महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,51,419

कृष्णा भास्कर मारीला कि रक्षिला ?

By Discover Maharashtra Views: 7338 16 Min Read

कृष्णा भास्कर मारीला कि रक्षिला ?

मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके १५८१ म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराजांनी ३२ दातांचा बोकड फाडला तो बोकड होता विजापूर सरदार अब्दुलाखान भटारी म्हणजेच अफझलखान . अश्या या दानवरुपी अफझलखानाचा वध शिवाजी महाराजांनी केला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा म्हणजेच शिवप्रताप दिन. अफझलखानाबरोबर अनेक नामवंत मराठा सरदार स्वराज्यावर चाल करून आले त्यांची यादी शिवभारतात येते . नाईकजी पांढरे , कल्याणजी यादव , झुंजारराव घाटगे , जीवाजी देवकाते , पिलाजी मोहिते, शंकराजी मोहिते , प्रतापराव मोरे , बाजी घोरपडे , मंबाजी भोसले (शिवरायांचे चुलत काका शहाजीराजांचे चुलत बंधू ). आणि खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी.(कृष्णा भास्कर मारीला कि रक्षिला ?)

प्रतापगडाच्या या युद्धात चर्चिला जाणारा व्यक्ती म्हणजे खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी . अफझलखानाने शिवाजी महाराजांशी वाटाघाटी करण्यासाठी याची नेमणूक केली . प्रतागडावरील प्रत्यक्ष भेटी दरम्यान हा वकील तेथे उपस्थित होता. शिवाजी महाराजांचा विश्वास संपादन करण्यासाठी अफझल खानाने आपली तरवार आपला वकील कृष्णाजी भास्करच्या हातात दिली. खानाने दगा करताच शिवाजी महाराजांनी खानाचा कोथळा बाहेर काढला . त्यावेळी कृष्णा भास्कर शिवाजी महाराजांवर चालून गेला. या अफझलखानाच्या वकिलास महाराजांनी मारला कि त्यास ब्राम्हण म्हणून रक्षिला ? निरनिराळ्या संदर्भ साधनांत आपणास याविषयी निरनिराळी माहिती आढळून येते. इतिहासकारांमध्ये देखील याबाबत मतभेद आहेत. आपण सदर लेखात इतिहासकारांची मते व संदर्भसाधनातील नोंदी पाहू.

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यास जीवदान दील्याच्या नोंदी :-

सभासद बखर :- वकील कृष्णा भास्कर याने शिवाजी महाराजांवर वार केल्याचा किंवा शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर यास मारल्याचा ओझरता उल्लेख देखील केलेला नाही .

शेडगावकर भोसले बखर :- वकील कृष्णा भास्कर याने शिवाजी महाराजांवर वार केल्याचा किंवा शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर यास मारल्याचा ओझरता उल्लेख देखील केलेला नाही. सदर बखरीत कृष्णा भास्कर याच्या ऐवजी दत्ताजी भास्कर यांचे नाव खानाचा वकील म्हणून येते.

शिवापूर देशपांडे वहीतील शकावली :- मार्गसीर्ष शु//७ गुरुवारी आठवे तासी प्रतापगडनजीक सिवाजी राजे याणी आफझलखानासी येकांगी करून आबजलखान जिवे मारिला सिर कापिले . सदर शकावलीत कृष्णा भास्कर याचा उल्लेख नाही.

सप्तप्रकरणात्मक चरित्र :- सदर बखरीत कृष्णा भास्कर ऐवजी गोविंदपंत दिवाण म्हणून उल्लेख येतो. याजवरी गोविंदपंत दिवाण सरकोन आले. त्यास “ तु ब्राम्हण. पुढे येऊ नको “ बोलले असता चालून आला. ते समयी जवळ तानाजी मालुसरे होते. त्यांणी व जिवबा महाला यांणी त्याजवर पट्टा चालविला . जखम लागली . महाराज “ ब्राम्हण आहे , शिपाईगिरी व खावंदाची चाकरी केली . पुरा करू नका “ ऐसे बोलले . सदर बखरीतील वर्णनानुसार गोविंदपंत दिवाण यास शिवाजी महाराजांनी जीवे ठार मारले नाही.

सदर बखरीत पुढे वर्णन येते गोविंदपंत दिवाण वैगेरे जलदीने गोटात जावून खानाचे वर्तमान कळताच सर्व हतवीर्य होऊन अवसाने सोडून पळू लागले. गोविंदपंत , कृष्णाजीपंत पाडाव आले , त्यास वस्त्रे दिली व कृष्णाजीपंत यास बहुमान वस्त्रे देवून लाऊन दिले. सदर बखरीतील वर्णनानुसार गोविंदपंताने खान मारला गेल्याची बातमी इतर लोकास दिली तसेच तो शरण आला त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यास वस्त्रे दिली.

