महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,22,281

श्री क्षेत्र कुणकेश्वर

By Discover Maharashtra Views: 4026 20 Min Read

श्री क्षेत्र कुणकेश्वर – सिंधुदुर्ग- देवगड

दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वराचा उल्लेख स्कंद पुराणात व संगमेश्वर महात्म्यातही आला असल्याचे सांगितले जाते. कणकवली रेल्वे स्टेशन पासून 56 कि. मी. अंतरावर तसेच देवगड पासून सुमारे 16 कि. मी. अंतरावर कुणकेश्वर – Kunakeshwar गाव वसलेला आहे. समुद्रकिनाय्राने पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग येथून सुरुवात होणारा सागरी महामार्ग कुणकेश्वर गावातून जातो. तसेच देवगड येथून तारामुंबरीची खाडी ओलांडून मिठमुंबरी समुद्र किनाय्राने चालत कुणकेश्वरला येता येते.या गावात प्रामुख्याने दोन रस्ते येऊन मिळतात. एक रस्ता मिठबाव येथून येणारा तर दुसरा रस्ता देवगड येथून येणारा हे दोन्ही रस्ते कुणकेश्वर मंदिरासमोरील पाराजवळ एकत्र मिळतात. येथे जवळच देवाच्या होळीचा मांड आहे. जवळच महापुरुषाचे स्थान आहे. शिमगोत्सवाच्या सांगतेला श्री कुणकेश्वराला पालखीत बसवून याठिकाणी आणतात. येथून थोडे पश्चिमेकडे चालत गेल्यावर समुद्राच्या अगदी जवळ श्री कुणकेश्वर मंदिराचा परिसर दृष्टीस पडतो.

श्रीक्षेत्र कुणकेश्‍वराला कोकणची काशी असे संबोधतात. काशी येथे १०८ शिवलिंगे, तर कुणकेश्‍वर येथे १०७ शिवलिंगे आहेत.
या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगांमुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते. गेली कित्येक वर्षे या शिवलिंगांवर समुद्रातील लाटांचा बाराही महिने मारा चालू असतो. तरीही शिवलिंगे झिजलेली नाहीत. सध्या केवळ ५-६ ठिकाणी शिवलिंगे पाण्याच्या ओहोटीच्या वेळी दृष्टीस पडतात. अशा प्रकारची खडकांवरील शिवलिंगे काशी या तीर्थस्थळावरही आहेत.

कुणकेश्वरला प्रति काशीचा दर्जा का ?

याचे कारण ही असेच दैवी आहे. यावर आधारीत एक कथा सांगण्यात येते ती अशी, प्राचीन काळी पांडव अज्ञातवासात असताना ते या स्थानापाशी आले. येथील शिवशंकराचे स्थान व निसर्ग पाहुन भारावुन गेले. त्यांना काशीविश्वेश्वराची आठवण झाली. मग दक्षिणेत ही प्रतिकाशी निर्माण करण्याचे त्यांनी निश्चीत केले व कुणकेश्वरच्या तिर्थावर एका रात्रीत 100 शिवलींगे निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी केला परंतु प्रत्यक्षात 99 शिवलींग निर्माण झाल्यावर पहाट झाली मग त्यांनी हे काम थांबविले. काशी क्षेत्री 100 शिवलींग आहेत तर कुणकेश्वर येथे 99 शिवलींग आहेत असे सांगण्यात येते. आजही ही शिवलींगे कुणकेश्वरच्या समुद्र किनाय्रावर आहेत. लाटांचा अखंड मारा झेलुनही त्यांची जराही झीज झालेली नाही. समुद्रातील अंतर्गत हालचालींमुळे एकावेळी सर्वच शिवलींग दिसत नसली तरी काही शिवलींग दृष्टीक्षेपास पडतात. या शिवलींगांमुळेच कुणकेश्वरला ‘कोंकण काशी’ हे नाव सार्थ ठरते.
कुणकेश्वरच्या पारंपारिक आरतीत ही

तारक काशिपुर आहे बहुत दुर
या लागि साधाया हर
चित्ता तो निरंतर
सेवी श्री कुणकेश्वर

या चरणातून असे सुचित केले आहे की काशी क्षेत्र दुरवर असल्याने काशीचे दर्शन घेण्यासाठी कुणकेश्वराचे दर्शन घ्या.

