खानदेश नावाच्या व्युत्पत्तीबद्दल –
खानदेश व्युत्पती बाबत एकमत आढळत नाही. काहींच्या मते पांडवकालीन खांडववन म्हणजे खानदेश होय. अश्मक, स्कंधदेश, खांडवदेश, कान्हदेश अशी व्युत्पत्ती दिलेली आहे.ॠषीक देश म्हणजे खानदेश असाही विचार मांडण्यात आला आहे. ब्रिटिश अधिकारी सिंक्लेरच्या मते मूळचा कान्हदेश म्हणजे खानदेश हे नाव कृष्णावरुन आले असावे. मध्ययुगात देवगिरीकर यादव वंशातील सेऊणदेव पहिला या राजावरुन या प्रदेशास सेऊणदेव असे नाव पडले असावे. यादवांच्या अंतापर्यत त्यांचे सेऊणदेशावर राज्य होते. तुघलकांपैकी फिरोजशहा तुघलकाने थाळनेरची जहागिरी मलिकराजा फारुकीकडे १३७० मधे सोपवली. दुसरा फारुकी सुलतान नसिरखानच्या काळात म्हणजे इ.स. १३९९ ते १४३७ दरम्यान खानदेश हे नाव प्राप्त झाले अशी चर्चा जळगाव गॅझेटियरच्या प्रकरण १ च्या सुरवातीच्या पानावर आहे.(खानदेश नावाच्या व्युत्पत्तीबद्दल)
धुळे गॅझेटियरनुसार महाभारतातील खांडस प्रदेशाचा उल्लेखावरुन किंवा शांडस वरुन ह्या प्रदेशाला खानदेश नाव पडले असावे तर बर्टीन टोलेमी भीलशजे पुलिंद म्हणुन ओळखले जायचे त्यांना टालेमी अजुन पश्चिमेला तबस्सी जे खानदेशातील आहेत आणि बुद्ध नास्तिक अजिंठात व इतर सातमाळा लेण्यांत राहतात असे उल्लेख आढळतात.
या प्रदेशाचा प्राचीन नामोल्लेख ऋषिक करतात त्याबद्दल ठोसर वेगळ्याच मुद्द्याकडे लक्ष वेधतात. ५ व्या व १३ व्या अशोक स्तंभावर लेखात पितनिका किंवा पेतेनिका हा उल्लेख येतो. तसेच राथिक व भोजकांचाही उल्लेख येतो. काहींच्या मते तो उल्लेख पैठणचा असावा ह्याचा पुरावा ते सातवाहनांचे राजचिन्ह वरुन मिळतो असा युक्तिवाद होता पण तो चालला नाही कारण पैठणचा उल्लेख मूलक गोदावरी नदी तिराकाठी असा बौद्ध साहित्यात येतो. त्या लोकांचा उल्लेख मौलिक असा येतो. म्हणून पैठण पितनिका नाही. पितनिका हे पितना, पेटना ह्यांचा संबंध बुध्द वाडमयातील महामायुरीत प्रसिद्ध यक्ष जो दक्षिणेला आहे म्हणून एम. एम. देशपांडे पितनगल्य हे पितळखोरा, औंरंगाबादजवळील कन्नड़ तालुक्यातील ओळखतात तर खारवेलाच्या लेखात ऋषिकप्रदेश कृष्णा काठी आहे असा उल्लेखावरुन खानदेश म्हणजे ॠषिक नाही असा युक्तिवाद करतात. ह्यासाठी टालेमीचा पेत्रिगल असा उल्लेख येतो तर भांडारकर तापीतट व नर्मदातट असाच ह्या प्रदेशाचा उल्लेख करतात.
महाराष्ट्रातील स्थापत्यावर इथे राज्य केलेल्या राजसत्ता तसेच धर्मसत्तांचा प्रभाव राहिला आहे. नाशिक, पितळखोरे, अजिंठा तसेच जुन्नर व इतर बौद्ध स्थापत्यात ते दिसते. मौर्य सातवाहन, वाकाटक, अभिर, मैत्रक, चालुक्य, कलचुरी, राष्टकूट, सैदव, यादव, ह्यांची स्थापत्ये सापडतात. कोकणात शिलाहार, कदंब दिसतात. पश्चिमी किनारा व दक्षिण पथ व उत्तर पथ ला जोडणारा महाराष्ट्र असल्याने महत्वपूर्ण भूमिका निभवावी लागली तसेच तिथल्या बंदरांवर सत्ता ठेवण्यासाठी कल्याण, चौल, सोपारा सतत चुरस पण राहिली. पितळखोरे, नाशिक व अजिंठा येथील भाग खानदेश म्हणुन ओळखला जातो. खानदेशातील निवासींचा माळवा व गुजरात या प्रदेशातील संबंध हजारों वर्षांचा आहे. हे तिथल्या उत्खननातून स्पष्ट झाले आहे.
