महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,49,572

कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर

By Discover Maharashtra Views: 4975 5 Min Read

कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर.

कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. या मंदिराचा तितकेसा परिचय लोकांना नाही. याचे कारण असं असणार आहे की खिद्रापूर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेलगतचे एक छोटस खेडे आहे.

३०६ हेक्टर जमीन असलेले हे गाव ३००० लोकवस्तीचे छोटेसे गाव. हे गाव देवळांच्या सेवकांना इनाम म्हणून दिलेले. यामध्ये वाजंत्री, गुरव आदी आले.

खिद्रापुरचे हे भव्य मंदिर सातव्या शतकामध्ये, चालुक्यांच्या राजवटीत बांधले गेले. पण त्या काळी सतत होणाऱ्या राजकीय युद्धांमुळे या मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये सातत्य नव्हते. काही काळाने तर हे निर्माण कार्य संपूर्णपणे बंदच झाले. त्यानंतर सिलहार घराण्याचे राजे गंधारादित्य यांच्या काळी हे निर्माण कार्य पुनश्च सुरु करण्यात आले. अखेरीस देवगिरीच्या यादव कुळातील राज्यकर्त्यांनी या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण करविले. ह्या मंदिराचे निर्माण पूर्ण होण्यासाठी तब्बल पाचशे वर्षांचा अवधी लागला. हे मंदिर बाराव्या शतकात पूर्णपणे तयार झाले. या मंदिराच्या पूर्वेकडील द्वारापाशी एक शिला असून, त्यावर संस्कृत भाषेमधील शिलालेख ही आहे. यादव कुळातील राजा सिंघनदेव याच्या राजवटीमध्ये ११३६ साली या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण झाल्याचा उल्लेख शिलालेखामध्ये केलेला आहे.

मंदिराची स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर, हळेबिडशी साम्य दर्शवणारी आहे. देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे. मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे. गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रतिकृती असलेल्या छोट्या शिखरांची ओळ आहे. अंतराळ आणि मंडप यांचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही. मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्गमंडप म्हणून ओळखले जाते, त्याला कधीच छत नव्हते. कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून सर्वात पुढच्या बाजूस मुखमंडपाऐवजी त्रिरथ तलविन्यासाचा पूर्णमंडप आहे. मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून तिच्याभोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे बारा स्तंभ आहेत. या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल वाहनांसह दाखविलेले आहेत. या बारा स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे नऊ स्तंभ आहेत.

स्वर्गमंडपाच्या आत सभामंडप आहे. या सभामंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लगतच एकेक स्तंभ व त्याखालील कोनाड्यात व्याल आहेत. सभामंडपाच्या मधल्या बारा स्तंभांभोवती वीस चौकोनाकृती स्तंभ आहेत. या स्तंभांच्या रांगांपलीकडे सभामंडपाच्या भिंती आहेत. या सभामंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत. मंडपातून अंतराळात जाताना प्रवेशमार्गापाशी दोन्ही बाजूंना द्वारपालाच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकारचे आहे. गर्भगृहात दोन शिवलिंगे आहेत.

सभामंडपात जाताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस नक्षीदार जाळ्या बसवलेल्या आहेत. त्या जाळ्यांवरचे दगडात कोरलेले हत्ती खूप सुंदर आहेत. दरवाजाच्या पायथ्याशी दोन्ही बाजूला पाच-पाच द्वारपाल आहेत. मुख्य सभामंडपही खूप सुंदर आहे. पुढे गर्भगृहात जाताना प्रवेशद्वाराच्या पायाशी रांगोळीसारखी सुरेख नक्षी कोरलेली दिसते. गर्भगृह जरासे अंधारे आहे. परंतु डोळे सरावल्यानंतर आतमध्येही सुंदर मूर्ती आहेत असे लक्षात येते. या सर्व मूर्तीमध्ये त्यांचा आकार, प्रमाणबद्धता विशेष उठून दिसतात.

केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव-रेखीव मानवी आकृती सुमारे पाच-सहा फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एक पुरातन शिलालेख आहे. ऊन-पावसाचा मारा खात हा शिलालेख अजून शिल्लक आहे.

कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंघाभाग, देवकोष्ठे आणि अधिष्ठानाच्या थरावर वेगवेगळी आकृतिशिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत.गजथरावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. मंडोवरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पहायला मिळतात.

कट्यार काळजात घुसली (चित्रपट) या मराठी चित्रपटातील ‘शिव भोला भंडारी’ या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यानंतर, पूर्वी काहीश्या दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.

भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाने या मंदिराला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

कोप्पेश्वर (खिद्रापूर) मंदिर.

माहिती साभार – फेसबुक काका आणि गुगल मामा

Leave a Comment