श्री क्षेत्र कुणकेश्वर – सिंधुदुर्ग- देवगड

नारो निळकंठ लिखीत या आरतीतून असे सिद्ध होते की कुणकेश्वरची प्रतिकाशी म्हणू ओळख शिवकाळा पासूनच आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्‍वर देवाचे मंदिर कुणकेश्‍वर गावात समुद्रकाठी डोंगराच्या पायथ्याशी उंचवट्यावर आहे. मंदिराची उंची ७० फूट आहे. कोकणातील इतर प्रसिद्ध अशा भगवान शंकरांच्या स्थानांत याची गणना होते. कुणक म्हणजे कणक नावाच्या वृक्षाची राई तेथे होती. त्यावरून कुणकेश्‍वर असे नाव प्रचलित झाले आहे.

श्री देव कुणकेश्‍वराच्या मंदिराची बांधणी द्रविडी (दाक्षिणात्य) पद्धतीची आहे. या मंदिराच्या परिसरात श्री जोगेश्‍वरीचे छोटे देवालय, श्री देव मंडलिक नावाचे एक शिवालय, श्री नारायण मंदिर, श्री गणेश मंदिर आणि श्री भैरव मंदिर आहे.

श्री देव कुणकेश्‍वराचे स्थान इ.स. ११ व्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते.११ जुलै १८५० मध्ये मेज ली ग्रँट जेकब या मुंबईच्या पॉलिटिक्ल सुपरिटेंडेटने मोठया परीश्रमाने एक ताम्रपट शोधला. नागदेवाचा ताम्रपट म्हणून हा विख्यात आहे. सन १४३६ या संस्कृत ताम्रपटात इंदूल (आताचे हिंदळे) गावच्या राजाने देवशर्मा या विद्वान ब्राम्हणाचा सन्मान केला. त्या पुण्यकर्मामुळे या राजाचे ऐश्वर्य तर वाढलेच, पण त्यास पुत्रप्राप्तीही झाली.या रहाळाचा स्वामी असणार्या कुणकेश्वराच्या प्रसादामुळेच हे सारे त्या ताम्रपटात नमूद केले आहे. कुणकेश्वर गाव पूर्वी या देवास इनाम होते. इंग्रजी अमदानीत ते रद्द होउन, वार्षिक रोख रक्कम सरकारकडून नेमण्यात आली आहे

आख्यायिका :- या मंदिरासंबधी दोन दंतकथा सांगीतल्या जातात.

१ ) एका ब्राह्मणाची एक गाय चरत प्रतिदिन सध्या असलेल्या श्री कुणकेश्‍वर मंदिराच्या परिसरात येत असे. ती घरी काही दूध देत नसे. या प्रकाराचा उलगडा करण्यासाठी ब्राह्मण गायीच्या मागून निघाला. सदर ठिकाणी येताच गायीने एका स्वयंभू पाषाणावर पान्हा सोडल्याचे त्याने पाहिले. त्याने हातातील काठीने या पाषाणावर प्रहार केला. त्याक्षणी त्या पाषाणाचा एक तुकडा उडून त्यातून रक्त वाहू लागले. हे पाहून तो ब्राह्मण आश्‍चर्यचकीत झाला आणि त्या पाषाणास शरण गेला. त्यानंतर तो तेथे प्रतिदिन दिवाबत्ती लावून पूजा करू लागला. त्यानंतर त्या ठिकाणाची महती वाढत गेली. सध्या हे ठिकाण श्री क्षेत्र कुणकेश्‍वर म्हणून ओळखले जाते.

२) एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळात सापडला. आगतिक बनलेला व्यापारी परमेश्वराची करूणा भाकू लागला. तेवढयात त्याला पूर्वेकडे शांतपणे तेवणार्या दिव्याचा प्रकाश दिसला. दिलासा देणार्या त्या नंदादीपाला तो शरण गेला आणि या ठिकाणी मी खूप पैसा खर्चुन जीर्णोद्धार करीन असं त्यानं मनोमन ठरवलं. किनार्यावर सुरक्षित उतरल्यावर तो धावत तिथे गेला. हिंदूंच हे छोटं मंदिर होतं या शिवायलायाचा त्याने जीर्णोद्धार केला. तीन वर्षे आणि द्रव्य खर्चून त्यानं हे काम पुरं केलं देवाच्याच पायाशी जागा मिळावी म्हणून त्यानं शिखरावर चढून खाली उडी मारली व प्राणत्याग केला. त्याचं स्मारक कुणकेश्वराच्या उत्तरेस आहे. तर पश्चिमेस नारो निलकंठ बावडेकरांची समाधी आहे.

कथा कुणकेश्वर मंदिराच्या विध्वंसाची व जिर्णोद्धाराची :-

11 शतकापूर्वीच प्रसिद्धीला आलेल्या या प्राचीन मंदिराचा वारंवार जिर्णोद्धार व दुरुस्ती होणे यात काहीच आश्चर्य नाही. या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम वेळोवेळी हिँदू राजांच्या काळात झालेले आहे. पण जुन्या कागदपत्रांच्या सहाय्याने निश्चित होणारा मंदिराचा जिर्णोद्धार हा शिवकाळातील आहे.

छत्रपती शिवरायांच्या कळात सुलतानी आक्रमणांचा उपद्रव पोचलेल्या असंख्य मंदिरांचा जिर्णोद्धार झालेला आहे. सुलतानी आक्रमणाने पिचलेल्या भारतात शिवरायांच्या पराक्रमाने पुन्हा एक परिवर्तनाची लाट आली. आणि मग आपल्या परमप्रिय दैवतांची पुनर्स्थापना करण्याची ओढ या मातीतील माणसाला होऊ लागली. कुणकेश्वर मंदिराचा झालेला जिर्णोद्धारही याच काळातील आहे. हा काळ शिवराज्याभिषेकानंतरचा. आजपासून जवळजवळ 300 वर्षाँपूर्वीचा. शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचे सांगितले जाते. कुणकेश्वर मंदिर हे काहीसे एका बाजुला असल्यामुळे व अतिशय दुर्गम असणाय्रा या भूप्रदेशामुळे सुलतानी आक्रमकांच्या आसुरी तांडवापासून काहीसे सुरक्षित राहीले. तरी शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर व औरंगजेब दक्षिणेत उतरल्यानंतर या मंदिराला उपसर्ग पोहोचला होता असे ईतिहास सांगतो.

त्याकाळी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळापैकी एक असणाय्रा नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गपासूनचा सागरी प्रदेश होता. नारो निळकंठांची कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती. औरंगजेबाचा पुत्र शहाआलम हा घाट उतरुन या तळकोकणात आल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी कुणकेश्वर मंदिर हे एक डोळ्यांत भरणारे मोठे तिर्थक्षेत्र होते. त्यामुळे कुणकेश्वर मंदिराला शहाआलम त्रास देईल अशी भिती नारो निळकंठांना वाटू लागली. त्यावेळी नारो पंडितांनी कुणकेश्वर परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन मंदिराच्या संरक्षणासाठी नक्कीच काहीतरी योजना केली असणार. त्यांनी जी उपाययोजना केली तीच ही अरबी व्यापाय्राची दंतकथा होय.! असे मत श्री शाम धुरी यांनी मांडले आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर – सिंधुदुर्ग- देवगड

