महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,54,496

खंडोबा मंदिर, बीड

By Discover Maharashtra Views: 1350 2 Min Read

खंडोबा मंदिर, बीड –

बीड हे मराठवाड्यातील एक ऐतिहासिक शहर असून जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. बिंदुसरा नदीच्या काठावर हे शहर वसलेले आहे. बीड जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासा विषयी पुराणांतून काही उल्लेख आढळतात. बीड शहरातील जटाशंकराच्या मंदिराविषयी रामायणकालीन दंतकथाही प्रचलित आहे. तसेच इ.स. चौथ्या शतकापासून या जिल्ह्याचा इतिहास उपलब्ध आहे. प्राचीन काळी या नगरीचे नाव दुर्गावती व नंतर बलनी असल्याचे उल्लेख पुराणात आढळतात. चालुक्य घराण्यातील राजा विक्रमादित्याच्या भगिनीने म्हणजेच चंपावतीने हे नगर घेतल्यानंतर याचे ’चंपावती नगर’ असे नामकरण केले होते.(खंडोबा मंदिर, बीड)

यादवांच्या काळात हा चंपावती प्रदेश अलाउद्दीन खिल्जीने जिंकल्यावर कालांतराने मुहम्मद तुघलकाच्या अमदानीत या नगराचे नाव ‘बीड’ असे होऊन हा सुभा बनला. पुढे याचा समावेश प्रथम बहमनी व नंतर निजामशाहीत झाला. मराठी सत्तेचा उदय झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन व खर्डा येथे लढाया झाल्या आणि हा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. मराठी सत्तेच्या अस्तानंतर हा भाग पुन्हा निजामी अमंलाखाली गेला व भारत स्वतंत्र होईपर्यत तो हैदराबाद संस्थानातच राहिला. शहरातील कंकालेश्वर, जटाशंकर, खंडेश्वरी व खंडोबा ही प्राचीन मंदिरे आजही या सर्व ऐतिहासिक घटनांची साक्ष देत दिमाखात उभी आहेत.

बीड शहराच्या पूर्व सीमेवर छोट्याश्या टेकडीवर गर्द वनराईत पूर्वाभिमुख खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिरास चारही बाजूने व्हरांडा असून त्याचे छत २२ खांबावर आधारित आहे. मंदिरास चार खांबी सभामंडप असून पुर्वाभिमुख मुख्य प्रवेशद्वार व दक्षिण व उत्तर दिशेला आणखी दोन प्रवेशद्वारे आहेत. गर्भगृहातील मागील भिंतीच्या कोनाड्यात हातात तलवार असलेली घोड्यावर आरूढ खंडोबा व म्हाळसा यांची दगडी मुर्ती आहे. गर्भगृहावरील शिखर सुंदर सजवलेले असून शिखरावर प्राणी व देवदेवतांचे अंकन आहे. हे मंदिर त्याची स्थापत्य रचना व शिल्पं कौशल्य यासाठी प्रसिद्ध आहे.

मंदिराचे बांधकाम मराठा शैलीतील असून मंदिरासमोर वीट बांधकामातील सहा मजली ७० फूट उंचीच्या अष्टकोनी दीपमाळा आहेत. या दीपमाळावर मानवी व प्राण्यांच्या आकृत्या चुन्यामध्ये बनवण्यात आल्या आहेत. काहींच्या मते हे मंदिर बीड चे जहागीरदार सुलतानजी निंबाळकर यांनी बांधले. तर इतर समजुती नुसार हे मंदिर महादजी शिंदे यांनी बांधले असे मानले जाते. राज्य पुरातत्व खात्याने संरक्षित स्मारकांच्या यादीत या मंदिराचा समावेश केला असून मंदिराच्या जतन व संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे.

©️ रोहन गाडेकर

Leave a Comment