लाडाचे कारंजे, जि. वाशिम –
कारंजे हे अपार संपत्तीचे शहर होते. ‘लाड’ आडनावांची अनेक घराणी. कारंज्यात होती. ती सावकारकी करत होती. म्हणून त्याला लाडाचे कारंजे असे म्हणत. अन् या लाडांना कारंज्याचे लाड म्हणत. कारंज्यात व्यापार फार मोठ्या प्रमाणावर चाले. इंग्रज , डच आणि अन्य युरोपीय व्यापारी सुरतेहून वऱ्हाडात मुख्यत: कापसाच्या खरेदीसाठी सतत येत. येथे सोन्याची फार मोठी बाजारपेठही होती.
शिवचरित्रात कारंज लाड हे शिवाजी महाराजांनी लुटले होते असा इतिहास सापडतो.हा लुटीचा पैसा त्यांना स्वराज्याच्या बळकटीसाठी. भावी आक्रमणांना तोंड देण्यासाठी आणि लष्करासाठी वापरायचा होता. आनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. याला चार वेस असून दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरूळ वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहेत.
अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला स्त्रीधन म्हणून कारंजा गाव आंदण म्हणून दिले होते असे म्हणतात. त्यामुळे या गावाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात बिबीचे कारंजे असाही येतो.
तिथे आता बिबीसाहेब दर्गा आहे. या लगतचा भागाला बिबीसाहेबपुरा म्हणतात. नगरपालिकेची इमारत म्हणजे प्राचीन हमामखाना आणि पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. अशा या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली. याची साक्ष म्हणून कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख केला जातो. उंटावरून कस्तुरी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून सर्व कस्तुरी खरेदी करून हवेलीच्या बांधकामात तिचा वापर केला.
हे शहर इ.स.च्या १४व्या शतकातील गुरू नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान म्हणूनही ओळखले जाते. सदर फोटो हत्ती खाना व हमामखानाची आहेत. हमामखाना चे प्रवेशद्वार उंच असून त्यावर दोन फारसी शिलालेख आहे.
संतोष मु चंदने. चिंचवड, पुणे.