नारोपंतांनी आपल्या आराध्य दैवताच्या रक्षणासाठी उपाययोजना सुरु केली.मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच पहिल्याच दृष्टीक्षेपात दिसणाय्रा छोट्या मंदिरातील मूर्ती हलवून तेथे मातीने लिँपून थडग्याच्या आकाराचा आभास निर्माण केला. या मंदिराच्या कळसाचे कोरीव बांधकाम तासून काढून व डागडुजी करुन त्याचा आकार घुमटासारखा केला. नंतर त्यांनी कुणकेश्वर मंदिर अरबी व्यापाय्राने बांधल्याची हूल उठवली. त्याचबरोबर आपल्या तटपुंज्या लढावू माणसांना सोबत घेऊन नारो निळकंठ अमात्य हे मंदिर परिसरात तळ देऊन बसले. परंतु तरिही शहाआलमची नजर कुणकेश्वर मंदिरावर पडली. त्याने कुणकेश्वर मंदिरावर जोरदार हल्ला चढविला. मंदिराभोवतीच्या तटबंदीच्या आधारे आपल्या तोकड्या बळानिशी मराठ्यांनी कडवा प्रतिकार केला. पण शहा आलमचा तडाखा भारी पडला. मराठ्यांची हार होत असलेली पाहून मंदिराच्या कळसातील गुप्त जागेत तळ देऊन बसलेल्या नारोपंतांनी अखेरीस स्वतः तलवार उपसली व मंदिराच्या शिखरावरुन हरहर महादेव अशी रणगर्जना करीत आक्रमकांच्या तोँडावरच उडी घेतली. या रोमांचकारी घटने मराठ्यांना चेव चढला. त्यांनी मोगल सैन्यावर जोरदार हल्ला चढविला.

मराठ्यांचा तो रौद्रावतार पाहून मोगलांनी माघार घेतली. पण तोपर्यँत मंदिर परिसराचे बरेच नुकसान झालेले होते. झाल्या प्रकाराने नारोपंतांना जबर मानसिक धक्का बसला. या धक्यातून ते सावरले नाहीत. पुढे कुणकेश्वर येथेच त्यांचे निधन झाले. मंदिराच्या दक्षिण बाजुला जेथे त्यांनी उडी घेतली होती तेथेच त्यांचे समाधीचे तुळशी वृंदावन बांधण्यात आलेले आहे. कुणकेश्वरच्या पालखीच्या वेळी म्हटली जाणारी आरती ही अमात्य नारोशंकरांनीच लिहीलेली आहे. या आरतीतही नारोपंडितांच्या उडीचा स्पष्ट उल्लेख आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर – सिंधुदुर्ग- देवगड

नारोपंतांच्या मृत्युमुळे नुकसान भरुन काढण्यासाठी सुरु केलेले जीर्णोद्धाराचे काम थंडावले. छत्रपती संभाजीराजे करवीरकर यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता नारोपंतांचे धाकटे बंधु रामचंद्रपंत अमात्यांना पाठविलेले पत्र उपलब्ध आहे. या पत्रानुसार मंदिराच्या जिर्णोद्धाराची छत्रपतींची आज्ञा शिरसावंद्य मानून रामचंद्र पंडितांनी दुरुस्तीच्या कामासाठी मोठमोठे चिरे व प्रचंड शिळा मंदिराच्या परिसरात आणून ठेवल्या होत्या पण याही वेळी परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम होऊ शकले नाही. पुढे सर्व स्थिरस्थावर झाल्यावर करवीरकर छत्रपतीँच्या आज्ञेने पंत अमात्य बावडेकर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार सिद्धीस नेला. राज्याभिषेक शके 55 मध्ये शंभु छत्रपती करवीरकर यांनी आपले या भागातील सरदार आंग्रे यांना कुणकेश्वर देवस्थानबाबत काही भानगडी असल्यास त्या दूर करुन त्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते.

