कोल्हाळेश्वर महादेव मंदिर, कोल्हार –
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यामध्ये श्री साईबाबांच्या शिर्डीपासून अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर, नगर-मनमाड रस्त्यालगत प्रवरा नदीच्या तीरावर असलेलं कोल्हार-भगवतीपूर एक मध्यवर्ती ठिकाण आहे. कोल्हार भगवतीपूरचे ग्रामदैवत म्हणजेच श्री भगवतीमाता सर्वत्र प्रसिध्द आहे. हे एक जागृत देवस्थान आहे. कोल्हार भगवतीपूर गावाच्या नावाच्या उत्पत्तीविषयी अनेक कथा प्रचलीत आहेत. त्यापैकी एक अशी की, प्रभू श्रीराम वनवासात असताना या भूमीवर त्यांनी पूजेसाठी वाळूची पिंडी तयार केली. या ठिकाणी त्यांना श्री महादेव प्रसन्न झाले. पुढे याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. त्या मंदिरास कोल्हाळेश्वर नाव पडलं. कोल्हाळेश्वर वरून या गावास ‘कोल्हार’ नाव पडलं असं काहीजण मानतात. कोल्हाळेश्वर महादेव मंदिराचा मागील श्रावण महिन्यात जीर्णोद्धार झाला असून संपूर्ण रेखीव कामाने परिपूर्ण असलेले हे मंदिर भाविकांना आकर्षित करीत आहे.
पूर्वीचे कोल्हाळेश्वर महादेव मंदिर जमिनीलगत असल्याने पावसाळ्यातीळ पावसाचे पाणी मंदिराच्या गाभाऱ्यात जायचे. त्या अनुषंगाने नूतन मंदिर उभारताना ६ फूट उंचीचा उंचवटा तयार करून त्यावर मंदिर उभारण्यात आले. पुरातन शिवालये असतात त्याचप्रमाणे मंदिरातील आकर्षक ग्रॅनाईट, मार्बल, टाइल्स, रंगरंगोटी आखीव रेखीव शिल्पे यामुळे हे मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
साधारणतः दीड कोटी रुपये खर्च करून कोल्हार भगवतीपुर येथील कोल्हाळेश्वर मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे. साडे आठ हजार स्केअर फूट परिसरात मंदिर उभारणी झाली असून ४ वर्षे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कार्य चालू होते. मंदिरामध्ये मध्यभागी महादेवाचे मुख्य मंदिर आहे. मुख्य मंदिराचा सभामंडप व गाभारा भव्य असून सहा दिशांना आणखी सहा छोटी छोटी मंदिरे आहेत. यामध्ये रामेश्वर, गणपती, दत्तात्रय, रामकृष्ण , केशव-गोविंद मंदिर आणि श्यामपुरी बाबांची समाधी समाविष्ट आहे. मंदिरावरील भूमिज शैलीचा भव्य कळस भाविकांना खुणावतो. नगर मनमाड महामार्गालगत असलेले हे मंदिर एकदा आवर्जून पाहावे असे आहे.
©️ रोहन गाडेकर