कुडल संगम –
कुडल संगम (सोलापूर) शिल्प आणि मंदिर अभ्यासकांनी येथे भेट दिलीच पाहिजे असे हे ठिकाण. हरिहरेश्वर आणि संगमेश्वर अशी दोन मंदिरे आहेत. हरिहरेश्वर मंदिरावर फारसे कोरीव काम नसले तरी, सभामंडप रेखीव कलाकृतीने सजलेला आहे. एक एक मूर्ती अप्रतिम सौदर्य अलंकृत आहे.
कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम असा होतो. येथे भीमा व सीना या दोन नद्यांचा संगम असून तेथे प्राचीन संगमेश्वर आणि हरिहरेश्वर अशी दोन मंदिरे आहेत. संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर इ.सन.१०१८ (शके ९४०) मध्ये कोरलेला मराठी शिलालेख आहे. या शिलालेखाचा शोध सोलापुरातील हळे कन्नड भाषेचे अभ्यासक श्री आनंद कुंभार सरांनी लावला आहे. अशी माहिती मिळाली. हा शिलालेख ज्ञानेश्वरी पेक्षा 182 वर्ष जुना असल्याने सध्या तरी मराठीतील ‘आद्य शिलालेख’ असे या शिलालेखास मानले जाते. हत्तरसंग या गावा जवळ असलेले हे ठिकाण सोलापूर पासून अंदाजे 40 km विजापूर रोडवर आहे.
महाशिवरात्रीला येथे किरणोत्सव होतो असे समजले. हरिहरेश्वर मंदिराच्या संवर्धन समयी येथे एक विशाल शिवलिंग मिळाले. हे शिवलिंग बहूमुखी असून एकूण 359 शिव मुखे यावर कोरलेली आहेत. ही 359 शिव मुखे आणि मुख्य शिवलिंग मिळून ही संख्या 360 होते. म्हणजे भाविकाने एक वेळ पूजा केल्यास त्यास 360 वेळा पूजा केल्याचे फळ मिळते असा या मागील भाव आहे. प्रस्तुत शिवलिंगाचा परीघ 4 मीटर आणि वजन 4.5 टन असून शिवलिंगाची उंची 117 सेंटीमीटर असल्याची माहिती मिळाली. सातारा जिल्ह्यात असलेल्या पाटेश्वर येथे बहुमुखी शिवलिंग सापडतात पण 359 शिव मुख असलेली मूर्ती इतरत्र असल्याचे ऐकिवात नाही.
हरिहरेश्वर मंदिरात प्रवेश करताच समोरच एक सुदंर स्त्री शिल्प पाहण्यात आले. हाताशी वेळ कमी असल्यामुळे आणि इथे पोहोंचायला वेळ झाल्याने अंधाराचे पायऱव ऐकू येऊ लागले होते. (कोरवली हे अप्रतिम मंदिर असलेले ठिकाण पाहून येथे जाण्यास वेळ लागला ) म्हणून लवकरच तिचे फोटो घेऊन मंदिर सभामांडपात पळालो कारण सभामंडपातील मूर्ती पाहून माझ्या लहान भावाने आरोळी ठोकून मला बोलावले. तेथील अप्रतिम शिल्पविष्कार कॉमेरा आणि डोळ्यात साठवू लागलो. परत येताना समोर असलेल्या मूर्ती च्या पाठमोऱ्या भागावर एक सुंदरी उभी होती. मग तिला ही कॅमेऱ्यात कैद केलं.
Dr-Arvind Sontakke