अखेरीस छत्रपती शिवाजी महाराजांनी योजलेले जिर्णोद्धाराचे काम पूर्ण होण्यास 1700 साल उजाडावे लागले. यावेळी मूळच्या कुणकेश्वर मंदिराच्या शिल्पकामाचे फारच नुकसान झालेले होते. त्यामुळे फुटलेल्या काळ्या खांबांच्या जागी स्थानिक ठिकाणी सापडणाय्रा चिय्राच्या दगडाचे खांब उभारण्यात आले. यावेळी कासवाकडील मंडपाला चिय्राच्या पूर्ण रुंदीच्या भिँती घालून हा भाग बंदीस्त करण्यात आला. त्यामुळे काळ्या पाषाणाचे कोरीव खांब चिय्राच्या भिंतीत चिणले गेले. पुढील सभामंडप तर नव्याने बांधण्यात आला. तटबंदीचे व तळ्याचे बांधकामही याच काळातील असावे. मंदिराचा जिर्णोद्धार करताना कलात्मकतेपेक्षा मजबुतीकडे अधीक लक्ष दिलेले दिसून येते. मंदिराच्या परिसरात एक तोफही होती. ती सुरक्षेसाठीच ठेवलेली असावी. मंदिराच्या वायव्येकडील कड्यावर एक जुना चौथरा साधारण याच काळातील असलेला आढळतो. येथून दूरवरची टेहळणी करता येऊ शकत असे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर – सिंधुदुर्ग- देवगड

मराठी सत्तेच्या अस्तानंतर ब्रिटीश राजवटीच्या काळातही ब्रिटीशांनी या मंदिराची नोंद घेतलेली आढळते. ब्रिटीश सरकारशी एकनिष्ठ राहण्याच्या अटीवर मंदिराच्या मानकय्रांना एक सनद दिली होती. येथील दिवाबत्तीसाठी सालाना 99 रुपये खर्चाची तरतूदही ब्रिटीश सरकारने केली होती. ब्रिटीशकालीन दस्तऐवज असलेल्या बॉम्बे ग्यझेटमध्येही कुणकेश्वराचे पुढील प्रमाणे वर्णन आढळते. इसवी सन 1880 या सालच्या बॉम्बे ग्यझेट मधील माहितीनुसार या मंदिराविषयी खालील माहिती दिलेली आहे.

देवगड उपविभागात समुदकिनारी कुणकेश्वर गाव वसलेले आहे. या मंदिराचा पाया ग्रनाईट दगडाने बनविला असून मंदिराचे काम भक्कम करण्यात आले आहे. भगवान शंकराचे हे स्थान एका मुस्लीम व्यापाय्राने बांधले अशी दंतकथा सांगितली जाते. परंतु त्यास कोणताही सबळ पुरावा नाही. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच्या दगडांवर अप्रतिम कोरीव काम केले आहे. कोल्हापुरच्या राज्यप्रमुखांनी 1680 साली या मंदिराचा जिर्णोद्धार केला. माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. यामध्ये तब्बल 10 हजार भाविक सहभागी होतात. यात्रेच्या वेळी सलग 20 दिवस दुकाने उघडी असतात. यामध्ये कापड मिठाई यांच्यासह जिवनोपयोगी वस्तू मिळतात. यात्रेच्या काळात 15 ते 25 हजार रुपये उलाढाल होते.” ही आकडेवारी 1872 सालची आहे यावरुन या देवस्थानच्या लोकप्रियतेची कल्पना येते. स्वातंत्र्यानंतर मंदिराचे बांधकाम जिर्ण झाल्यामुळे पुन्हा एकदा ग्रामस्थांनी उचल घेतली व त्यातून आजचे कुणकेश्वर मंदिर साकार झाले.

असा आहे श्री कुणकेश्वर परिसर

ख्रिस्ताब्द १९२० च्या सुमारास देवळापासुन जवळच पूर्व दिशेस डोंगराच्या उतरणीवर काही लोक जमीन खणत असताना पूर्वकाळापासून कित्येक शतके बुजालेले एका गुहेचे दार मोकळे होऊन आंत कोरीव पाषाणी मूर्ती आढळून आल्या.त्यात आढळलेल्या कोरीव पाषाणी मूर्तींमध्ये योद्ध्यांचे पोषाख आणि शिरोभूषणे कोरलेल्या मूर्ती आहेत. मध्यभागी शिवलिंग आणि नंदी यांच्या मूर्ती, तर सभोवार त्या देवतांच्या उपासकांचे पुतळे आहेत. ही गुहा म्हणजे इतर कोरीव लेण्यांप्रमाणे एक लेणी आहे. पण यातील मूर्ती मात्र गुहेच्या दगडांवर कोरलेल्या नसून त्या अलग आहेत. गुहेची खोली तांबडया कापाच्या दगडाची असून मूर्तीचा दगड काळा-काळित्री आहे. हा काळा दगड गावात समुद्राच्या कडेस आणि डोंगराच्या कडयांत क्वचित स्थळी सापडतो.या गुहेला सध्या पांडव लेणी म्हणून ओळखले जाते.

