कोप्पळचा किल्ला
दख्खनचा दरवाजा म्हणून ओळखला जाणारा हा कोप्पळचा किल्ला.
दक्षिण दिग्विजयामध्ये छत्रपती शिवरायांनी पहिला जिंकलेला हा किल्ला होय., अब्दुररहिमान आणि हुसेनखान मियाना या हे आदिलशाही सैनाधीकारी किल्ल्यावर आणि सभोवतालच्या प्रदेशावर हुकुमत गाजवीत होते. तेव्हा राजांनी हंबिरराव मोहिते यांना कोप्पळकडे पाठवले व ते पुढे भागानगरकडे निघाले.
हंबिरराव कोप्पळच्या जवळ येलबर्गा गावाजवळ असताना त्यांना हुसैनखानचे सैन्य त्यांच्या दिशेने येताना दिसले. त्यांनी लगेच स्वतःच्या सैन्याच्या फळ्या तयार केल्या व पठाणांच्या सैन्याला तोंड द्यायला तयार झाले. सर्जेराव जेधे, त्यांचा मुलगा नागोजी जेधे, धनाजी जाधव हे हंबीररावांच्या सैन्यात होते. त्यांनी आपापल्या जागा घेतल्या व काही क्षणातच पठाणी सैन्य त्यांच्यावर येऊन आदळले. हुसैनखानला वाटले होते की त्याची पठाणी फौज मराठ्यांच्या सैन्याची फळी मोडून आरपार जाईल. पण तसे काही झाले नाही. एखाद्या भिंतीवर आदळेल तशी पठाणांची फौज मराठ्यांवर धडकली.
अशाप्रकारे शत्रूचा पहिला मारा मोडून काढल्यावर हंबिररावांच्या सैन्याने पठाणांवर जोरदार प्रत्याक्रमण सुरु केले. हुसैनखानच्या हत्तीलाच मराठ्यांनी घेरले. नागोजी जेधे यांनी हत्ती समोर उडी घेतली व त्याच्या डोक्यात भाला मारला. त्याने घायाळ झालेला हत्ती सगळीकडे पळत सुटला. त्याच वेळी हुसैनखानने नागोजीच्या मानेत बाण मारला.
त्या हत्तीला मराठ्यांनी लगेच जेरबंद केले व हुसैनखानलाही बेड्या पडल्या. पठाणांचे सैन्यही पराभूत झाले व जिवंत राहिलेले सगळे पळत सुटले. मराठ्यांवरही घाव पडले होते. कान्होजी जेधेचा नातु, नागोजी ह्या युद्धात कामी आला. भोर जवळच्या कारी गावात त्यांची बायको गोदुबाई सती गेली. मराठ्यांना काही हत्ती, दोन हजार घोडे व इतर सामग्री हाती लागली.
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची