महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 88,98,760

शिवकाळातील जमिनीची मोजणी अन महसूल व्यवस्था

Views: 6481
4 Min Read

शिवकाळातील जमिनीची मोजणी अन महसूल व्यवस्था

स्वराज्यातील प्रदेशाची व्यवस्था लावताना महसुलात योग्य, चौकस कर्तबगार व्यक्तींना शिवरायांनी कामे दिली. महसूल व्यवस्थेला युद्धाइतकेच महत्त्व दिले. त्यासाठी उत्कृष्ट कार्यालय तसेच महसुली अधिकाऱ्यांना योग्य तो मान मरातब दिला गेला.शिवकाळातील जमिनीची मोजणी.

शिवकाळात शिवरायांनी स्वतः जमीन मोजणीची पद्धत सुरू केली होती. त्यांनी आपल्या मुलखात असणाऱ्या जमिनीची मोजणी करून जमिनीची प्रतवारी ठरवली. मोजणीसाठी जे साधन वापरले त्यास (शिवशाही) काठी असे म्हणतात. विशिष्ट धुरंग, झाडे अन चावर करून त्याप्रमाणे त्यास कर आकारणी केली होती.

पाच हात लांब अन पाच मुठीची एक काठी. त्यात एक हात चवदा (चौदा) तसुंचा असावा. असे हात व मुठी मिळून बैंशी (ब्याऐंशी) तसुंची लांबी एका काठीची असायची. अशा वीस काठ्या औरस-चौरस घेऊन त्याचा एक बिघा बनायचा. आणि असे एकशे वीस बिघे मिळून एक चावर व्हायचा. याप्रमाणे जमिनी मोजून संपूर्ण गावे त्यावेळी सुरणविस अण्णाजी दत्तो यांनी मोजून घेतली होती.

तसेच एका बिघ्यात येणारे पीक याप्रमाणे त्यात पाच भाग पाडले जात. त्यातील तीन तक्षीमा(भाग) रयतेला व दोन ताक्षीमा सरकारात जमा होत असत.

यात दुष्काळ, नापिकी अतिवृष्टी याचाही विचार होता. त्याकाळात विशेष सवलती रयतेला दिल्या गेल्या. “येणेप्रमाणे रयतेपासून घ्यावे.”

स्वराज्यात नव्याने सामील होणाऱ्या रयतेस गुरेढोरे देऊन उपजीविकेचे सोय करावी, पेरणीस दाणे अन पैसे द्यावेत. उपजीविकेसाठी धान्य तसेच काही रक्कम द्यावी अन दोन चार वर्षांनी जेव्हा त्यांची परिस्थिती सुधारेल त्यावेळी ती वसुलण्यात यावी.

तसेच रयतेचे पालन करताना त्यात कोणताही जातीभेद करू नये. सर्व जातीचे पालनग्रहण करावे असेही शिवराय आपल्या अज्ञापत्रात स्पष्टपणे सांगतात.

प्रत्येक गावासाठी नेमलेल्या कारकुनी अधिकाऱ्याने जेवढं रयतेस उत्पन्न मिळतंय त्याच हिशोबाने वसूल घ्यावा, जबरदस्ती करू नये.

तसेच त्याकाळी जमिनीदार अन वतनदार लोकांच्या मनमानीला शिवरायांनी जागेवर आळा घातला होता. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की “मुलखात जमीनदार, वतनदार, देशमुख, देसाई यांचे कैदेखाली रयत नाही, यांनी साहेबी करून नागविन म्हटलियाने तैसे होत नाही.” म्हणजे कडक शब्दांत वतनदारीला शिवरायांनी विरोध केला होता.

त्या वतनदारीचे वर्णन शिवरायांनी खालील प्रकारे केले होते.

आदिलशाही, निजामशाही तसेच मुघलांनी ह्या देशावर कब्जा केला. त्यावेळी मुलखातील पाटील, देशमुख, कुळकर्णी यांच्या ताब्यात तेथील रयत दिली गेली, म्हणजे हजार दोन हजार त्या ठराविक लोकांनी वसूल करून घ्यावे आणि ठरलेली रक्कम सरकारजमा करावी. म्हणजेच त्यांना ठराविक सारा वसूल करून त्यातील बहुतेक रक्कम दिवानात जमा करायचे निर्देश दिले व काही टक्के रक्कम स्वतःकडे ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे हे गावपाटील, देशमुख, कुळकर्णी ह्यांनी बक्कळ पैसे कमावून गावोगावी हुडे म्हणजे गावभोवती तटबंदी, वाडे तसेच कोट बांधले व त्यावर सशस्त्र पहारेकरी नेमले. त्यामुळे दिवाणी अधिकाऱ्याला ना रयत भेटू शकत होती ना बोलू शकत होती. याप्रकारे हे सर्व म्होरक्या लोक एकत्र येऊन पूर्ण प्रदेश परकीय यवनी अधिपत्याखाली आला असता.

शिवरायांनी हे सगळे मोडून काढले, वतनदारांना सरळ चाप घातले. मनमानी कारभार बंद केला. गावोगावी उभारलेले हुडे, कोट, वाडे पाडून टाकले. एखादा नामांकित कोट बांधून तेथे आपले अधिकारी कारभारी प्रशासनासाठी नेमले.त्यामुळे वतनदारी पद्धतीस आपोआप पायबंद घातला गेला. वतनदार व पाटील यांच्याऐवजी गावकामगर पाटील नेमले अन त्याच्या मदतीस प्रत्येक गावी एक असे कुळकर्णी नेमून दिले. तसेच या जमीनदारांना तटबंदी असलेला बुरुजी वाडा बांधण्यास मज्जाव केला. घरे बांधून मुलखात राहायचे निर्देश दिले.

अशाप्रकारे एक उत्कृष्ट अशी सारा अन महसूल व्यवस्था शिवरायांनी शिवकाळात अंमलात आणली होती ज्यात तिजोरीचा विचार होताच पण त्याआधी रयतेच्या हिताचा विचार केला गेलेला. दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती यांचा विचार करून सारा वसूल करण्याचे आदेशच दिले होते. अधिकाऱ्यांच्या मनमानीला सक्त विरोध केला होता.

शेवटी एकच वाक्य सांगेल..

आमच्या राजाने एवढा आदर्श घालून दिला, पण दुर्दैव आमचं की आम्हाला इतिहासापासून काहीच शिकायचे नाही.

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

खांदेरीचा रणसंग्राम

Leave a Comment