कोहोज किल्ला भटकंती
काही किल्ले तुम्ही कधी ना कधी त्या रस्त्यावरून जाताना बघितलेले असतात पण त्या किल्ल्यावर जायचा योग कधी जुळून येत नसतो. असे किल्ले कायम खुणावत असतात. असच बऱ्याच वेळा लांबुन बघितलेला पण भटकंती करायची राहिलेला हा कोहोज किल्ला. समुद्रसपाटीपासुन या किल्ल्याची उंची साधारण ५७६ मीटर इतकी आहे. गडावर जायचे असेल तर गडावर जाण्याचा मार्ग , गडावर असणाऱ्या वास्तू या सर्वांची माहीती प्रथम घेणे बंधनकारक.
कोहोज किल्ला दोन मार्गांनी चढता येतो. एक मार्ग नाणे गावातुन आहे तर एक मार्ग वाघोटे गावातुन जातो. पालघर वरून वाडा मार्गे जाणारी बस पकडुन वाघोटे गावात उतरायचे तिथुन उजव्या बाजुच्या मातीच्या रस्त्याने आपल्या भटकंतीला सुरवात करायची. गडावर जायचा मार्ग पाजर तलावाच्या इथुन सुरू होतो. तलावाच्या इथुन दिसणारा कोहोज भटकंतीचा आनंद द्विगुणित करतो. तलावाच्या इथुन डावीकडे पुढे जायचे. मग सुरू होतो तो सुंदर असा गर्द झाडीतुन कोहोजचा मार्ग. इथे पायवाटा मोठ्या प्रमाणात असल्याने चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोहोज ला समोर ठेवुन किल्ल्यावर चढाई करत रहावी. गडावर पोहचायला साधारण दीड ते दोन तास लागतात. चढाई आणि ऊन यामुळे वेग जरी मंदावत असला तरी किल्ल्यावर पोहचायची उत्सुकता शांत बसु देत नाही. जसा जसा किल्ल्याच्या टप्प्यात येतो तसे किल्ल्याच्या अस्तित्वाचे जाणीव करून देणाऱ्या वास्तू नजरेस पडू लागतात. या वास्तू दिसू लागल्यावर थकवा लागलीच पळुन जातो. आणि मग आपल्यातला भटका , वास्तू , मंदिर , शिल्प बघण्यासाठी आतुर असलेला तो इतिहासाचा मित्र जागा होतो अन मग आपली नजर चहूबाजूला फक्त शोध घेत असते.
पडलेल्या वास्तू बघुन मन जरी दुःखी होत असले तरी किल्ल्याच्या किल्लेपण अजुन तरी शिल्लक आहे हा एक वेगळा विचार खुप काही शिकवून जातो. किल्ल्याच्या पठारावर आपण आल्यावर आपणास पुढे चालत राहिल्यावर समोर आपल्याला दिसते ते कुसमेश्वर मंदिर. कुसमेश्वर मंदिराच्या बाजूलाच दोन टाकी नजरेस पडतात या टाक्यात जरी पाणी असले तरी हे पाणी पिण्यायोग्य नाही. मंदिराच्या पाठी काही अंतरावर एक सुस्थितीत शिल्प आहे ते बघुन डावीकडे असणाऱ्या ९ टाक्याच्या समूहाकडे जायचे. काही जण याला सप्त टाकी असाही उल्लेख करतात पण याठिकाणी मुळ टाकी ९ असल्याचे दिसुन येते. नऊ टाकी पाहुन झाल्यावर पुन्हा माघारी फिरायचे. आणि मग मन दौडू लागत बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी. पुन्हा मंदिराच्या दिशेने येउन बालेकिल्ल्याकडे मार्गस्थ व्हायचे.