सर्वात प्राचीन सावळदा संस्कृती इ.स. पूर्व २२०० ते २००० उत्तर हडप्पा संस्कृती इ.स. पूर्व २००० ते १८००, माळवा संस्कृती इ. स. पूर्व १००० ते १५००, जोर्वे १५०० ते १००० ह्यांचा पुरावा मिळतो. उत्तरेकडील, दक्षिणेकडील ताम्रपाषाण संस्कृतीचा संगम दिसतो.
प्रागैतिहासिक कालीन इतिहास जाणुन घ्यायचा तर भौतीक अवशेषांवरच अबलंबून रहावे लागते. त्यासाठी बहुधा नदीकाठच्या भूगर्भिय स्थळांचे उत्खनन करुन स्तरीय अभ्यास केल्यास निरनिराळ्या कालखंडाचे अंदाज बांधता येतात. जळगाव जिल्ह्यातील झालेल्या उत्खननांवरुन असे एकच उत्खनन झाले आहे, ते म्हणजे बहाळ टेकावडे गिरणानदी काठचे .येथे पाच सांस्कृतिक कालखंड दिसतात. ताम्रपाषाण युग, पूर्व लोहयुग इ. स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ३००, इतिहास पूर्व काळ इ.स.पू.३००ते १०० यादव ते मुस्लीम राजवटी इ.स. १२०० ते इ.स. १७०० व नंतरचा मराठा काळ हा होय. मधला पहिले ते बारावे शतकातील काळाचे पुरावे मिळत नाहीत. स्थापत्यामधून ते मिळू शकतात तसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे तो काळ अंधारयुगातच गणला गेला. नंतरचे काही पुरावे मौर्य-सातवाहन काळाचे पुरावे अजिंठा-पितळखोरा या लेण्यांमधे दिसतात. उत्तरेची काळी खापरे अशोकाच्या काळाशी निगडीत असल्याचे मानले जाते. तशी खापरे बहाळच्या वरच्या स्तरात सापडली आहेत. त्याच काळातील आहत नाणी बहाळ, शेंदुर्णी येथे मिळाली आहेत. तसेच रावेर तालुक्यातील लोहारे, कुंभारखेडे ह्या गावातही आहत नाणी मिळाली आहेत. ग्राम नामावरुन त्या कारागिरांची वसती होती असा अंदाज लावू शकतो. इ.स.पुर्व २५० ते तिस-या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहनांचे राज्य होते हे नाशिक, अजिंठा येथील लेखांवरुन म्हणू शकतो. या परिसरातील किल्ल्यांवरील गुहांचा नीट अभ्यास झाल्यास पुढील काळाची संगती लावता येणे शक्य होईल.
उत्तर महाराष्ट्र व कोकणात नहपान ह्या क्षत्रप राजाची नाणी सापडली आहेत. जावई ॠषभदत्त ह्याच्या नाशिक लेण्यातील अभिलेखारुन कळते. तसेच ईश्वरसेन ह्या अभिर राजाच्या उल्लेखावरुन खानदेशात अभिर राजे होते हे कळते. अभिर रुद्रभुती हा रुद्रसिंग ह्या क्षत्रपाचा सेनापति होता ह्यावरुन क्षत्रपांचे अधिकारी अभिर होते हे कळते. आजही ह्या भागात अभीर-अहिर लोक राहतात व भाषा अहिराणी म्हणून ओळखली जाते. व्यवसाय गवळी असल्याने कुठलेही प्राचीन स्थापत्य गवळीराजाने बांधले अशी वंदता आहे ह्या परिसरात आहे. पुराणात एकुण दहा अभीर राजांची यादी येते. डॉ अ. स. आळतेकरांनी त्यांचा काळ इ. स. ४१६ पर्यंत असावा असे दाखवले आहे. ईश्वररात याने तापीनदी काठील प्रकाशे येथून दानपत्र दिले होते. यावरुन मध्य गुजरात व उत्तर खानदेश वर त्यांचे राज्य होते हे दिसते.
असिकनगरचा उल्लेख प्रथम येतो महामेघवाहन वंशातील खारवेल राजाचा शिलालेखात कृष्णवेण्णा म्हणजे कन्हानच्या पलिकडे त्याने असिकनगरापर्यत म्हणजे ॠषीक जनपदाच्या मुख्यालयापर्यत त्याच्या सैन्याने सातकर्णी राजाची पर्वा न करता धडक मारली होती. वशिष्ठीपुत्र पुळुमावीचा पिता, गौतमी बलश्रीचा पुत्र,क्षहरात वंशाचा विनाशक, इ. स. दुस-या शतकाचा पूर्वार्ध नाशिक लेणे क्र.३ कोरणारा राजा ह्याच्या राज्यातही ॠषीक जनपद सम्मिलित होते. त्याही अगोदर इ.स. पूर्वीच्या पहिल्या शतकात असिकनगर हे प्रसिद्ध होते. माळव्याहून उज्जैनहून दक्षिणेत येणा-या महामार्गावर जिथे वैनगंगाकडून निघणारा मार्ग पोचतो अशा चौफुलीवर हे प्राचीन नगर असणार.