गुहेची खोली सुमारे १० फुट लांब ८ फुट रूंद आणि ६ फुट उंच असून, पाच फुट उंच आणि तीन फुट रूंद असा दरवाजा आहे. आत १८ कोरीव मुखवटे शिवलिंग आणि नंदी मिळून २० नग आहेत. मुखवटयांची मांडणी जोडी जोडीने केलेली आहे. पुरूष व स्त्री अशा ८ जोडया, एक तरूण पुरुषाचा मुखवट स्वतंत्र बसवलेला आहे. तसेच एक पुतळयाची नासधूस झाल्यामुळे तो पुरूषाचा किंवा स्त्रीचा हे नीट ओळ्खता येत नाही. त्यामुळे तो एका बाजुस ठेवला आहे. शिवलिंग आणि नंदी हे देखिल काळा- (काळित्री) दगडाचे असून गुहेत प्रवेश केल्यावर तिच्याध्यभागी पण जरा डाव्या बाजूस ठेविले आहेत. गुहेतील मुर्त्या हया देवतांच्या मुर्ती नसून राजघराण्यातील स्त्री पुरूषांचे ते मुखवटे आहेत. त्यांचे कोरीव काम उच्च दर्जाचे दिसून येते. कौशल्यामध्ये ओबडधोबडपणा कमी असून रेखीव व सुबकपणाकडे कोरण्याकडे चांगलेच लक्ष दिले आहे. पुरूषांच्या आकृती जरा मोठया असून त्या मानाने स्त्रियांच्या लहान आहेत. प्रत्येक जोडप्यास निराळी बसकण आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर – सिंधुदुर्ग- देवगड

प्रत्येक मुखवटयाला राजास आणि राजघराण्यातील स्त्रीपुरूषांस शोभेल असाच पेहराव केलेला आहे. प्रत्येक मुखवटयास शिरपेच, डोकिच्या एका बाजूस तुरा, मोत्यांचे पेड कोरीव कामांत दाखविले आहेत. तसेच महाराष्ट्रीय वळणाची शिरोभूषणे आपणास या मुर्त्यांवर पाहावयास मिळतात. या बाबतचे आणखी संशोधन चालू आहे. मुळात कोकणात लेणी थोडी आहेत. आणि अशा तर्हेचे लेणे तर नाहीच.

देवालयाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीच्या मधल्याभागी एक छोटीशी राई आहे. तिथेच एक पुरातन बांधणीचा तलाव आहे. त्याच्याबदद्ल अशी माहिती आहे की, हा तलाव बर्याच वर्षापूर्वी बांधलेला असावा. तो साफ बुजलेला होता. तलावाशेजारी मारूतीचे मंदिर आहे. त्या मंदिरात श्रीमान लब्दे महाराज तपश्चर्या करीत असताना त्यांना तलावाबद्दल दॄष्टांत घडला. ताबडतोब त्यांनी ग्रामस्थांच्या नजरेस ही घटणा आणली व ग्रामस्थांनी ही जागा खोदण्यास प्रारंभ केला असता माती खाली तलाव आढळून आला. समुद्रच्या अगदी जवळ असुनही या तलावाचे पाणी मचूळ नसून पिण्यायोग्य गोड आहे. ही आश्चर्याची बाब मानली जाते. हया तलावाशेजारीच लब्दे महाराजांची समाधी आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर – सिंधुदुर्ग- देवगड

श्री कुणकेश्वर मंदिराचे सर्व आवार घडीव चिरेबंदी दुहेरी तटबंदीने बंदीस्त आहे. भरतीच्या लाटांनी वेढलेल्या मंदिराचे आकाशातून छायाचित्रण केले तर सिंधुसागराने आपल्या सहस्त्रावधी बाहुंनी कुणकेश्वराचे मंदिर भक्तीभावाने कवटाळल्यासारखे दिसेल. मंदिराभोवतालच्या या पोवळीचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूस दोन प्राचीन गणेशाच्या सुबक मूर्ती पश्चिम दिशेकडे तोंड करुन बसविल्या आहेत.

