कोकमठाण आणि कुंभारी –
नगर जिल्ह्यातल्या कोपरगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून जेमतेम ६ कि. मी. अंतरावर असलेली ही प्राचीन मंदिरे. अंदाजे इ.स. च्या १३ व्या शतकातील असावीत. गोदावरीच्या काठावर वसलेली कोकमठाण आणि कुंभारी मंदिरे एकमेकांपासून ६-७ कि. मी. अंतरावर आहेत. अत्यंत देखणे आणि आकर्षक शिल्पाकृती वितान म्हणजे सिलिंग हे या दोन्ही मंदिरांचे वैशिष्ट्य.
कोकमठाण मंदिराला मुख्य प्रवेश आणि शिवाय अजून एका बाजूने सुद्धा प्रवेश. इथे असलेल्या मुखमंडपांचे (पोर्चचे) छत पण आकर्षक. मुख्य सभामंडपाच्या छतावरील दगडी झुंबर आणि त्याला आठ बाजूंनी असलेल्या पुतलिका आपल्याला टाहाकारी इथल्या मंदिराची आठवण करून देतात. गाभाऱ्यात शिवपिंड आहे, आणि त्याच्या पाठीमागे एका चौथऱ्यावर शेषशायी विष्णूची प्रतिमा ‘उभी’ करून ठेवली आहे. ललाटावर गरुड असल्यामुळे हे मूळचे विष्णूमंदिर असावे. मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्यांगावर मंदिराच्या शिखराच्या प्रतिकृती सुंदर आहेत. मुख्य शिखराला आधार देण्याच्या हेतूने केले गेलेले हे बांधकाम (buttress) समजतात तसेच इथे असलेली नक्षीदार जालवातायाने लक्ष वेधून घेतात.
शांत निवांत गोदावरीच्या काठावर वसलेली ही मंदिरे खरेतर कोपरगावचे भूषण असायला हवीत. कोपरगावला पण मोठा इतिहास असून तिथेही बरेच वास्तुवैभव आहे. राघोबादादाचा वाडा, शुक्राचार्य मंदिर असे बरेच काही. पण ते नंतर कधीतरी.
– आशुतोष बापट