अज्ञानदासाचा पोवाडा :- शिवजी महाराजांवरील पहिला पोवाडा रचणारा अज्ञानदास याने सदर पोवाडा शिवाजी महाराजांसमोर गायला आहे . सदर पोवाड्यात प्रतापगडाच्या युद्धाचे वर्णन केले आहे त्यातील कृष्णाजी भास्कर याच्या विषयीचा उल्लेख पुढीलप्रमाणे येतो.

“अबदुलखान खान झाला पुरा / कृष्णाजी ब्राम्हण उठावला //
शिवाजी राजा बोलला / ब्राम्हणा मारू नये तुला /तुजशी मारीता शंकर हांसेल आम्हाला “ //
नाईकतां ब्राम्हणे / हात दुसरा मारिला //
ब्राम्हणा मारू नये तुला / क्रिया शहाजीची आम्हाला “ //
कृष्णाजी ब्राम्हण / हात तिसरा टाकीला //
होईल ब्रम्हहत्या भोसल्यासी / शिवाजीने राखीला //
कृष्णाजी ब्राम्हण मागे सरला // सैद बंडू मोहरे आला //
जवळ होता जिऊ म्हाल्या / त्याने सैद पुरा केला //

सदर पोवाड्यात कृष्णाजी यास ब्राम्हण असल्या कारणाने शिवाजी महराजांनी त्यास जीवे मारले नाही असे वर्णन येते

शिवभारत :- शिवाभारतातील वर्णन “ ब्राम्हणास शिवराय ठार मारणार नाहीत असे जाणून धनी अफझलखानाने त्या ब्राम्हण योध्यास युद्धात निविष्ठ केले होते . तो ब्राम्हण आहे असे ऐकून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवरायांनी त्यास ठार मारण्याची इच्छा केली नाही . अफझलखानाचे ते सैनिक तेथे पोचेले नाहीत तोच त्याने ती तरवार शिवरायांवर हाणली. त्याने मारलेली ती तरवार त्या समयी शिवरायांनी आपल्या तरवारीने अडवली आणि पट्याने त्याच्या धन्याच्या खानाच्या डोक्याचेही दोन तुकडे केले. धिप्पाड शत्रूचे पट्याने कापलेले डोके वज्राने फोडलेल्या पर्वत शिखराप्रमाणे लगेच खाली पडले. “

समकालीन व विश्वसनीय मानल्या जाणाऱ्या शिवभारतात अफझलखानाने ब्राम्हण व्यक्तीस शिवाजी महाराज जीवे मारणार नाहीत हे लक्षात घेऊन आपल्यासोबत त्यास भेटीच्या ठिकाणी जवळ ठेवले. शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर यास ब्राम्हण असल्या कारणाने जीवे मारले नाही .

जेधे करीना :- “ हेजीब व हुद्देकरी यांणी राजेश्रीवर हतेर धरिले. पंताजी गोपीनाथ ( शिवाजी महाराजांचे वकील ) यांस जखम लागली. तेंव्हा जीवा महाला व सर्जाराऊ व लोक येऊण हेजिब व हुद्देकरी मारिले. “

जेधे करीन्यानुसार हेजिब व हुद्देकरी मारिले असे वर्णन येते परंतु त्यात कोणत्याही व्यक्तीचे नाव आढळून येत नाही.

९१ कलमी राजवाडे प्रत / भारतवर्ष प्रत / फोरेस्ट प्रत :- कृष्णाजी भास्कर त्यापासी तरवार फीरंग होती त्याणे वार सिवाजी राजे यावर टाकीला परंतु कारगार जाला नाही.दुसिरीयाने राजे यांणी पटीयाचा वार खानावर टाकिला . दोनी भाग शरीरास होऊन पुरा होऊन खाले पडिले. कृष्णाजी भास्करास म्हणो लागले ब्राम्हणास मारीत नाही पलोन जाणे. कृष्णाजी भास्कर त्यासही मारू दिधले नाही. त्यास मार्ग दिधला. लष्करात सांगावयास माघारी जीव घेऊन गेला.

कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यास जीवे मारल्याच्या नोंदी :-

९१ कलमी साने प्रत / सरकार प्रत :- कृष्णाजीपंत दिवाण यांनी महाराजांवर हात टाकीला . राजे बोलिले की ब्राम्हण तु . असे समोर उभे न राहणे . ब्राम्हण हत्या घडेल. इतक्यात जीव महाला यांनी तरवारीने ठार केले. ( सरकार प्रत मध्ये कृष्णाजीपंत यांच्या ऐवजी गोपीनाथपंत असे नाव येते. )

९१ कलमीच्या साने व सरकार प्रत या उत्तरकालीन बखरीत कृष्णाजीपंत यास जीवा महाले यांनी ठार मारले असा उल्लेख आलेला आहे. ९१ कलमी राजवाडे व भारतवर्ष प्रत मात्र यास दुजोरा देत नाही .

अज्ञानदासाचा पोवाडा ( लघु आवृत्ती ) :- अफझलखानाच्या नोकरीतील कृष्णाजी ब्राम्हण शिवाजीवर चालून आला. , तो ब्राम्हण असल्यामुळे शिवाजीने त्याला मारले नाही. परंतु जिवाजी महालदार याने कृष्णाजीवर बरची फेकून मारली. आणि ती लागून कृष्णाजी मरण पावला.

सदर पोवाड्याच्या या लघु आवृत्तीत सय्यद बंडा यास शिवाजी महाराजांनी मारले अश्या वर्णनाचा आशय दिसतो.

सदर पोवड्यात सय्यद बंडा यास शिवाजी महाराजांनी मारले असे चुकीचे विधान दिसून येते. कृष्णाजीपंत यास जीवा महाले यांनी ठार मारले असा उल्लेख आलेला आहे.

तंजावरचा शिलालेख :- खान मजकूर देवगतीस पावल्यानंतर खानाची तरवार कृष्णाजीपंत हेजीराणे घेऊन राजावरी वर करू लागला. तेंव्हा राजे म्हणाले जे तु ब्राम्हण तुला मारणे आम्हास धर्म नव्हे . आम्ही ब्राम्हण चरणजासच पूजा करितो. आम्हास गुरुदेवतास्थानही ब्राम्हश जाहल्या करिता हाताची हत्यारा टाकून देवून तुला जावे सारिखे असल्या सुखरूप जा. घाटा मोकळ्या करून देतो. अथवा येथेच राहावेतरी अन्न वस्त्रास चालवितो रहा म्हणून उदंड रीतीने सांगीतल्याही त्या ब्राम्हणाने ऐकनासे वारावरी वार चालविला. तो समग्र ओह्डीत परतून पाहिनासे राजे चालिले . तेंव्हा राजाचा खिसमजदार येकाने पाहून ब्राम्हण हट्टास पेटून मारितो. येखादा मार चुकून लागल्या कोट्यावधी जनास पोसणारा राजा ज्या होईल तत्रापि शास्त्र धरून मारणार ब्राम्ह्ननास सुखे मारुये म्हणून त्या कृष्णाजीपंतास मारून दुधड केला.

सदर शिलालेख हा कृष्णा भास्कर यास शिवाजी महाराजांनी मारल्याचे सांगतो . सदर शिलालेख या घटनेनंतर १४४ वर्षांनी लिहिला गेला आहे.

वाई परगण्याचा यादिनामा :- कृष्णाजी भास्कर मानुले हेजिब सिवाजी राजे भोसले यांकडे पाठविले. मुलाखतीचे वक्ती सिवाजी भोसला याने खान आजमास जीवे मारीता मानुले राजे अजमावरी हात केला . राजे अजमाने पट्याचे वार देता पंडित मानुले ठार जाले.

सदर यादिनामे हे विजापुरातील दफ्तरी कामकाजातील मुसलमानी अमलातील आहेत यात कृष्णा भास्कर याने शिवाजी महाराजांवर वार केला असता शिवाजी महाराजांनी पट्याचा वार करून त्यास ठार मारले.

प्रतापगड युद्धानंतर कृष्णा भास्कर याचे येणारे उल्लेख :-

( १ ) :- ( शी.प.सा.सं. १ / १२०७ ) ५ एप्रिल १६६८ च्या पत्रातील उल्लेख “ कृष्णाजी भास्कर सुभेदार व कारकून महालनिहाय तर्फ मावल :

( २ ) इ.स. १६७१-७२ चा जबिता तह .:- शिवाजी महाराजांनी किल्यांच्या संरक्षणासाठी रोख रकमेची तरतूद केलेली आहे. या जाबित्यात कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख येतो.