मुख्य प्रांगणात प्रवेश केल्यानंतर भैरव मंदिराचे समोरच दर्शन घडते. येथून उजव्या बाजूला वळून पाहिले असतासमाधी मंदिर लागते भैरव मंदिरातील पाषाण हे चौथय्राच्या खाली जमिनीलगत स्थापन केलेले आहे. तर शहाआलमच्या आक्रमणाच्या वेळी कुणकेश्वर मंदिराच्या रक्षणासाठी समाधी मंदिरातील मूर्ती हलवून तेथे मातीचे थडगे तयार करण्यात आले होते. आज दिसणारे संगमरवरी थडग्याचे बांधकाम हे कुणकेश्वर सेवा मंडळामार्फत 1979 साली केलेले आहे. येथूनच आता मुख्य मंदिर डाव्या बाजुला आहे. डाव्या अंगाला सर्वात प्रथम श्री देव मंडलिकाचे काळे पाषाणी दाक्षिणात्य शैलीतील मंदिर दिसते. या मंदिराचे काम 11व्या शतकापूर्वीचे असल्याचे जाणवते. या मंदिरा समोरच मोठा नंदी आहे. या नंदीला नमस्कार घालून आपण मुख्य मंदिराच्या दिशेने पुढे सरकतो.

श्री क्षेत्र कुणकेश्वर – सिंधुदुर्ग- देवगड

मंदिराच्या समोरच सभामंडपाला लागून पाच मोठ्या दिपमाळा आहेत. श्री कुणकेश्वर मंदिराचे बांधकाम हे दाक्षिणात्य पद्धतीचे आहे. मंदिराचे अधिष्ठान तारकाकृती असून, त्यावर मंदिराचे कळसापर्यँतचे बांधकामही तारकाकृतीच आहे. मंदिराचा कळस बराच उंच असून तो बदामी आकारात बांधलेला आहे. मंदिराचा चौथराच मुळी 30 फूट उंचीचा आहे. त्यावर विशाल घडीव पाषाणांनी 70 फूट उंचीच्या भव्य मंदिराचे बांधकाम केलेले आहे. समुद्रीलाटांपासून मंदिराच्या पायथ्याचे रक्षण व्हावे म्हणून समुद्रसपाटीपासून भक्कम चिरेबंदी दुहेरी तट बांधून त्यात मातीचा भराव घालून ही अवघड डोँगर उताराची जागा भक्कम व समतल करण्यात आलेली दिसते. या देवस्थानचे क्षेत्रफळ सुमारे पाऊण एकरात विस्तारलेले असूऩ गाभारा, मुगसाळ, विश्रांती स्थळ व सभामंडप अशी रचना आहे. ही वैदिक कळातील विमान, अंतराळ, अर्धमंडप, सभामंडप अशी रचना आहे. देवळात अप्रतिम कोरीव काम आहे. गरुड, हनुमान, दशावतार, शेषशायी विष्णु, व्याळ, सर्प, पाने, फुले, देवतांच्या कोरीव मूर्ती या मंदिराच्या प्राचीनतेची जणु साक्षच देतात.

