महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,36,903

खुन्या मुरलीधर मंदिर, पुणे

By Discover Maharashtra Views: 1967 4 Min Read

खुन्या मुरलीधर मंदिर, पुणे –

पुण्यातील अनेक मंदिरांची नावं अगदीच जगावेगळी आहेत. त्यांपैकीच एक आगळेवेगळे नाव असलेलं मंदिर म्हणजे खुन्या मुरलीधर मंदिर. नावावरूनच समजतं की या मंदिराला एक रक्तरंजित इतिहास आहे.

या मंदिराला खुन्या मुरलीधर हे नाव पेशवाईच्या काळात पडलं. पेशवाईतील नवकोट नारायण सदाशिव रघुनाथ उर्फ दादा गद्रे हे पेशव्यांचे सावकार होते. अहिल्यादेवी शाळेच्याजागी त्यांचा भव्य वाडा होता. मंदिरांच्या बाबतीत बऱ्याचदा अशा आख्यायिका असतात की भक्तांना दृष्टांत होऊन मंदिरांचे बांधकाम होते त्याच प्रमाणे दादा गद्रे यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी ही मूर्ती जयपूरचे  प्रसिध्द मूर्तिकार बखतराम यांच्याकडून घडवून घेतली. त्याचबरोबर राधा, दोन सवत्स धेनु व गरुड अशा मूर्तीही घडविण्यात आल्या. या सगळ्या मूर्ती संगमरवरी आहेत. राधा आणि मुरलीधराच्या मूर्तीचे डोळे आणि चेहऱ्यावरचे भाव अतिशय जिवंत वाटतात. त्यांच्याच समोर गरुडाची रेखीव मूर्ती आहे. मुरलीधराच्या मूर्तीचे वैशष्ट्य म्हणजे ही मूर्ती एका पाय व दुसऱ्या पायाच्या अंगठ्याच्या आधारावर उभी आहे.

‌ सदाशिव पेठेत आत्ता जिथे हे मंदिर आहे तिथे गद्र्यांची मोठी बाग होती त्यात हे मंदिर व एक टुमदार बंगला बांधण्यात आला. लवकरच ह्या मंदिराची ख्याती दूरवर पसरली. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ही मूर्ती पाहताक्षणी या मूर्तीची मागणी केली. परंतु दादा गद्रेंनी त्यास नकार दिला आणि रातोरात ही मूर्ती गद्रे वाड्यातून या मंदिराच्या जागी आणण्यात आली. दादा गद्रेनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्र्वर येथून वेदमूर्ती नारायण खरे यांना मूर्तीच्या प्राणप्रतिषठापनेसाठी पाचारण केले होते. चैत्र वद्य २ ता. १३ एप्रिल १७९७ रोजी सकाळी प्राणप्रतिष्ठापनेचे विधी सुरू झाले. मूर्ती वाड्यातून हलवल्याचे कळताच दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी त्याच्या फौजेत तैनात असलेल्या बॉयड या इंग्रजी अधिकाऱ्याला सैन्य घेऊन बागेकडे पाठवले. या सैन्याची आणि गद्रे यांच्या पदरी असलेल्या अरबांची   मंदिरासमोर चकमक झाली आणि त्यात दोन्ही बाजूचे शे-दीडशे लोक मृत्युमुखी पडले असा उल्लेख ऐतिहासिक साधनामध्ये सापडतो. दुसरीकडे मराठी रियासातीमध्ये नाना फडणीस यांच्या कंपनी सरकारचा अधिकारी बॉयड आणि अरब फलटण याच्यात वाद्य वाजवण्याच्या कारणावरून जोरदार तंटा होऊन मुडदे पडले. एकूणच कारण काही असो मंदिराच्या आवारात बराच रक्तपात झाला या कारणावरून याला खुन्या मुरलीधर हे नाव पडले. या प्रसंगामुळे काही दिवसांनी मूर्तीची शांती करून वैशाख शुद्ध १० शनिवार ६ मे १७९७ रोजी मूर्तीची स्थापन करण्यात आली. दुसऱ्या बाजीरावांची गैरमर्जी झाल्यामुळे गद्रेना तुरुंगवास भोगावा लागला. या काळात मंदिराची जबाबदारी नारायण खरे यांच्याकडे आली.

मंदिराभोवती चिरेबंदी भिंत आणि दिंडी दरवाज्याच्यावर नगारखाना आहे. मंदिरामध्ये प्रशस्त आवार आहे. देवळातील सभामंडप लाकडाचा असून दोन्ही बाजूस खांब व महिरपी आहेत. सभामंडपाच्या छताच्या चारही कोपऱ्यात पानाफुलांची नक्षी कोरलेली आहे. मंदिराचा गाभारा हा काळ्या दगडात बांधलेला आहे तर मूर्तीचे सिंहासन एकसंध पाषाणाचे आहे. त्याला आतून सोळा व बाहेरून वीस कोन असून ती एका सिध्दयंत्रासारखी आहेत. गर्भगृहासमोर लहानसा सुंदर लाकडी मंडप आहे. या सभामंडपात राजा रविवर्म्याने चितारलेल्या पौराणिक प्रसंगाचे फोटो पण आहे. बाळाजी नाईक केळकर यांनी १८५५ मध्ये मंदिराचा सभामंडप व नगारखण्याचे बांधकाम केले. १९२१ मध्ये गो. शि. आपटे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला.

इंग्रजांच्या विरुद्ध स्वातंत्र चळवळीच्या दृष्टीने हे मंदिर महत्वाचं आहे. पारतंत्र्यात या मंदिराच्या आवारात असलेल्या दिवाणखान्यात अनेक क्रांतिकारी गुप्त बैठका घेत. पेशव्यांपासून  इंग्रजांपर्यंत राज्यकर्त्यांच्या रोषाला बळी ठरलेल्या या मंदिराला कुठलेही अनुदान मिळाले नाही त्यामुळे खरे कुटुंबीयांनी याची व्यवस्था पहिली.

श्री खुन्या मुरलीधर मंदिराला पुरातन एतिहासिक वास्तू श्रेणी असा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला आहे. तसेच वास्तुरचना व सांस्कृतिक कार्यकरिता ‘अ’ दर्जा दिला आहे. सध्या हे मंदिर जिर्णोध्दाराच्या प्रतिक्षेत आहे.

संदर्भ:
सफर ऐतिहासिक पुण्याची – संभाजी भोसले

पत्ता:
https://goo.gl/maps/onBR2TxtW4jR9Tjc9

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment