृत पात्रांनी आणलेल्या गाळातील शेती सुपीक जमीन बनली.  त्यांच्या संगमावर तिर्थस्थळे जसे की दक्षिण काशी प्रकाशे, चांगदेव मुक्ताबाई,  इत्यादी होय.

जंगले असल्याने निम्मे उत्पन्न जंगलसंपत्ती आणि निम्मे लोक जंगलावर अवलंबून होते. दोन स्वतंत्र संस्कृती नांदत होत्या. नदीकाठी वसती करून शेती पिकवणारा समाज आणि जंगलांच्या आधारे पशुपालन करणारा समाज.. गवळी समाज..

अबुलफजल त्याच्या ऐन ए अकबरी मध्ये उल्लेख केला आहे की, खानदेश हे नामकरण गुजरातचा सुलतान अहमद पहिला यांनी इसवीसन १४१७ मध्ये मलिक नासीरखान या फारुकी राजाच्या नावावरून या प्रदेशाला दिले आहे.पण सिंक्लेअर यांच्या मते महाभारतातील खांडस या जंगलावरून खानदेश हे मुस्लिम राजवटीच्या आधीपासुन होते. सातपुड्याच्या कुशीत राहणारे भिल्लाव्यतिरिक्त भिलालस, काही राजपुत, वंजारी,पावरा जमाती होत्या. पश्चिम भागात कातकरी, गावित, मावची, पारधी, वडार आणि फासेपारधी आहे. सातपुड्याच्या जंगलातील सागाचे लाकुड हे आदिम काळापासून स्मगलिंगचे आकर्षण आहे.

या भागात लाकडापासून बैलगाडी इमारतीचे लाकुड आणि कलाकृती असलेले फर्निचर हे आकर्षणे राहिली आहेत.

लोक सर्वात आधी वसती करणाऱ्या लोकांत लाॅसन यांच्या मते, संस्कृत भाषा बोलणारे गुजरातच्या किनाऱ्यावरून तापी खोऱ्यात खाली उतरून आलेत. प्रकाशे येथील उत्खननामुळे या मताला दुजोरा मिळतो की  सुरवातीच्या काळात महाराष्ट्रात शेती सौराष्ट्र कडून आली, डॉ वसंत शिंदे यांच्या पीएचडी थेसीस आणि नंतरच्या महाराष्ट्रातील आदिम शेतकरी या संदर्भात केलेल्या संशोधनानुसार हा निष्कर्ष काढला गेला. पहिला ऐतिहासिक उल्लेख टाॅलेमीच्या  ग्रंथात इसवीसन १५० मधील फिल्लेटी आणि कोंडली कदाचित भिल आणि गोंड हे नर्मदेच्या दक्षिणेस रहाणारे असा उल्लेख आहे. विल्सन सातवा यांच्या मते भिल्ल हे पुलिंद असा उल्लेख असावा. दुसरा टालेमीचा उल्लेख म्हणजे ताबास्सी हे खानदेशातील रहिवासी कदाचित बुध्द भिक्खू असावेत जे अजिंठा येथील लेणीत रहात असावेत.

दुसरा उल्लेख म्हणजे अहिरांचा जे आशिरगड भागात राहिले स्थानिक परंपरेनुसार ते राजपुत जमातीचे वेगवेगळ्या सोळा, इसवीसन पुर्व सोळाशे मध्येच रहात होत्या, पण याला काहीच पुरावा उपलब्ध नाही. नेमाडी, मराठी आणि गुजराती या नंतरच्या काळात आलेल्या लोकांनी भिल्ल कोळ्यांना आत ढकलत स्वतः वसती केली, या संदर्भात टाॅलेमी उल्लेख करतो. हे गोंडच चाळीसगाव परिसरात दिसणारे गवळी आहेत का?  नंतरच्या काळात झालेल्या विविध आक्रमणात आलेले आणि येथेच स्थायिक झालेले कच्छ गुजरात आणि काठीयावाडचे लोक नाशिक अहमदनगर तसेच महाराष्ट्रातील इतर भागात दिसतात.

