महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,23,570

खर्ड्याचा किल्ला आणि सुलतानजी निंबाळकर

By Discover Maharashtra Views: 4713 9 Min Read

खर्ड्याचा किल्ला आणि बीडच्या खंडोबा मंदिराचे निर्माते सुलतानजी निंबाळकर –

या घराण्याचा मुळ पुरुष हा निंबराज परमार (१२९५). त्यामुळे निंबाळकर म्हणजेच धारचे परमार (पवार). महाराष्ट्रात आल्यानंतर फलटणजवळील निंबळक गावी राहिले म्हणून यांना निंबाळकर हे नाव पडले. अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरच्या आदिलशाहीत निंबाळकर हे आपल्या कर्तत्वाने खूप गाजले. त्यामुळे सुरूवातीला महमद तुघलकाने व नंतर अदिलशाहाने या घराण्याला नाईक पदवी दिली. तेव्हापासून त्यांना नाईक निंबाळकर म्हटले जाते. मोगल, निजाम व आदिलशाही दरबारात निंबाळकरांनी आपली तलवार गाजविली. “वनंगपाळ निंबाळकर म्हणजे बारा वजीराचा काळ” अशी त्याकाळी म्हण होती.

त्यानंतर पुढे मुधोजीची कारकीर्द फार गाजली. आदिलशाही प्रदेशात पुंडावा करून त्यांनी आपली दहशत बसविली होती. अदिलशाहाच्यावतीने मोहीम काढून त्यांना ठार करण्यात आले. मुधोजी ज्याठिकाणी मारले गेले त्याला “ नाईक बोंब” अशाप्रकारचे नाव पडले. याच मुधोजीची आत्या दीपबाईचा विवाह शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्याशी झाला. या मुधोजीला जगदेवराव, साबाजी आणि बजाजी अशी तीन मुले तर सईबाई या एक कन्या होत्या. सईबाईचा विवाह छत्रपती शिवरायांशी झाला. पुढे साईबाईंची कन्या सखूबाई यांचा विवाह सईबाईचा भाचा महादजी बजाजी नाईक निंबाळकरसोबत झाला. बजाजी निंबाळकरांना अदिलशाहाने जबरदस्तीने मुसलमान धर्मात घेतले ते हेच सईबाईचे बंधु होत. शिवरायांनी आपल्या मेव्हण्याला परत हिंदू धर्माची दीक्षा दिली. शिवाय आपली मुलगी सखूबाईचा विवाह बजाजीचा मुलगा महादजीसोबत लावून समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला. तरीसुद्धा इतिहासकारांनी बजाजीला माफ केले नाही. फलटणला बजाजीची जेथे समाधी आहे त्याला द.ब.पारसणीस “ लांडा बजाजी घुमट ” म्हटलेले आहे. ( पारसणीस द. ब. – मुसलमानी आमदानीतील मराठा सरदार, इ.स. १९०९, पृष्ठ क्र. ३८ )

बजाजीची शाखा फलटणला राहिली. तर जगदेवराव पंढरपूरजवळील भाळवणीला तर साबाजी माळशिरसजवळील दहिगावला स्थिरावले. याच जगदेवरावच्या वंशातील सिधोजी निंबाळकरांनी स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. छत्रपती शिवरायांची शेवटची स्वारी म्हणजे जालना स्वारी होय. स्वारीहून परत येत असताना त्यांच्यावर मोगलांनी आक्रमण केले. त्यात सिधोजी निंबाळकर संगमनेर हे ठार झाले. ( १६७९ ) याच सिधोजीचे चिरंजीव हणमंतराव निंबाळकर हे सुरूवातीला मोगलाकडे गेले. तेव्हा त्यांना पुणे जिल्ह्याचे ठाणेदार केले. त्यांचा मुक्काम बारामती येथे होता. संताजी घोरपडेच्या हत्त्येनंतर हणमंतराव निंबाळकर स्वराज्यात दाखल झाले. व त्यानंतर सेनापती धनाजी जाधवांच्या नेतृत्वाखाली गंगथडी ( गोदावरी ) भागात त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले. १७०५ साली जेव्हा हणमंतराव निंबाळकराचे निधन झाले तेव्हा मोगलांचा इतिहासकार भीमसेन सक्सेना म्हणतो की, “हणमंतराव निंबाळकराचा मृत्यू झाला बादशहाचे नशिबच.”

हणमंतरावाच्या कारकिर्दीतच त्यांचा मुलगा हैबतराव निंबाळकर हे स्वराज्यासाठी काम करत होते. सुरूवातीला ताराबाई आणि त्यानंतर छत्रपती शाहूसाठी त्यांनी खूप कष्ट सोसले. शाहूना स्थिर करण्यात हैबतरावांचे फार मोठे योगदान होते. त्यामुळे छत्रपती शाहूनी त्यांना आपले सरलष्कर केले होते. अनेक मोहिमेत त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. अश्याच प्रकारे चांदयाच्या मोहिमेवर असताना १७१४ साली हैबतराव निंबाळकर कमी आले.