( ३ ) ( शी.प.सा.सं. २ / १७४४ ) २३ एप्रिल १६७५ च्या पत्रातील उल्लेख “ कृष्णाजी भास्कर सुभेदार व कारकून सुभा महालनिहाये पा वाई व सातारा “

( ४ ) ( शिवचरित्र साहित्य खंड ६ / ले. १११ ) :- १२ जून १६८२ च्या पत्रात कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख येतो. छत्रपती स्वामी गतवरशी पनालाहून पा मारास आले ते समयी आपण सदरहूप्रमाणे वर्तमान विदित केले यावरी स्वामी कृपाळू होऊन सदरहू देशमुखीचे बारा गाव वारणेकडे वोढत होते ते सिरोलकडे लावणे आणि देशमुखीचा कारभार तुलाजीच्या हाते भोगवाट्याप्रमाणे घेत जाणे म्हणोऊन राजेश्री कृष्णाजी भास्कर यास आज्ञा केली.

( ५ ) २८ ऑक्टोंबर १६८० छत्रपती संभाजी महराजांनी कृष्णाजी भास्कर यास चाफळच्या यात्रेच्या सुरक्षीततेविषयी आज्ञा केली “ मुसलमान अगर हर कोणाचा उपद्रव न लगे यैसे करून श्रीगोसावी याचे स्थळ आहे हरयेकविशी परामृश करीत जाणे “

( ६ ) :- जयराम पिंडे लिखित “ पर्णालपर्वत ग्रहणाख्यान “ या संदर्भ ग्रंथात उमरणीच्या युद्धात प्रतापराव गुजर यांच्यासोबत कृष्णाजी भास्कर यांचा उल्लेख येतो. युद्धाच्या अखेरीस कृष्णाजी भास्कर याने शत्रूचे सैन्य लुटून हत्ती , घोडे रथ वैगरे लुट आपल्या ताब्यात घेतली.

सदर पत्रातील कृष्णाजी भास्कर याचा उल्लेख पाहता ते स्वराज्यात सुभेदार म्हणून नियुक्त होते असे दिसून येते. कृष्णाजी भास्कर हे आदिलशाहीत वाई परगण्याचे हवालदार होते . प्रतापगडयुद्धानंतर शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या सेवेत ठेवले असावे.

इतिसाकारांची मत मतांतरे :-

शककर्ते शिवराय , विजयराव देशमुख :- आमच्या मते , यादिनाम्यातील उल्लेख विश्वसनीय आहे. बखरी , पोवाडा किंवा शिवभारत यांच्या कर्त्यांना महाराजांनी ब्रम्हहत्या केली असे नमूद करून ठेवणे अडचणीचे वाटले असावे. त्यामुळे त्यांनी तेवढा भाग मोघम शब्दात वर्णन केला. यादिनाम्याच्या नोंदीचे तसे न्हवते. तो दफ्तरी कामकाजाचा भाग होता. त्यामुळे ती नोंद विश्वसनीय समजायला हरकत नाही.

श्री राजा शिवछत्रपती , गजानन मेहंदळे :- बखर , पोवाडा आणि यादी या उपयुर्कत्त साधनांपैकी कोणतेच साधन विश्वासनियतेच्या दृष्टीने पहिल्या दर्जाचे नाही आणि त्यांच्या विश्वसनीयतेत फार मोठा फरकही नाही. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाची हकीगत बरोबर असण्याचा जास्त संभव आहे , किंवा एकाची तरी हकीगत बरोबर असेल का, ते सांगता येत नाही. ब्राम्हणहत्या हे पूर्वी पाप मानले जाई. परंतु अशा धामधुमीच्या प्रसंगी कृष्णाजी भास्कर हा ब्राम्हण आहे एवढ्याच कारणावरून शिवाजीने त्याला मुद्दाम सोडून दिले असेल असे वाटत नाही. मात्र कृष्णाजी भास्कर शिवाजीच्या हातून ठार ठार झालेला नसावा आणि त्या गोष्टीचा फायदा घेऊन , आपल्या चरित्रनायकाच्या कीर्तीत भर घालावी अशा हेतूने , शिवभारतादी साधनामध्ये कृष्णाजी हा ब्राम्हण असल्यामुळे शिवाजीने त्याच्यावर शस्त्र उचलले नाही असे सांगितले असावे , असे दिसते. कृष्णाजी भास्कर पळून गेला असे फक्त एक्याण्यव कलमी बखरीच्या काही प्रतींमध्ये म्हटले आहे. अज्ञानदासाच्या पोवाड्याच्या लघु आवृतीत आणि वाई परगण्यावर झालेल्या कारर्कीदिच्या यादीत तो मारला गेल्याचे सांगितले आहे. त्यावरून आणि तो मारला गेला किंवा नाही याविषयी शिवभारतकाराने पाळलेल्या मौनावरून , तो मारला गेला असावा असे वाटते .