कनिंगहॅम यांच्या आर्किआलाजी रिपोर्ट मधील आबर्स जी एक सिथियन जमात होती,जी इसवीसन पुर्व पहिल्या दुसऱ्या शतकात उत्तर भारतात आली, त्यादरम्यान उत्तर भारतीयांना दक्षिणेकडे ढकलले गेले कदाचित हेच भारतीय असू शकतात. नाशिक लेणीतील शिलालेखात या अहिर राजांचा उल्लेख आहे,पण ते चौथ्या शतकातील आहेत. पाटणे आणि मानेगाव येथील उत्खननामुळे अश्मयुगीन काळापासून वसती होती हे लक्षात येते. जवळपास चाळीस हजार वर्षापासून मानवी वसती होती. पण ही उत्खनन १९७३ साली झालेले आहे आणि आधुनिक पुरातत्वीय पध्दती आणि दृष्टिकोन हा अमुलाग्र बदलला आहे त्यामुळे या भागात परत उत्खनने होऊन अभ्यास होण्याची गरज आहे. बहाळ येथे ताम्रपाषाणयुगीन काळातील अवशेष मिळाले आहेत.

मौर्य, शुंग, सातवाहन, क्षत्रप यांच्या राजवटीचे मोघम पुरावे आहेत पण पुरातत्वीय काळ आणि ऐतिहासिक काळ यांचा सलग पट मांडता आलेला नाही.  क्षत्रपांच्या नंतर जी मांडलिक राजे शिलालेखात आणि ताम्रपटात दिसतात.ज्यात आभीर,(आभीर क्षत्रपांच्या काळात मोठमोठ्या पदांवर होती,)  श्रीपर्वतीय, शक, किलकिल , महाराज स्वामीदास, भुलुंड जे धृतराष्ट्र वंशाचे, वाकाटक  इत्यादी तसेच सहाव्या शतकातील हुण, चालुक्य, सेंद्रक , हैहय किंवा कलचुरी, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव तर आशिरगड भागात दिसणारे आभीर आणि चौहान जे आशिरगडावर इतिहास पुर्व काळापासून असल्याचा दावा करतात.

अजिंठा, घटोत्कच आणि पितळखोरा लेणी इसवीसन पुर्व दुसऱ्या शतकापासून आहेत. राजस्थान येथील टोड जे टाक किंवा तक्षक हे इसवीसन पुर्व सहाव्या शतकात सिथियन आक्रमणाच्या काळात विखुरलेले आहेत ते आशिरगडावरील असावे,नाग राजे इतिहासात गायब झाले त्यावर परत संशोधन जरूरीचे आहे. फारूकी आणि पुढच्या काळाचा इतिहास ज्ञातच आहे.खानदेश.

राजकिय इतिहासाव्यतिरिक्त आर्थिक, धार्मिक आणि लोक संस्कृती यांचा इतिहास असतो. माणसांनी एकत्र येऊन जगण्याची लढाई यशस्वी करून नवीन काही शोधणे हाच खरा इतिहास आहे. खानदेशातील शेतीचा इतिहास कापूस उत्पादन आणि फळफळावळ पिकवून तसेच अतिरिक्त उत्पादन काढून व्यापार वाढवणे, शेतीसाठी बांध बांधून सिंचन व्यवस्था, निळ, आणि इतर धान्ये कडधान्ये डाळी आणि साखर उत्पादन करून इतर भागात पुरवठा करण्याची रीत आधीच्या काळापासून होती. खानदेशातील डोंगररांगांमध्ये जवळजवळ ९४ घाटमार्ग होते, फक्त पश्चिमेला जोडत तर पंधरा सह्याद्रीच्या भागात,५४ हे सातपुडा भागात २५ सातमाळा पर्वतरांगा ना जोडणारे होते, जे डांग गुजरात,माळवा, मध्यप्रदेश आणि उत्तर भारत दक्षिण भारत यांना जोडणारे होते. जे ब्रिटिश काळापर्यत सुरू होते. हे वर्णन जितके अधिक लांबवता येईल तेवढे लांबवू शकते.

इतिहासाचा मुख्य हेतू भूतकाळाच्या प्रकाशात वर्तमान समजून घेणे आहे. कदाचित खानदेश म्हणजे फक्त दक्षिणेचा दरवाजा आणि उत्तरपथ आणि दक्षिणपथ जोडणारा दुवा नसुन एक स्वतंत्र संस्कृती विकसित करणारा भाग होता हे या अभ्यासाअंती लक्षात येईल.

@ सरला

1 Comment