कुकडेश्वराचा शोध…
‘शोध’ म्हणजे नव्याने शोध…
१९३० च्या दशकात जुन्नर तालुक्यात पूर येथील कुकडेश्वराचे मंदिर कसे नव्याने सापडले याची एक रोचक कथा सुरेशचंद्र वारघडे यांच्या पुस्तकात आलेली आहे ती इथं सांगतो..( मंदिर स्थापत्य मंदिराचा इतिहास वगैरे वर खूप माहिती पोस्ट होईल म्हणून मी शक्यतो मंदिराशी संलग्न घडलेल्या आणि आदिवासींनी सांगितलेल्या कथा- लोककथा इथं देण्याचा प्रयत्न करतो, पुरावा मागू नये)
तर झाले असे की आलमगिरी च्या वावटळीत किंवा त्या आधी कधीतरी मुस्लिम राजवटी पासून मंदिर वाचवावे म्हणून त्या वेळच्या गावकऱ्यांनी कुकडेश्वर मंदिर पूर्णपणे मातीमध्ये गाडून टाकले आणि त्या जागी एक भली मोठी टेकडीच तयार केली..
काळ पुढे सरकला मंदिर जमिनीत लपवून ठेवणारे लोकही गेले, आणि पुढे पुढे तर त्याचा विसरही पडला.
नंतर १९३०-३५ च्या आसपास एका गुराखी पोराला तिथं एक भगदाड दिसलं ,त्यात मधमाशा ये जा करत होत्या, म्हणून त्याने उकरले…तर खाली नक्षीदार दगड दिसला, पोरानं पळत जाऊन वस्तीवरून माणसं आणली.. कुदळ फावडी आली.. हळूहळू माती चा थर कमी होत गेला आणि नक्षीदार देऊळ उघडं झालं
दिवसरात्र गावकऱ्यांनी कष्ट घेतले.. सगळं स्वच्छ करून गाभाऱ्यात जायची वेळ आली तोवर अंधार पडला , टेम्बे पेटवून चार गडी आत घुसले तसं फुस्स करून आवाज आला. पिंडीजवळ भला मोठा नाग दिसला.. गावकऱ्यांनी हात जोडले,वाट पाहिली मग तो निघून गेला..
तो दिवस होता सोमवार एकादशी चा..तेव्हापासून कुकडेश्वराला एकादशी ला भजन कीर्तन चालू झाले …
कुकडेश्वर महादेव कोळी समाजाचा कुलदैवत झाला.
काही शतके मातीखाली राहून मंदिराचे चिरे बरेच निखळले होते माती गाळ आतपर्यंत गेला होता..पुढे लोकांनी मंदिराला टेकू म्हणून खांब लावले पत्रा टाकला..(आता चे मंदिर पूर्ण उलगडून पुन्हा बांधलेले आहे )
—————————————————
आता दुसरी कथा:
कुकडेश्वराचे मंदिर पुन्हा श्वास घेऊ लागले आणि एकादशीला भजन कीर्तन नित्यनेमाने होऊ लागले.आदिवासी आपली सुखदुःखे घेऊन महादेवाकडे येऊ लागले, लग्न झालेली जोडपी पाया पडायला येऊ लागली.
एक दिवस एकादशीचे कीर्तन करायला मंडळी देवळाजवळ आली.समोरच्या नंदीला विळखा घालून एक मनगटा एवढं जनावर दिसलं..तुळाजी पारधी देवभोळा माणूस आवेशात येऊन त्याने भुजंगासमोरच बसकन मांडली आणि हातात विना घेऊन भजन म्हणू लागला
नागराज पण त्याच्या हातवाऱ्यांकडे बघून डुलू लागले…सगळे लोक हे कौतुक पाहू लागले , लोकांना नागाच्या रूपाने कुकडेश्वर च दिसत होता जणू…
गावातल्या एका म्हाताऱ्यानं हटकलं, बाजूला हो डसला तर पाणी पण मागू देणार नाय…
पण तुळाजी तल्लीन होऊन भजन गाऊ लागला ..आणि एका क्षणी तुळाजी चा हात नको तेवढा जवळ गेला , डुलणाऱ्या त्या नागराजाने तुळाजी चे मनगट धरले ..काय होतंय समजायच्या आत सळसळ करत तो निघून गेला, तुळाजी भानावर आला आणि खाली कोसळला…
लिंबाच्या पाल्यावर झोपवून तुळाजी साठी रात्रभर मंदिरात घंटा वाजवली पण त्याचा उपयोग झाला नाही… कुणी म्हणू लागलं पुण्यवान माणूस म्हणून देवानं एकादशीला बोलावलं.. कुणी म्हणे ढाकोबा च्या डोंगरात मागे एकदा तुळाजीने नागीण कोयत्याने तोडली होती, तिचा बदला घेतला जनावरानं …काही असो पण हे सगळं घडलं कुकडेश्वर च्या अंगणात…
———–
याच कुकडेश्वराने इंग्रज काळात ४०आदिवासींना खाणाऱ्या नरभक्षक वाघालादेखील पाहिले आहे..
इंगळुन गावी मंदिराबाहेर वाघाशी झुंजणारा माणूस दाखवला आहे , ते शिल्प आहे या नरभक्षक वाघाला मारणाऱ्या मारुती दामसे पाटील यांचे.. या आणि अशा अनेक रोमांचकारी घटना आदिवासींनी आणि कुकडेश्वराने पहिल्या असतील …काळाच्या ओघात ती माणसं पण गेली आणि त्या कथाही… ही सगळी कथा भीमजी दामसे या आदिवासीने साधारण १९८५ च्या आसपास सुरेशचंद्र वारघडे याना कथन केली, भीमजी पुढे ९६ वर्षाच्या वयात गेले.
माहिती साभार – आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची