खोलेश्वर व तपनेश्वर मंदिर, पाथर्डी –
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका हा अनेक साधुसंताची जन्मभूमी व कर्मभूमी राहिला आहे. नाथ संप्रदायाचे आद्य गुरू मच्छिंद्रनाथ यांची व श्री कानिफनाथांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे आहे. तसेच राष्ट्रसंत वै. ह.भ.प. तनपुरे महाराज जन्मभूमी दगडवाडी येथे आहे. पाथर्डी तालुक्यात श्री क्षेत्र भगवानगड, श्री मोहटादेवी, व श्री कानिफनाथ महाराज यांची जशी भव्य मंदिरे आहेत तशीच दगडी मठ, वृद्धेश्वर, खोलेश्वर व तपनेश्वर ही पुरातन मंदिरे देखील आहेत. धार्मिक व ऐतिहासिक अशा दोन्ही अंगाने पाथर्डी तालुका समृद्ध आहे.(खोलेश्वर व तपनेश्वर मंदिर, पाथर्डी)
पाथर्डी या नावाच्या उत्पत्ती विषयी कथा सांगितली जाते की, महाभारतात पुत्र अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर पार्थ म्हणजेच अर्जुन या ठिकाणी रडला म्हणून पाथर्डी असे नाव पडले. पाथर्डी शहराच्या पूर्वेला कसबा पेठेत खोलेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर असून मंदिरातील शिवलिंगाची स्थापना स्वयम् अर्जुनाने केल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरात काही भग्न मूर्ती व वीरगळी देखील आपल्याला पाहायला मिळतात.
खोलेश्वर मंदिरापासून जाणाऱ्या रस्त्याच्या विरुद्ध बाजुला काही अंतरावर तपनेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिर लहान असून मंदिराचा सभामंडप नव्याने बांधण्यात आला आहे. तपनेश्वर मंदिर येथे पाथर्डी गावातील पुरातन उध्वस्त झालेल्या मंदिरांचे काही अवशेष व अनेक वीरगळी विखुरलेल्या नजरेस पडतात. या वीरगळीत दुर्मिळ अशी स्तंभ वीरगळ देखील आहे. तसेच शिवपिंडी, नंदी व इतर शिल्प पाहायला मिळतात.
©️ रोहन गाडेकर