हैबतरावाच्या निधनानंतर छत्रपती शाहूनी त्यांचे सरलष्कर पद त्यांचा मुलगा सुलतानजी निंबाळकरांना दिले. छत्रपती शाहुंच्यावतीने त्यांना गोदावरी काठी चौथाई व सरदेशमुखीची वसूली करण्याचे अधिकार दिलेले होते. १७२४ ला निजामाबरोबर झालेल्या साखरखेडल्याच्या लढाईत व त्यानंतर १७२५ ला काढलेल्या श्रीरंगपट्टणम च्या लढाईत सुलतानजी निंबाळकरांनी फार मोठी कामगिरी बजावली होती. याचवेळी मराठ्यांच्या राजकरणात अनेक घडामोडी घडत होत्या. त्यानुसार मराठ्यांच्या दोन गाद्या तयार झाल्या. एक सातारची गादी छत्रपती संभाजीपुत्र शाहूची तर दुसरी गादी कोल्हापूरची, छत्रपती राजारामाच्या पत्नी ताराबाईचे सावत्र पुत्र दुसर्‍या संभाजी यांची झाली. या दोन्ही सत्तेत मोठा संघर्ष वाढून शेवटी कोल्हापूरचे छत्रपती संभाजी हे हैदराबादच्या निजामाला जाऊन मिळाले.

याचवेळी शाहूच्या दरबारात बाळाजी आणि त्यानंतर पहिले बाजीराव यांना मराठा सरदारापेक्षा अधिक महत्व आले. त्यामुळे छत्रपती शाहूना सोडून धनाजीचा मुलगा चंद्रसेन जाधव, नेमाजी शिंदे, रावरंभा निंबाळकर, हिम्मतबहाददूर उदाजी चव्हाण यांनीही हैदराबादच्या निजामाकडे जाणे पसंद केले. तरीसुद्धा सुलतानजी निंबाळकर छत्रपती शाहूच्या नेतृत्वाखाली स्वराज्यासाठी झटत होते. त्याचवेळी चंद्रसेन जाधव शाहूना अडचणीत आणण्याची कुठलीही संधी सोडत नव्हते. या चंद्रसेनचाही सुलतानजीने पराभव केला. परंतु बाजीरावचे दरबारातील महत्व वाढून शाहुंच्या मनात संशय निर्माण करण्यात आला. आणि त्यामुळे १७२५ -२६ ला दुसर्‍यावेळी श्रीरंगपट्टणमची मोहीम काढण्यात आली त्यावेळी सुलतानजीला स्वारीवर जाण्यापासून अचानकपणे रोखण्यात आले. येवढेच नाहीतर त्यांची जहागीर जप्त करण्यात आली. ( Dr. satish kadam, Osmanabad 9422650044 )

लागलीच सुलतानजी निंबाळकर हैदराबादच्या निजामाला जाऊन मिळाले. शाहूना आणखी एक धक्का बसला. सुलतानजीचे सरलष्करपद त्यांनी लगेच सुलतानजिचा भाऊ सिधोजीला दिले. तर दुसर्‍या बाजूला निजामाने सुलतानजीला ७००० ची मनसबदारी बीड, अंबड, धारूर आणि पाथरीची जहागिरी दिली. यावेळी सुलतानजी निंबाळकरांनी आपला मुक्काम बीड याठिकाणी ठेवला होता. तेथे त्यांनी जे निवासस्थान बांधले त्याला “ बारादरी ” म्हटले जायची. बारादरी येवढी भव्य होती की अगदी अलीकडे पर्यंत बीडचे जिल्हा न्यायालय याच बारादरीत भरत होते. त्यांनी बांधलेली वेस पाहण्यासारखी आहे.

निंबाळकरांचे बीडमधील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम म्हणजे गावच्या पूर्वेला असणारे खंडोबा मंदिर होय. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर अतिशय भव्य असून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी व्हरांडा काढलेला आहे. आतल्या बाजूला खंडोबाची अतिशय भव्य अशी मूर्ति आहे. या मंदिरासमोर अष्टकोणी आकारातील गगनचुंबी भासणार्‍या दोन दीपमाळा असून त्यांची ऊंची २१.३३ मीटर म्हणजे ७० फुट इतकी आहे. दुरून सहज नजर मारली की या दीपमाळा लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या मानाने येवढ्या उंचीच्या दीपमाळा का उभारल्या असतील हे समजत नाही.
याच सुलतानजी निंबाळकरांनी खर्डा याठिकाणी अतिशय भव्य दिव्य स्वरुपातील किल्ले वजा गढी बांधली. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर याप्रमाणे शिलालेख आहे.