बालेकिल्ल्याकडे जायची वाट ही झाडीतून असल्यामुळे उन्हाचे प्रमाण जाणवत नाही. १० मिनिट चालल्यावर आपल्याला बालेकिल्ल्याची तटबंदी नजरेस पडते. तटबंदीत प्रवेश करून पुढे चालत रहायचे त्याच तटबंदीला लागुन मारुतीची मूर्ती आहे. सोबतच त्याच आवारात ३ टाक्या लागतात यातल्या दोन टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही पण तिसऱ्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाके आतमध्ये असल्यामुळे खाली उतरून पाणी काढावे लागते. समोरच बालेकिल्ल्याची दुसरं तटबंदी नजरेस पडते. मनात किल्ला भटकण्याची आणि वास्तू पाहण्याची उत्सुकता असली की मन शांत बसू देत नाही. आपोआप आपण त्या ठिकाणी ओढले जातो. या प्रवेशद्वारात पायरीवर काही अक्षर कोरलेली आहेत पण ही ऐतिहासिक वाटत नाहीत. पायरीला नतमस्तक होऊन आपण मुख्य बालेकिल्ल्यात प्रवेश करायचा.
दोन बुरुजांमध्ये बंदिस्त असा पश्चिमाभिुख महादरवाजा आहे. या दरवाजाच्या माथ्यावरची कमान आज शाबूत नसली तरी ती पाहिल्यानंतर सिंहगडाच्या कल्याण दरवाजाची आठवण होते. पुढे डावीकडून चालू लागायचे. आपण आता मुख्य बालेकिल्ल्यात प्रवेश केलेला असतो. तिथुन दिसणारा परिसर मोहवून टाकतो. थोडी विश्रांती घेऊन आपण कोहोज सर्वात उंच ठिकानाकडे वळायचे. काही पुस्तका मध्ये वाचल्याप्रमाणे हे उंच ठिकाण साधारण मानवी रुपा मध्ये दिसते. पण गडावर महाशिवरात्रीची तयारी करायला आलेल्या गावकऱ्यांना विचारल्यावर समजले इथले काही दगड हे खाली पडले त्यामुळे आम्हाला तरी अस काही भासल नाही. ते उंच ठिकानाची चढाई करून. तिथुन दिसणाऱ्या परिसराचे दर्शन करून आम्ही खाली उतरलो. तिथूनच दक्षिणेकडे असलेल्या एका मंदिराकडे मार्गस्थ झालो. मंदिरात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. समोरच स्वराज्याचा परम पवित्र भगवा ध्वज फडकत आहे. हे सगळ पाहून आल्या वाटेने परत बालेकिल्ला उतरायला सुरुवात करायची.
उतरताना खाली डाव्या हातास दोन पाण्याची टाकी दिसतात. पण या दोन्ही टाक्यात पाणी नाही. त्याच मार्गाने पुढे होऊन आपण बालेकिल्ला उतरायचा आणि परतीच्या मार्गी लागायच. सोबत इतिहास, वास्तूंचे दर्शन, गडाचा परिसर मनात साठवुन गडउतार व्हायचे.
इतिहास : शिवरायांनी कोहोजगड १६५७ च्या दरम्यान जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. पुढे १२ जून १६६५ च्या पुरंदरच्या तहानुसार मोगलांना जे २३ किल्ले शिवरायांनी दिले, त्यात कोहोजगडाचा देखील समावेश होता. यानंतर ११ जून १६७० रोजी मराठय़ांनी हा गड परत जिंकून स्वराज्यात आणला. संभाजीराजांच्या कारकीर्दीत मोगलांचा मनसबदार व जव्हारचा जमीनदार विक्रम पतंगराव याने ७ एप्रिल १६८८ रोजी कोहोजगडाचा ताबा घेतला. असा हा निसर्गनिर्मित वैशिष्टय़ लाभलेला कोहोजगड दुर्गअवशेषांनीही श्रीमंत आहे.
टीप : या भटकंती दरम्यान काही परदेशी पर्यटक गडावर भेटले यांच्या कडून आपल्याकडील लोकांनी बाकी काही नाही शिकल तरी एक गोष्ट जरूर शिकावी ती म्हणजे गडावर आपण केलेला कचरा आपल्यासोबत खाली घेऊन जाण. रात्री हे पर्यटक किल्ल्यावर होते आणि सकाळी गडउतार होताना सगळा कचरा सोबत घेऊन गडउतार झाले ना त्यांनी ते येऊन गेल्याची काही निशाणी सोडली ना जाणीव. बस एवढ जरी आपल्या लोकांना समजल तरी गडावर होणारा कचरा खुप मोठ्या प्रमाणात कमी होईल.
माहिती साभार – स्वराज्याचे वैभव