कोंडीविटा | महाकाली…
सध्या महाकाली गुंफा म्हणून प्रसिद्ध असलेली काळ्या पहाडात खोदकाम करून एकूण १९ गुंफांमध्ये उभारलेली हि लेणी कोंडीविटे गुंफा या नावाने ओळखली जातात. आजचा अंधेरी पूर्व येथील मरोळ हा परिसर कधीकाळी एका राज्याची राजधानी होता हे एक ऐतिहासिक सत्य आहे. भीमदेव राजा आणि त्याचा पूत्र प्रताप याने चौदाव्या शतकात ठाण्याहून आपली राजधानी मरोळ येथे नेली. मरोळच्या परिसराला त्याने प्रतापपूर असं नाव दिलं होतं. देवगिरीचा भीमदेव राजा दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीकडून पराभूत होऊन देवगिरीहून उत्तर कोकणात ठाणे ही राजधानी करून राज्य करू लागला. भीमदेव राजा लढवय्या होताच परंतु तो द्रष्टा राजा होता. राजा भीमदेव आणि त्याचा पुत्र प्रताप यांनी अनेक मंदिरं, तीर्थक्षेत्रं उभी केली. गुजरात येथील सुलतानाने प्रतापपुरवर आक्रमण करून या परिसरातील मंदिरं उद्ध्वस्त केली आणि मूर्तिची मोडतोड केली.
कोंडीविटा लेणी म्हणजेच महाकाली लेणी अंधेरी स्थानकापासून ६ कि.मी. अंतरावर आहेत. या लेणी मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वसलेल्या आहेत. मरोळ आणि जोगेश्वरी गुंफा यांच्या मध्यभागी महाकाली गुंफा आहेत. इसवी सन पूर्व 1 ते इसवी सन 6 या काळात या लेण्या बांधण्यात आल्या आहेत. यात एकूण 19 बुद्ध लेण्या आहेत. ह्या लेण्या डोंगरावर पूर्वेला पंधरा व पश्चिमेला चार अशा दोन भागात विभागल्या आहेत. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. या गुंफाचा वापर बौद्ध भिक्खू प्रार्थनेसाठी आणि वास्तव्यासाठी करत असत. या गुंफांतील स्तुपांचा आकार शिवलिंगासारखा वाटल्याने, त्यांना महाकाळ असेदेखील म्हटले गेले आहे. महाकाली गुफांच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेले महाकाली मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडले आहे. या सर्व लेण्या बौद्धधर्मीय असुन यात आपल्याला विविध स्तूपही पाहायला मिळतात. अंधेरी स्थानकावरून बस व रिक्षाने आपण या लेण्यापर्यंत पोहचू शकतो. मुंबईच्या गर्दीत या लेण्या हरवून गेल्या आहेत. सरकारी अनास्थेमुळे या लेण्यांची दुरावस्था झाली आहे. या गुंफांमध्ये भिकारी, गर्दुल्ले, भटके यांचा सर्रास वावर आढळतो.
माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.