महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,10,326

कोथळीगड | Kothaligad Fort

By Discover Maharashtra Views: 4503 7 Min Read

कोथळीगड | Kothaligad Fort

नेरळ्च्या पूर्वेला १९ किलोमीटरवर आणि कर्जतच्या ईशान्येला २२ किलोमीटरवर असलेल्या एका सुळक्यावर कोथळीगड(Kothaligad Fort) हा प्राचीन किल्ल्ला आहे. त्याच्या दक्षिणेला असलेल्या कर्जतहून खेड- कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ह्याचा वापर होत असावा. पेठच्या पठारावरून पूर्वेला वांदरे खिंडीत जाण्यास पायवाट आहे. ह्याच्या उत्तरेला पदरचा किल्ला व भिमाशंकरचा विस्तृत डोंगर आहे. कर्जतहून पेठकडे जाताना उजव्या हाताला सह्याद्रीचे मोठे विहंगम दृश्य दिसते. त्यामध्ये ढाक व बहिरीचा सुळकाही येतो. समुद्रसपाटीपासून हा फक्त ४७२ मीटर उंच आहे आणि वरती फार मोठाही नाही. मुख्य सह्याद्री रांगेपासून विलग झालेल्या डोंगरावर उभा असलेला एक सुळका असे ह्याचे रूप आहे.

आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. या किल्ल्याची बाजारपेठ या गडाच्या पठारावर होती त्यामुळे या पठारावर असलेल्या गावाचे नावही पेठ व गडालासुद्धा पेठचा किल्ला असे नाव पडले आहे. पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहुबाजूंनी तासल्यासारखा पेठचा सुळका दिसतो. या गावाहून वर गडावर चढण्याचा मार्ग दमछाक करणारा आहे. ही वाट सरळ किल्ल्याच्या प्रवेशव्दाराशी घेऊन जाते. पायवाटेने वर पोहोचल्यावर पायऱ्याचे व प्रवेशव्दाराचे अवशेष दिसतात. वरच्या सुळक्याचा चढ कठीण आहे व चारही बाजूंनी कातळकडे उघडे पडले आहेत. पेठच्या किल्ल्यावर दुर्गवास्तुशास्त्राची अक्षरश: उधळण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुढे कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम आहे ती देवीची गुहा, पाण्याचं टाके आणि मग डावीकडे ऐसपैस अशी भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट जमीन आणि छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब. गुहेत काही ठिकाणी गोल खळगे आहेत आणि काही जूने तोफेचे गोळे आहेत.

गुहेजवळच एका ऊर्ध्वमुखी भुयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्याचा मार्ग आहे. कोथळीगड या नावाची उत्पत्ती ‘‘कोथळा’ या शब्दात आहे. गडाच्या सुळक्यामध्ये दुर्गस्थापत्याची अशी काही करामत दडली आहे की महाराष्ट्रात अशा प्रकारची रचना क्वचितच एखाद्या किल्ल्यात पाहायला मिळेल. गडाचा परिसर मुळातच आटोपशीर असल्याने गडावर बांधकामे फारशी नाहीत. पण कोथळीगडाच्या मुख्य गुहेपासून गडाच्या माथ्यावर जाताना गडाचा सुळका अक्षरश: कुतुबमिनार सारखा आतल्या बाजूने खोदून काढलेला असून शब्दश: त्याचा कोथळा काढण्यात आलेला आहे आणि म्हणूनच किल्ल्याचे नाव कोथळीगड. या मार्गामध्ये बोगद्यासारखी रचना तयार करण्यात आलेली असून किल्ल्याच्या माथ्याकडे जाण्यासाठी या सुळक्याच्या आतल्या बाजूने भक्कम खोदीव पायऱ्या कोरलेल्या आहेत. किल्ल्याचा हा मार्गही सरळसोट नसून वळणं घेत आपण या भुयारातून गडाच्या वरच्या बाजुस बाहेर पडतो.

कोथळीगडाच्या मुख्य बालेकिल्ल्याचा प्रवेश रोखण्याच्या उद्देशाने ही बांधणी केलेली आहे. कारण पुढील मार्गही अरुंद असून खोदीव पायऱ्या पार केल्यावरच गडाचा दरवाजा समोर येतो. पायऱ्याच्या मार्गावर उजवीकडे गज शिल्प कोरलेले आहे. पायऱ्याच्या शेवटी दगडात कोरून काढलेला दरवाजा आहे. दरवाजावर शरभ शिल्प कोरलेले आहे. कोथळीगड  (Kothaligad Fort) माथ्यावर पाण्याची दोन टाकी आहेत. किल्ल्याच्या माथ्यावर मजबुतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेले आहे. गडमाथ्यावरुन भीमाशंकरकडील कलावंतिणीचा महाल, नागफणी, वाघाचा डोळा, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शाळगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलूख नजरेच्या टप्प्यात येतो. गडमाथ्यावरुन परत गुहेजवळ येउन सुळक्याला प्रदक्षिणा घातलताना वाटेत पाण्याच्या टाक्यांचे दोन समुह व एक लेण पाहायला मिळते. किल्ल्याचा आटोपशीर विस्तार लक्षात घेऊन पाण्याच्या टाक्यांची व्यवस्थाही नेटकेपणाने केलेली आहे. गडाच्या अर्ध्या भागावरील गुहेच्या बाहेर, सर्वोच्च माथ्यावर व किल्ल्याच्या सुळक्याच्या पोटात पाण्याची टाकी खोदलेली आहेत. गडावर प्रवेशव्दाराच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एका बुरुजाजवळ एक तोफ पहायला मिळते याशिवाय गावात मारुती मंदिरा जवळ तोफेचा मागचा पंचरशी भाग पाहायला मिळते.

