महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,14,523

कोल्हापूर संस्थानचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण, पूर्वार्ध

By Discover Maharashtra Views: 2642 5 Min Read

कोल्हापूर संस्थानचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण, पूर्वार्ध –

स्वराज्य संस्थापक शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराज  मोगलांशी चालू असलेल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या ऐन धुमाळीत 2 मार्च 1700 रोजी सिंहगडावर वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी मृत्यू पावले. ताराराणी नी 10 मार्च 1700 रोजी आपले पुत्र शिवाजी राजे यांना गादीवर बसवून मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध पूर्वी इतक्याच ताकदीने चालू ठेवून औरंगजेब सारख्या बलाढ्य,अनुभवी,पाताळयंत्री आक्रमकाला दे माय धरणी ठाय करून सोडले. मराठ्यांना धूळ चारण्यासाठी आलेला आलमगिर स्वतःच इथल्या धुळीत मिळाला.(20 फेब्रुवारी1707 )(कोल्हापूर संस्थानचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण)

औरंगजेबच्या मृत्यू नंतर मोगलानी त्यांच्या कैदेत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शाहू ह्या पुत्रास मुक्त करून महाराष्ट्रात पाठविले.त्यामागे मराठ्यां मध्ये वारसा प्रश्नावरून बेकी निर्माण करण्याचा हेतु होता आणि तसेच घडले.ताराराणी आणि शाहू ह्या दोन गटात लहान मोठे संघर्ष होत राहिले.शाहू महाराजानी सातारा इथे 12 जानेवारी 1708 रोजी राज्याभिषेक करून घेतला.ताराराणीनी नोवेमबर 1710 मध्ये पन्हाळा इथे करवीर गादीची स्थापना करून आपले पुत्र शिवाजी राजे यांच्या छत्रपती पदाची द्वाही फिरवली.अशा प्रकारे मराठ्यांच्या आपापसातील यादवी युद्धामुळे सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या. यातील करवीर गादीने इ. स.1812 पर्यन्त म्हणजे सुमारे शंभर वर्षे  मोठ्या निकराने आपले सार्वभौम अस्तित्व टिकविले.ह्या काळात करवीर राज्यास सातारकर छत्रपती शाहू महाराज,पेशवे,पटवर्धन,सावंतवाडीकर भोसले आणि निपाणीकर देसाई यांच्याशी सतत झुंज द्यावी लागली.भोवतालच्या सत्तानी केलेल्या कोंडीतून बाहेर पडण्याच्या खटपटीतच करवीर राज्याची शक्ति,सामर्थ्य मोठ्या प्रमाणावर खर्ची पडले.परिणामी त्यांना सातारा गादी प्रमाणे राज्य विस्तार करता आला नाही.तरी पण 18 व्या शतकाच्या शेवटच्या 2-3 दशकात शिवाजीराजे द्वितीय यांनी दक्षिण महाराष्ट्र आणि कोंकणात काही प्रदेश जिंकून थोडा फार राज्य विस्तार केला.

करवीर राज्याचे एक वैशिष्ठ म्हणता येईल ते म्हणजे इथल्या राजघराण्यातील ताराराणी,राजसबाई, (ताराराणीन ची सवत,छ. राजाराम महाराजांची द्वितीय पत्नी) जिजाबाई (राजसबाईंची सून), दुरगाबाई या राजघराण्यातील स्त्रीयांनी बजावलेली कामगिरी! ताराराणीनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचे सतत सात वर्षे नेतृव केले.राजसबाईनी विस्कळीत होत चाललेल्या करवीर राज्यात रामचंद्रपंत अमात्यांच्या मदतीने रक्तहीन सत्तान्तर घडवून आणून करवीर राज्य पुन्हा संघटित केले. जिजाबाईनी मोठ्या धडाडीने आणि कर्तबगारीने पेशव्यानबरोबर काळवेळ बघून कधी विरोधाचे तर कधी मैत्रीचे संबंध ठेवून आपले राज्य सुरक्षित राखले.इंग्रजांचे डावपेच ओळ खणारी छत्रपती घराण्यातील पहिली स्त्री म्हणजे जिजाबाई होय.