वाकाटक राजा हरिषेणाचा सामंत असलेल्या उपेंद्रगुप्तांच्या संदर्भात अश्मकांच्या संदर्भात येतो. अजिंठा येथे गुफा क्र.१७ -१९ या ॠषिक घराण्याच्या राजाने कोरल्या असून क्रमांक २० ही गुंफाही त्याच्याच दातृत्वाचे प्रतिक आहे . शेवटच्या गुंफेच्या ओसरीच्या खांबावरच त्याचा उपेंद्रगुप्त म्हणुन उल्लेख येतो. क्रमांक १७ मधील गुंफेतील वर्णनावरुन या राजाने सर्वच राज्य स्तूप व विहारांनी अलंकृत करुन टाकले होते. या वर्णनावरुन इ. स. पाचव्या शतकात वाकाटक नृपती हरिषेणाचा थाळनेर ताम्रपट पाचवे शतक शंखाकृती ब्राम्ही भाषा संस्कृत भाषा ही होय.
महाराज स्वामीदास महाराज भुलुंड, महाराज रुद्रदास ह्यांचे ताम्रपट इ .स. ३१६ -३६७ ह्यांचे बाघ येथेही बरेच ताम्रपट तर अजिंठा क्रमांक १७मधे राजा कृष्णदास क्र १९ निर्माण केले. इ.स. ४७५ ते ५०० मधील सारे पुरावे खानदेशातील आभीर राजे हे हरिषेणाचे वाकाटक राजांचे मांडलिक होते हे दर्शवतात. इसवी सनाच्या पाचव्या शतकात खानदेशच्या भागावर वाकाटकांचे प्रभुत्व होते हे अजिंठ्यातील क्र १६-१७ लेणीतील शिलालेखातील मंत्री वराहदेवाच्या उल्लेखावरुन कळते तसेच घटोत्कच लेणी जी अजिंठापासून १६ किलोमीटर अंतरावर आहे व इ. स. ४७५ च्या सुमाराचे अभिलेख आहेत. तसेच हरिषेण या वाकाटक राजाचा ताम्रपट स्थलिकानगरातून आजचे थाळनेर येथून मिळाला आहे. हरिषेण राजाच्या मनात अश्मकांची भिती दिसते व हरिषेणाच्या मृत्युनंतर अजिंठ्याच्या काही लेण्या अश्मकांनी कोरलेल्या दिसतात. अश्मक कोण हे कळत नाही. नंतरच्या म्हणजे इ.स. ६३० च्या लोहनेर ताम्रपटात जळगावला लागून असलेल्या मालेगावचा उल्लेख येतो.
दानकर्ता राजा पुलकेशी प्रथमचा ऐहोळे प्रशस्तिवरुन चालुक्यांनी खानदेशात सत्ता प्रस्थापित केलेली दिसते. या नंतरचे पाच ताम्रपट सेंद्रक घराण्याशी संबंधित मिळाले आहेत हे चालुक्यांशी संबंधित होते व गुजरातला जायचा मार्ग खानदेशातून वापरलेला दिसतो. चार ताम्रपट खानदेशात व पाचवा ताम्रपट गुजरात मधे मिळाला. त्यातील तीन जळगाव जिल्ह्यात मिळाले.त्यातील निकुंभ हे बिरुद धारण करणारा अल्लशक्ती नावाचा राजा नंदुरबार विषयातील गावाचे दान करतो असा उल्लेख नागद ताम्रपटात येतो. नागद गाव हे चाळीसगाव व कन्नड तालुक्यातील सीमेवर आहे. ह्याचा उल्लेख इ.स. ६५३ च्या ताम्रपटात येतो. त्याचा मुलगा जयशक्ती इ.स. ६८०-८१ च्या मुंदखेडे या जळगावच्या पश्चिमेला सिमेवरील गावांच्या दानाचा उल्लेख येतो तर बहलापुरीहून दिलेल्या इ.स. ७०२ च्या ताम्रशासनात देवीग्रामचा उल्लेख येतो म्हणजे जवळजवळ सम्राट बदलले तरी स्थानिक सत्ताच बळकट होत्या असे म्हणता येते. पुलकेशी दुसरा चालुक्य इ. स. ६३० चा लोहनेर ताम्रपटात मालेगावला लागून असलेल्या भूभागाचा समावेश दिसतो. दुसरा वजिरखेडे मालेगावजवळ आहे व त्यात गिरणा नदीचा उल्लेख गिरिपर्णा असा आहे. ताम्रपटावरील संस्कृत प्रशस्तिचा लेखक कवी राजशेखर आहे.
– सरला