लहानशा दिसणाऱ्या या किल्ल्याचा इतिहास मोठा रक्तरंजित आहे. त्याविषयाची माहिती मराठी व इंग्रजी कागदपत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रांमधून मिळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही, पण एक संरक्षक ठाणं होता. मराठ्यांचे या किल्ल्यावर शस्त्रागार होते. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. शिवाजी महाराजांनंतर जेव्हा औरंगजेबने ह्या भागात आक्रमण केले तेव्हा हा किल्ला मराठ्यांकडेच होता. संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. औरंगजेबाने नोव्हेंबर १६८४ मध्ये अब्दुल कादर याला संभाजींराजाच्या ताब्यातील या भागातील किल्ले घेण्यासाठी पाठवले. कोथळीगड (Kothaligad Fort) हा महत्त्वाचा असून जो कोणी तो ताब्यात घेईल, त्याचा ताबा तळकोकणावर राहील हे लक्षात घेऊन अब्दुल कादर याने हा किल्ला घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तो या किल्ल्याच्या जवळपास गेला आणि तेथे राहणाऱ्या लोकांना त्याने आपले नोकर म्हणून ठेवून घेतले. मराठे या किल्ल्यातून शस्त्रांची ने-आण करतात हे कळताच अब्दुल कादर व त्याचे ३०० बंदूकधारी नोव्हेंबर १६८४ मध्येच गडाच्या पायथ्याशी पोहोचले. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा मिळविण्याकरिता बाहेर गेला होता व गडाचा ताबा माणकोजी पांढरे ह्याच्याकडे होता.

शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकीर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दूल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेवून आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचं सैन्य कापून काढले. दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी किल्ल्याला वेढा घातला, फार मोठी लढाई झाली. या लढाईत बाणांचा व बंदुकींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.या लढाईत किल्ल्यावरचा दारूगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गडावर जाणारी सामुग्री मराठ्यांनी लुटल्यामुळे मुघल सैन्याला दारूगोळा व धान्य मिळेनासे झाले. दरम्यानच्या काळात अब्दुल कादरच्या मदतीला कोणीच न आल्यामुळे त्याची परिस्थिती कठीण झाली. वेढा टाकल्यानंतर दहा बारा दिवसांनी जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान याला सैन्यासह अब्दुल कादरच्या मदतीला पाठवले. अब्दुलखान तेथे पोहचला तेव्हा त्याची वाट अडवण्यासाठी मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक यांनी तेथील खोरे रोखून धरले होते. येथेही लढाई झाली नारोजी त्रिंबक व इतर सरदार धारातीर्थी पडले आणि कोथळागड मुघलांच्या ताब्यात गेला.

इद्दतममखान ह्या मुघल सरदाराने त्याच्या पार्थिवाचे तुकडे केले आणि नारोजी त्रिंबकाचे डोके रस्त्यावर टांगले. किल्ला जिंकून सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठवण्यात आली. औरंगजेबाने कोथळागड नावाचा असा कोणता गड अस्तित्वात आहे का? याची खात्री करून मगच अब्दुल कादरला बक्षिसे दिली. मुघलांनी गडाला “मिफ्ताहुलफतह” (विजयाची किल्ली) असे नाव दिले. फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. फंदफितुरीमुळे मराठ्याच्या हातून हा मोक्याचा किल्ला निसटला. गड परत मिळवण्यासाठी मराठ्यांनी प्रयत्न सुरू केले. डिसेंबर १६८४ मध्ये गडाकडे जाणाऱ्या मुघल सैन्याला मराठ्यांनी अडवले. नंतर मऱ्हामतखानालाही ७००० मराठ्यांच्या तुकडीने अडवले. पण मराठ्यांना यश लाभले नाही. त्यानंतर एप्रिल १६८५ मध्ये ७०० जणांच्या तुकडीने पुन्हा हल्ला केला. २०० जण दोरीच्या शिडीच्या मदतीने किल्ल्यात उतरले. बरेच रक्त सांडले पण मराठ्यांची फत्ते होऊ शकली नाही. मराठ्यांनी हा महत्त्वाचा किल्ला गमावला होता. पुढे १८१७ च्या नोव्हेंबरमध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या वतीने बापुराव नामक शूर सरदाराने हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यातून सोडवला. सुमारे १८६२ पर्यंत किल्ल्यावर माणसांचा राबता होता.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment