कृष्णनाथाचे मंदिर, धारणगाव खडक –
नाशिक – संभाजीनगर राज्य मार्गावर नाशिक पासून साधारण ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या विंचूर गावाच्या ३ किमी आधी, उजव्या हाताला मुख्य रस्ता सोडून ३ किमी आत धारणगाव हे गाव आहे. बोकडदरा नदीच्या किनारी वसलेले हे गाव दोन भागात विभागलेले असून नदीच्या पूर्वेस धारणगाव खडक व दक्षिणेस धारणगाव वीर हे गाव आहे. यातील धारणगाव खडक गावातील कृष्णनाथाचे पुरातन मंदिर ग्रामस्थांची अनास्था व असंवेदनशीलता यामुळे आज शेवटच्या घटका मोजत आहे.
साधारण १२ व्या शतकातील भूमिज शैलीतील कृष्णनाथाचे मंदिर धारणगाव खडक ह्या गावाच्या हद्दीत येते. मंदिर बाभळी व काटवनाने वेढलेले असल्याने मुख्य रस्त्यावरून आपल्या नजरेस पडत नाही. त्यासाठी काही पावले बाभळीतून मार्ग काढीत आत जावे लागते. मंदिर संपूर्ण बाभळी व वेलींनी वेढलेले आहे. मंदिराचे छत पूर्णतः कोसळले आहे फक्त चारही बाजूचे दगडी कोरीवकाम शिल्लक आहे. मंदिराच्या बाहेरील बाजूस छोटे छोटे अनेक शिल्प कोरलेले आहे त्यात सुरसुंदरी व मैथुन शिल्प अत्यंत देखणे आहे. आतील देवकोष्टकाच्या वरील बाजूस शेषशायी विष्णु ची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. देवकोष्टक अजूनही सुस्थितीत आहे.
ह्या मंदिरा बाबत अशी अख्याइका सांगितली जाते की पूर्वी कुंभमेळ्या निमित्त राजस्थान मधून राजा खडकसिंग हा आपल्या लव्या जमासह आला होता त्यानेच हे मंदिर बांधले. हे कृष्णनाथाचे मंदिर म्हणून ग्रामस्थ सांगतात मात्र हे महादेवाचे मंदिर असावे. गावचा हा वारसा अत्यंत दुर्लक्षित असून लोकांच्या विस्मृतीत गेला आहे. ऐतिहासिक व वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला हा वारसा आपलाच असून आणि याला जपायची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे.
©️ रोहन गाडेकर