महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,13,589

आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे तालीम

By Discover Maharashtra Views: 1605 2 Min Read

आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे तालीम –

गंज पेठेमधून श्री_भवानी_माता_मंदिराकडे जाताना रस्त्यात उजव्या हाताला आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे तालीम लागते. २-३ पायऱ्या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजातून आत जाता येते. आतमध्ये मध्यभागी कुस्ती खेळण्याचा हौदा आहे. शेजारी भिंतीमध्ये शेंदुरर्चर्चीत हनुमानाची मूर्ती आहे. त्यामागे पारंपारिक व्यायामाची साधने ठेवलेली आहेत.

लहूजी वस्ताद यांचा जन्म दि.१४ नोव्हेंबर १७९४ रोजी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायणपूर गावच्या “नारायण पेठ” मध्ये साळवे कुटुंबात झाला. हे कुटुंब दांडपट्टा, तलवार, कुऱ्हाड चालवण्यात पटाईत होते. गुप्त बातम्या काढणे व माग काढणे, शत्रूसैन्यात घुसून लढणे आदी कौशल्ये या कुटुंबाकडे होती. त्यामुळे महाराजांनी त्यांना सैन्यामध्ये राऊत या पदावर नेमून पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी सोपवली.

दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे या सर्व युद्ध कलांमध्ये लहुजी निपुण होते. इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा सामना करण्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांती करून या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये गंज पेठेमध्ये तालीम सुरू केली. लहुजी आता वस्ताद झाले. हीच देशातील पहिली क्रांतिशाळा जिथे अनेक क्रांतिकारी घडले. या तालमीचे उद्धाटन हे सरदार रास्ते यांनी केले. त्यावेळी लहुजींनी दांडपट्टयाचे अनेक खेळ करून दाखविले. त्याचबरोबर बंदुकीने नेम धरणे, तलवारबाजी असे मर्दानी खेळ दाखवून लोकांना व तरुणांना आकर्षित करून घेतले. यानंतर अनेक तरुण लहुजींच्या तालमीत दाखल झाले.यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे यांचा समावेश होता.

दि. २० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. दि. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याने लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या १३ महिन्यांनी म्हणजेच दि. १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगम पुलाच्या परिसरात एका घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका महान क्रांतिपर्वाचा शेवट झाला.

संदर्भ:
फोटो १ : Google
साप्ताहिक विवेक : https://www.evivek.com/…/2/15/Krantiveer-Lahuji-Salve.html
पत्ता : https://goo.gl/maps/ZScoNodoq5TAdtRK6

आठवणी इतिहासाच्या

Leave a Comment