महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,47,996

स्वराज्याचे स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ…

By Discover Maharashtra Views: 5124 6 Min Read

स्वराज्याचे स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ…

खंडो बल्लाळ यांचे वडील आवजी चिटणीस हे बाळाजी आवजी म्हणून प्रसिद्ध होते.बाळाजी आवजी यांचे मूळ आडनाव चित्रे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वैयक्तिक चिटणीस म्हणून ते काम करत होते . त्यामुळे त्यांनी चिटणीस आडनाव वापरण्यास सुरुवात केली.

खंडोजी बल्लाळ यांचा जन्म इ.स.१६६६ च्या सुमारास झाला असावा.खंडोबल्लाळ यांना घोड्यावर बसणे,तलवार चालवणे व अक्षरांचे उत्तम वळण इत्यादी तत्कालीन उपयुक्त असे शिक्षण मिळाले होते. खंडो बल्लाळ यांचा बांधा मजबूत असून ते अंगानेही धिप्पाड होते.

आवजीच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र खंडो बल्लाळ व निळो बल्लाळ या दोन भावांवर  येसूबाई राणीसाहेब यांनी  पुत्रवत प्रेम करून सांभाळ केला. पुढे खंडो बल्लाळ यांनी छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती  राजाराम महाराज यांची अत्यंत निष्ठेने सेवा केली व आपल्या स्वामीनिष्ठेने सर्वांची मने जिंकली. महाराष्ट्राच्या इतिहासात स्वामिनिष्ठ म्हणून त्यांची नावे आजरामर झाली. येसूबाई राणीसाहेबांच्या संस्काराचा परिणाम  म्हटल्यास वावगे होणार नाही.

खंडोबल्लाळ यांनी छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत निष्ठेने नऊ वर्ष सेवा केली.छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ठार करेपर्यंत अतिशय प्नामाणिकपणे खंडोबल्लाळ छत्रपती संभाजी महाराज यांची सेवा केली.

२४-११- १६८३ रोजी रात्री आठ वाजता मराठा सैन्याने जुवे   बेटात जाऊन तेथील किल्ला काबीज केला.विजरई हा पोर्तुगाल व्हाॅईसराॅय याची तर अतिशय घाबरगुंडी उडाली.छत्रपती संभाजीराजांनी ओहोटीच्या वेळी आपले चार हजार सैन्य पाठवून किल्ला ताब्यात घेतला . छत्रपती संभाजी राजांचे सैन्य किल्ल्यात घुसले आणि  किल्ल्यातील सर्व शिबंदीची कत्तल केली.छत्रपती  संभाजीराजांच्या सैन्याचे काहीच नुकसान झाले नाही.किल्ला ताब्यात आला.याचा इशारा म्हणून त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या सैनिकांनी अनेक तोफगोळे गोव्याच्या दिशेने सोडले. त्यावेळी गोव्यात विलक्षण गोंधळ उडाला. विजरई कोंदि द आल्व्होर याने ४०० शिपायांसोबत जुवे बेटाकडे कूच केले .मराठ्यांचे सैन्य जणू वाटच बघत बसले होते. पोर्तुगीज सैन्य मार्‍याच्या टप्प्यात येताच मराठ्यांनी हल्ला चढवला व पोर्तुगीजांना ‘ दे माय धरणी ठाय ‘करून सोडले .

मराठ्यांच्या घोडदळास घाबरून पोर्तुगीजांचे शिपाई जीव वाचवण्यासाठी विजरईस एकटेच सोडून डोंगरावरून खाली नदीच्या तीराकडे पळत गेले.या लढाईमध्ये विजरई घायाळ झाला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो वाचला.जुवे बेट मराठ्यांच्या ताब्यात गेल्यामुळे  नदीच्या बाजूस लागून ज्या शेत जमिनी होत्या त्याचे बांध पोर्तुगीजांनी  फोडून टाकले.त्यामुळे जवळील मांडवी नदीचे पात्रात पाणी वाढू लागले.त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला व त्यासोबत पोर्तुगीज देखील घाबरून पळत सुटले .तेथे झालेल्या लढाईमध्ये विजरई याच्या दंडाला गोळी लागली.दोन्ही बाजूंनी पोर्तुगीज कात्रीत सापडले.बांध फोडून स्वःतहाच्याच हाताने आपले नुकसान करून घेतले असे त्यांना वाटू लागले.  पोर्तुगीजांना नदीच्या पलीकडे जाता येत नव्हते. आणि पाठीमागून खुद्द छत्रपती संभाजीमहाराज व त्यांचे सैन्य पाठलाग करत होते.

आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या तावडीत सापडलो तर आपले काही खरे नाही हे त्यांना समजले होते. संभाजीराजे किती इरेला पेटले होते हे यावरून लक्षात येते. पोर्तुगीज एका मचव्यात बसले आणि पळाले.विजरई याला मचव्यात बसून पळताना पाहताच त्या तुडूंब भरलेल्या मांडवी नदीच्या पात्रात  संभाजी महाराजांनी आपला घोडा घातला!आपल्या जीवाचे काय बरे वाईट होईल याची पर्वा  देखील छत्रपतीनी केली नाही.नदीला आलेल्या भरतीमुळे संभाजी महाराजांचा घोडा पोहनीला लागला.यावेळी खंडोबल्लाळ तेथे शंभू महाराजां सोबत होते. घोडा पोहनीला लागलेला पाहताच, त्यांनी देखील त्या नदीच्या पात्रात उडी घेतली आणि जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचे प्राण वाचवले.दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी टळली.

वर्षभरापूर्वीच संभाजीराजांनी खंडो बल्लाळ यांच्या वडिलांना म्हणजेच बाळाजी आवजी चिटणीस यांना देहदंडाची शिक्षा केली होती.तरीही मनात कुठलाही द्वेष न ठेवता केलेली  ही स्वामीनिष्ठा कोठे पहायला मिळेल का?

खंडो बल्लाळ यांनी केलेल्या कामगिरीबद्दल  संभाजी महाराज यांनी आनंदाने खंडो बल्लाळ याला मिठी मारली . त्यांचा सत्कार केला, महाराजांनी खंडोबल्लाळ यांना पोटाशी धरले, घोडा बक्षीस दिला, खासा उतारपोशाख दिला. मोत्याची कंठी व तुरा  देऊन सोबत पालखीचा मान दिला.

सन. १६९८ च्या सुरुवातीच्या काळात ,जेव्हा मोगली सैन्याने जिंजी किल्याला वेढा दिला होता. (कर्नाटकात)  आणि शेवटच्या तडजोडीसाठी तयार झाला होता ,तेव्हा खंडो बल्लाळाने राजाराम महाराजांच्या सुटकेसाठी खुप प्रयत्न केले होते.ते गुप्तपणे देखील मोगल छावणीत गणोजी शिर्के व मराठा सरदारांना भेटले होते. मुघल  सरदारांची नाकेबंदी करण्यापासून राजाराम महाराजांची सुटका करणे पर्यंत खंडोबल्लाळांनी खूप मोठे काम केले होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या सुटकेला मदत करणेसाठी गणोजी शिर्केनी काही अटी घातल्या होत्या.त्या अटी मान्य करून ही गणोजी शिर्के यांनी मोठी मागणी केली ती म्हणजे दाभोळच्या  वतनाची.ते वतन खंडोबल्लाळ यांच्या मालकीचे होते. काही वेळातच खंडो बल्लाळ यांनी कागदाचा तुकडा ओढला आणि वतनाचे हक्क देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले.या खंडोबल्लाळ यांच्या कामगिरीने छत्रपती राजाराम महाराज व त्यांच्या कुटुंबियांना जिंजीच्या वेढ्यातून सोडवून धनाजी जाधवराव यांच्या सुखरुप महाराष्टात ताब्यात दिले.

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूपर्यंत खंडोबल्लाळ यांनी प्रामाणिकपणे विश्वासू सल्लागार म्हणून त्यांचे काम केले. राजाराम महाराजांच्या  मृत्यूनंतर खंडो बल्लाळ यांनी महाराणी ताराबाई यांच्याबरोबर आपली निष्ठा कायम ठेवली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या सुटकेसाठी खंडोबल्लाळ यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले .म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना मोठा आदर आणि सन्मान दिला.पुढे  लवकरच १९ सप्टेंबर १७१२ मध्ये खंडो बल्लाळ यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा गोविंद खंडेराव चिटणीस म्हणून शाहू महाराजांचे कामकाज पाहू  लागले.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment