महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,25,621

शूर वीरांगना लक्ष्मीबाई शिंदे

By Discover Maharashtra Views: 2625 4 Min Read

शूर वीरांगना लक्ष्मीबाई शिंदे –

(इतिहासातील हे न उलगडलेले पान)

लक्ष्मीबाई शिंदे म्हणजे ग्वाल्हेर येथील महादजी शिंदे यांच्या पत्नी. त्या लढवय्या होत्या.अनेक मोहिमांमध्ये त्यांनी युद्धात भाग घेतला होता. त्या नेहमी  महादजी शिंदे यांच्या बरोबर लष्करात रहात असत.अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठेशाहीमधे ‘ शिंदे बायांचे बंड ‘ म्हणून जे गाजले होते त्या बंडाच्या म्होरक्या  लक्ष्मीबाई शिंदे याच होत्या. महादजी  शिंदे जिवंत असेतोपर्यंत महादजींच्या गैर हजेरीत लक्ष्मीबाई याच सर्व कारभार पाहत असत. लक्ष्मीबाईंना पुत्र नसल्याने महादजींच्या  मृत्यूनंतर त्यांचा  सावत्र पुत्र दौलतराव शिंदे हा सेनाधिकारी झाला व सिंधीया सल्तनतीचा तो  कारभार पाहू लागला. दौलतराव शिंदे व लक्ष्मीबाई शिंदे यांचे आपसात पटत नव्हते .त्यामुळे लक्ष्मीबाई शिंदे यांचे अधिकार मान्य करावयास तयार नव्हत्या.

लक्ष्मीबाईंना स्वतःचे   अधिकार व स्वतंत्र कारभार पाहिजे होता, म्हणून त्यांनी शिंदे यांच्या फौजेतील काही लष्कराच्या तुकड्या आपल्या अधिकाराखाली आणल्या व  त्यावर मुजप्फरखान याची सेनानी म्हणून नेमणूक केली.आणि  लक्ष्मीबाई वेगळ्या होऊन आपला अधिकार गाजवून स्वतंत्रपणे कारभार पाहू लागल्या.लक्ष्मीबाईंचा   स्वतंत्र कारभार म्हणजे दौलतराव शिंदे यांना त्याचा त्रास होऊ लागला व एक प्रकारे त्यांच्या सत्तेला व अधिकारपदाला आव्हानच मिळाले, म्हणून त्यांनी आपले एक सरदार फकीरजी गाढवे यांच्याबरोबर आवश्यक ते सैन्य देऊन लक्ष्मीबाईंच्यावर  पाठवले.फकीरजी गाढवे यांच्याशी  लक्ष्मीबाईने स्वतः युद्धात भाग घेऊन सैन्याचे नेतृत्व केले व फकीरजी आणि त्यांच्या सैन्याचा पूर्ण पराभव करून त्यांना पिटाळून लावले.थोडक्यात या लढाईत  दौलत राव शिंदे यांचा त्यांच्या सावत्र मातोश्री  लक्ष्मीबाई यांचेकडून पूर्ण पराभव झाला.

या युद्धातील विजयामुळे लक्ष्मीबाईंना  दौलतराव शिंदे यांच्याकडील सरदार येऊन मिळाले.त्यामुळे  लक्ष्मीबाई यांच्या फौजेतील लष्कराची संख्या वीस हजारांच्यावर गेली.लक्ष्मीबाईंनी या सर्व सैन्यास नवीन युद्धतंत्राने शिक्षण देऊन त्या लष्कराचे रूपांतर खड्या सैन्यात केले.आता लक्ष्मीबाई यांच्याकडे नवीन युध्द तंत्राने   लढणारी फौज वीस हजारांच्यावर झाली..या खड्या फौजेचे नेतृत्त्व स्वतः करत होत्या.या फौजांचा खर्चही अफाट होता.परंतु उत्पन्न मोठे असल्याने सुरवातीला त्यांना काहीच वाटले नाही. परंतु या फौजेचा  खर्च बाहेरच्या बाहेर काढण्यासाठी त्यांनी वेगळी शक्कल  लढवून आसपासच्या मुलकात हिंडून खंडण्या गोळा करण्यास सुरुवात केली.आपल्या प्रदेशात  मात्र त्यांनी  खंडण्या वसूल न करता शत्रूच्या प्रदेशातून खंडण्या वसूल  केल्या. काही ठिकाणी प्रचंड लूटा- लूट केली. लक्ष्मीबाईंनी अशेरी ,बर्हाणपूर वगैरे प्रदेशातही आपल्या फौजेस लुटालूट करून बराच धुमाकूळ घालावयास लावला.जैतापूर येथील रामराव चिटणीसांचा सर्व वाडा लुटून फस्त केला.खणत्या लावून तळघरातील सर्व संपत्ती लक्ष्मीबाईंनी लुटली. त्याचप्रमाणे बर्याच  मुलखात जाळपोळ व लुटालूट यांचे सत्र आरंभले .

नंतर  लक्ष्मीबाईवर मारेकरी घालण्यात आले. परंतु त्या हल्ल्यात त्यांना मोठ्या जखमा जरी झाल्या तरी त्यांचे प्राण बचावले.दौलतरावानेच आपल्यावर मारेकरी घालून आपला खून करण्याचे प्रयत्न केल्याचे त्यांनी जाहीर केले.पुढे  दौलतरावांनी  लक्ष्मीबाईंच्या गोटावर हल्ला केला.त्यातूनच लढाईला तोंड फुटले .आपल्या सैन्याचे नेतृत्व स्वतः लक्ष्मीबाईच  करत होत्या. लक्ष्मीबाईने कालीमातेचा अवतार धारण करून सर्व शस्त्रे परजून, हत्तीवर बसून मोठ्या विरश्रीने लढाई केली .त्यांच्या या आवेशामुळे त्यांचे सैन्यसुध्दा आक्रमकपणे लढले.

त्यामुळे दौलतरावांना अखेरीस माघार घेऊन लक्ष्मीबाई शिंदे यांच्याशी तह करावा लागला. त्यामुळे या तहात घरगुती बखेडा मोडावा व   लक्ष्मीबाईने अशेरीत राहून त्यांच्या ताब्यात असणार्या दौलतीचा कारभार करावा असे ठरले.त्याचप्रमाणे  दौलतरावाने ग्वाल्हेर येथे राहून दौलतीचा कारभार करू लागले.

मराठा स्त्रिया मग त्या राजघराण्यातील असो किंवा सरदार घराण्यातील असोत किंवा सामान्य कुटुंबातील असोत. त्यांची आक्रमकता, महत्त्वाकांक्षी वृत्ती व त्यासाठी आपल्या प्राणाचे मोल देण्याची वृत्ती ही वाखाणण्यासारखी आहे. पतीच्या पश्चात कारभार करण्याची त्यांची वृत्ती हे त्यांचे निदर्शक आहे.

इतिहासातील हे न ऊलगडलेले पान .

डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a Comment