छत्रपती शिवाजी महाराज , वा सि बेंद्रे :- सारांश कृष्णाजी भास्कर हा आदिलशाही सुभेदार होता आणि त्या सुभेदाराने नोकर म्हणून अफझलखानाला मदत करणे शक्य होते . परंतु शिवाजी महाराजांनी त्या बाजूचा भाग घेतला होता. त्यामुळे त्याचे शिवाजीकडे लक्ष लागणेही शक्य होते. सहजच कृष्णाजी भास्करने शिवाजीची बाजू सांभाळली आणि त्या कृष्णाजी भास्करने महाराजांवर तलवार उगारली , याबद्दल विशेष पुरावा नाही . कदाचित त्याने आपण शिवाजीच्या कटात नसल्याचा देखावा केला असावा . तसे जर नसते , तर शिवाजीने त्याला पुढे सुभेदारीवर ठेवलेच नसते.

छत्रपती शिवाजी महाराज , कृष्णराव अर्जुन केळुस्कर : – शिवाजी महाराजांनी खानाचा वकिल कृष्णाजी भास्कर यास वाटाघाटीच्या दरम्यान वश करून आपल्या बाजूस वळवून घेतले. कृष्णाजी भास्कर हा महाराजांवर चालून आला असता त्याचे दोन तीन वार महाराजांनी चुकविले . व त्याला सांगितले कि “ ब्राम्हणास मारू नये अशी मला माझ्या वडिलांची आज्ञा आहे. यास्तव तु बऱ्या गोष्टीने निघून जा ! असे बोलून त्याला सोडून दिले.

इतिहासाच्या पाऊलखुणा १ , कौस्तुभ कस्तुरे :- जुदुनाथ सरकारसुद्धा महाराजांनी आधी कृष्णाजीला आपल्या बाजूला वळवून घेतले अस म्हणून प्रत्यक्ष भेटीच्या वेळेस कृष्णाजी भास्करचा उल्लेखही करत नाहीत. ग.भ.मेहंदळे “ मारले असावे “ असं पुराव्याच्या अभावी म्हणतात ( श्री राजा शिवछत्रपती ). बाबासाहेब पुरंदरे ( राजा शिवछत्रपती ) आणि विजयराव देशमुख ( शककर्ते शिवराय ) यांनी “ वाई यादिनाम्याच्या आधारे “ मारले “ म्हटले आहे , पण या एका आधाराला खोडून काढता येतील, असे इतर संदर्भ मी वरील लेखात दिले आहेत

छत्रपती शिवरायांचे पत्ररूपी स्वभावातील दोन पैलु :- कृष्णा भास्कर याचा शिवाजी महाराज वध करत असतानाचे एक चित्र व त्याखाली “ ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो “ असा शिवाजी महाराजांच्या पत्रातील उल्लेख आढळतो . सदर उल्लेखाचा कृष्णा भास्करशी कोणताही संबंध नाही . प्रतापगड युद्धानंतर १६ वर्षांनी लिहिलेल्या पत्रातील तो उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दोन पत्रे व त्याद्वारे होणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वभावातील दोन वेगवेगळ्या पैलुंचे दर्शन आपणास त्याद्वारे घडते .

तत्कालीन सामाजिक रूढी प्रमाणे ब्राम्हणास मान दिला जात होता ब्राम्हणहत्या पाप आहे असे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्रातून जाणवते ” मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली त्याचा नतीजा तोच पावला” ( दीनांक ८ सप्टेंबर १६७१ , शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ , पत्र क. १४०८ )

तर दुसऱ्या पत्राद्वारे स्वराज्यातील कामात कामचुकार करणाऱ्या ब्राम्हणास “ ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो “. अश्या कडक शब्दात कानउघाडणी करून ब्राम्हण असलात तरी तुमची गय केली जाणार नाही अशी तंबी दिली जाते. ( दीनांक १८ जानेवारी १६७५ ,शिवकालीन पत्रसार संग्रह खंड २ , पत्र क. १७१८ )

कृष्णा भास्कर मारीला कि रक्षिला ? या सदर लेखात कृष्णा भास्कर यास जीवनदान दिल्याचे संदर्भ तसेच त्याला जीवे मारल्याचे संदर्भ . तसेच प्रतापगड युद्धानंतर कृष्णा भास्कर याचे येणारे उल्लेख . तसेच इतिहासकारांची मतमतांतरे आपल्या समोर ठेवली आहेत. आता वाचकांनी आपआपली मते ठरवावीत.

श्री. नागेश सावंत.
छायाचित्र साभार गुगल.

Leave a Comment