श्री मंडलिक मंदिराला लागुनच पुढे दक्षिण बाजुला श्री नारायण मंदिर आहे. मंदिरातील नारायणाची मूर्ती ही अत्यंत दुर्मिळ असून तिच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. नारायण मंदिराच्या डाव्या अंगाला गणपतीचे नव्याने बांधलेले मंदिर आहे. त्यात गणेशाची संगमरवरी मूर्ती स्थानापन्न आहे. येथे जवळच एका चौथय्रावर एक उंच लाकडी स्तंभ उभा केलेला आहे. याला ‘ढालकाठी’ असे म्हणतात. याच्यामुळे वाय्राची दिशा समजते. मुख्य मंदिराच्या सभामंडपाच्या दोन्ही बाजुला दोन उंच पाषाण उभे केलेले आहेत. यांना चंड व मुंड असे म्हटले जाते. हे मंदिराचे रक्षक असल्याचे सांगितले जाते. परंतु या पाषाणांपैकी एक 11व्या शतकातील शिवलींग असून दुसरा पाषाण जुन्या स्तंभाचा भग्नावशेष आहे असे मत अभ्यासकांनी मांडले आहे. ढालकाठीच्या पुढे व मुख्य मंदिराच्या दक्षिण प्रवेशद्वारासमोर एक मोठे तुळशी वृंदावन आहे. हे नारो निळकंठ यांचे समाधी स्थान असून येथे नारो पंडितांनी मंदिराच्या छपरावरुन उडी मारली होती असे अभ्यासकांचे मत आहे.

श्री क्षेत्र कुणकेश्वर – सिंधुदुर्ग- देवगड

कुणकेश्वरच्या पारंपारिक आरतीतही असा उल्लेख सापडतो. येथून थोडे पुढे गेल्यानंतर समुद्राकडे उतरण्याच्या पायय्रा आहेत. येथील समुद्र किनाय्रांवरील खडकांमध्ये असंख्य छोटी छोटी शिवलिंगे कोरलेली आहेत. समुद्रातील अंतर्गत हालचालीमुळे सर्वच दिसत नसली तरी ओहोटीच्या वेळी बहुतांशी शिवलिंगे स्पष्ट पाहता येतात. लाटांचा सततचा मारा होत असूनही हि शिवलिंगे अबाधीत राहिली आहेत. हि शिवलिंगे पांडवांनी कोरली आहेत, अशी दंतकथा गावातील वृद्धमंडळी सांगतात या शिवलिंगांमुळेच कुणकेश्वरला “दक्षिण कोकण काशी” असे म्हटले जाते. महाशिवरात्रीच्या पर्वकाळात लाखो यात्रेकरु व गावोगावच्या देवतांचे तरंग येथे तिर्थस्नान करतात. त्यामुळे कुणकेश्वर समुद्र किनाय्राला नैसर्गिक सौंदर्या इतकेच दैवी महत्वही आहे.

कुणकेश्वर मंदिराच्या मागील बाजूस उभ्या असणाय्रा तटबंदीमध्ये एक उभा स्वयंभू पाषाण आहे. याची उंची कुणकेश्वरच्या शिवलिंगाच्या उंचीच्या पातळीइतकीच आहे. या पाषाणाच्या मागे एक घुमटी असून या घुमटीत कोणतीही मूर्ती वा पाषाण नाही. येथे नेहमी फुले वाहून पुजा केली जाते. मुख्य मंदिराच्या उत्तरेला श्री जोगेश्वरी मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे. नवरात्रीला येथे घटस्थापना केली जाते. या मंदिरासमोर तुळशी वृंदावन असून दिवाळीत येथील तुलसी विवाहानंतर गावातील तुलसी विवाह लावले जातात. जोगेश्वरी मंदिर व कुणकेश्वर मंदिराच्या मध्ये एक पडका चौथरा आहे. या चौथय्राची उंची हि कुणकेश्वर मंदिराच्या चौथय्राशी समांतर आहे. देवी जोगेश्वरी पूर्वी या चौथय्रावर विराजमान होती असे म्हणतात. मंदिर परिसरात ईशान्य कोपय्रात एक गोड्या पाण्याची विहीर आहे. जोगेश्वरी मंदिराच्या बाजुने आवाराच्या उत्तर दरवाजाने बाहेर पडले असता नव्याने सुशोभित केलेला प्राचीन तलाव आहे. या तलावामध्ये एक उंच स्तंभ उभारुन त्यावर शिवशंकराची देखणी मूर्ती स्थापन केलेली आहे.

साभार – Facebook

Leave a Comment