“ उत्तम व गुणवान अमीर व साहेब मरतब राजा सुलतानजी निंबाळकर देशमुख देशपांडे मोकदम महाजन सेटे वगैरे कसबे सिवपट्टणम परगणे जामखेड सरकार अहमदनगर खुजिस्ता बुनियाद औरंगाबाद याचे कारकिर्दीत किल्ला सुलतान दुर्ग कसबे मजकूर ची हद्द तारिख २५ माहे शाबान सन ११४६ फसली बरहुकूम माहे हिजरी ११५६ सन मध्ये तयार झाला.” त्यानुसार ३ ऑक्टोबर १७४३ साली खर्ड्याचा किल्ला बांधून पूर्ण झाला. आपल्या नावावरून त्याला सुलतान दुर्ग हे नाव दिल्याचे दिसून येते. याच ठिकाणी १७९५ साली मराठे आणि निजाम यांच्यात इतिहास प्रसिद्ध अशी लढाई झाली. कुठल्याही लढाईला गावावरून नाव पडते. त्यानुसार या लढाईला खर्ड्याची लढाई म्हटले जाते. दोन्ही बाजूचे मिळून २ लाखाची फौज या परिसरात लढली. मराठ्यांच्या भीतीने निजामाने याच किल्ल्यात आश्रय घेतल्यामुळे तो वाचला. पुढे १९४७ – ४८ च्या स्वातंत्र्य संग्रामात याच किल्ल्याच्या आश्रयाने आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी रझाकारांना सळो की पळो करून सोडले होते. आजही किल्ल्याची तटभिंत अगदी सुस्थितीत आहे. याच सुलतानजींनी खर्डा गावात महादेवाचे मंदिर आणि त्यासमोर बांधलेला बारव पाहण्यासारखा आहे. तर तेथून जवळच असणार्‍या ईट गावातही त्यांनी बेलेश्वराचे अतिशय देखणे मंदिर बांधलेले आहे.

खर्ड्याचा किल्ला बांधून सुलतानजी निंबाळकरांनी निजामाची सोय केली परंतु ते फारकाळ जगले नाहीत. १७४८ साली त्यांचे निधन झाले. सुलतानजी जरी निजामाला जाऊन मिळाले असलेतरी त्यांचे मराठ्याशी चांगले संबंध होते. त्यानुसार त्यांची मुलगी दुर्गाबाई चा विवाह दौलत राव घाडगे यांच्याशी होणार होता. त्यासाठी त्यांनी मराठा सरदारांना व पेशव्यांना लिहिलेली पत्रे उपलब्ध आहेत. याशिवाय १७४३ साली रायरीच्या परिसरात राहणारे भिकाजी आणि लक्ष्मनराव राजेशिर्के यांच्यात वाटणीसाठी मतभेद झाले तेव्हा शाहू महाराजांनी सुलतानजी निंबाळकरांना बोलावून शिर्केंचा न्यायनिवाडा केला होता. तसेच महादजी शिंदे यांच्या पहिल्या पत्नी अन्नपूर्णाबाई या याच सुलतानजिच्या घराण्यातील असाव्यात. त्यांची समाधी बीडजवळील घाटनांदुर याठिकाणी आहे. खर्डा गावात एक अतिशय कोरीव अशी जी समाधी आहे ती कदाचित त्यांचीच असावी.

सुलतानजी नंतर त्यांचा मुलगा हणमंतराव गादीवर आले. निजामाने त्यांना मुळची सुलतानजी ही पदवी दिल्याने इतिहासात बराच गोंधळ उडतो. कारण त्यांचाही उल्लेख सुलतानजी नावाने येत असल्याने हे परत कसे आले ? असा प्रश्न पडतो. या हणमंतराव उर्फ सुलतानजिची कारकीर्दही चांगली असल्याने निजामाने त्यांना धिराज असा किताब देऊन गौरविले. हणमंतरावांचे १७६२ साली निधन झाले. त्यानंतर त्यांचा मुलगा धनपतराय गादीवर आला. परंतु ८ एक वर्षातच त्यांची जहागीर जप्त करण्यात येऊन निजामशाहीतून हे घराणे हद्दपार झाले. खर्ड्यामुळे या घराण्याला खर्डेकर निंबाळकर म्हटले जाते. जाहगिर गेली असलीतरी पुढेही या घराण्याने आपले वास्तव्य खर्ड्यातच ठेवले. अप्पासाहेब निंबाळकर पुढे नावारूपास आले. त्यांचा गावातील वाडा फारच वेगळा आहे. आज सुलतानजी निंबाळकरांचे एकही वारसदार गावात रहात नाहीत. तरीपरंतु बीड असेल की खर्डा रस्त्यावरून जाताना त्यांच्या वास्तु पहिल्या की सुलतानजी निंबाळकरांचा पराक्रम डोळ्यासमोर दिसतो.


माहिती साभार – Dr. Satish Kadam

Leave a Comment