करवीर राज्याला रामचंद्रपंत अमात्य,येसाजी शिंदे,रत्नाकरपंत राजाज्ञा,हिम्मत बहद्दर प्रितीराव चव्हाण,गुजाजीराव गायकवाड,रायाजी जाधव,भीमबहाद्दर माने यांसारखे कर्तबगार,शूर सरदार मिळाले.पण सातारा गादीच्या सत्ता आणि सामर्थयापुढे करवीर राज्य निष्प्रभच ठरले.त्यामुळे निजाम,राघोबा दादा आणि हैदर अली यांसारख्या मराठेशाही च्या शत्रू बरोबर करवीर राज्याला प्रसंगोपात हातमिळवणी करणे भाग पडले.

विविध अडचणी,संकटे येऊनही ह्या राज्याने थोडे थोडके नव्हे तर तब्बल 238 वर्षे आपले अस्तित्व हिंदुस्थानच्या नकाशात अबाधित ठेवले होते.( नोवेमबर 1710 ते मार्च 1949 ) ह्या एकूण कालावधीत  12 राज्यकर्ते होऊन गेले.( स्वतंत्र भारतात कोल्हापूर राज्याचे विलीनीकरण होई पर्यन्त. ) त्या पैकी छ. संभाजी महाराजानी 46 वर्षे तर त्यांचे उत्तराधिकारी छ.शिवाजी महाराज द्वितीय यांनी 50 वर्षा पेक्षा अधिक काळ राज्य केले. अंतिम अधिपति शहाजी महाराजना जेमतेम पावणे दोन वर्षांचा अवधि मिळाला.करवीर राज्याला आपले स्वतंत्र अस्तित्व टिकविण्यासाठी वेळोवेळी इंग्रजांची मदत घेणे भाग पडत गेले .

करवीरकर आणि इंग्रज यांच्यात जानेवारी 1766 ते मार्च 1829 या काळात एकूण पांच करार झाले.1 ऑक्टोबर 1812 रोजी झालेल्या करारा ने करवीर राज्याचे सार्वभौमत्व संपून त्याचे रूपांतर इंग्रजी संरक्षणा खालील ` संस्थान` म्हणून झाले. करवीर संस्थानधिपतीना इंग्रजांकडून 19 तोफानच्या  सलामीचा मान होता. बारा छत्रपतीनपैकी सहा जण दत्तक होते.चौथे छत्रपती शंभुराजे उर्फ आबासाहेब यांचा 16 जुलै 1821 रोजी राजवाड्यात खून झाला.सातवे छत्रपती राजाराम महाराज इंग्लंड दौऱ्यावरून स्वदेशी परतताना इटलीत फ्लोरेन्स इथे संधिवात आणि तापामुळे 30 नोवेमबर 1870 रोजी निधन पावले. उर्वरित छत्रपती आजारपण,वृद्धापकाळ यामुळे मृत्यू पावले.नववे छत्रपती राजर्षि शाहू महाराजांची कारकीर्द (इ.स.1884 ते 1922) त्यांच्या गोरगरीब,पददलित यांच्या बाबतीतील दयाळू,कनवाळू दृष्टिकोणामुळे विशेष गाजली.त्यांनी समाज सुधारणा घडवून आणताना कुणाचाही मुलाहिजा बाळगला नाही.इंग्रजी अमलात मागास वर्गीयांसाठी शिक्षण संस्थानची स्थापना,विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहांचीची सोय,शिकलेल्याना सरकारी नोकरीत आरक्षण इ.समाजोपयोगी उपक्रम राबवणारे ते पहिले राज्यकर्ते होते.सामाजिक न्यायांची कल्पना त्यांनी कृतीतून साकार करून दाखवली.

संदर्भ:
1-मराठ्यांचा इतिहास,खंड तिसरा. संपादक अ. रा. कुलकर्णी,ग. ह. खरे.
2-करवीर रियासत-लेखक स. मा. गर्गे.

प्रकाश लोणकर

Leave a Comment